आगळं वेगळं – कातळशिल्पे

>> मंगल गोगटे

रत्नागिरी, राजापूर, लांजा, कणकवलीजवळ हिवाळ्याचा सडा, निवळी फाटय़ाजवळ गावडेवाडी, देवीहसोळ, वेळणेश्वर या ठिकाणी व इतर अनेक ठिकाणी ही कातळशिल्पे खोदलेली दिसतात.

नयनरम्य समुद्रकिनारे, नारळी-पोफळीच्या बागा आणि कोकणी मेवा यापलीकडे कोकणात आदिम संस्पृतीच्या खुणा सांगणारी अनेक कातळशिल्पंही आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातील ही देखणी कातळशिल्पे आवर्जून पाहावीत अशीच आहेत. कातळावर एक चौकट खोदून घेतली जाते आणि त्यामध्ये ही कातळशिल्पे कोरली जातात. त्यांना उठाव काहीसा कमी असतो. नेमके असते काय या कातळशिल्पांमध्ये? माणूस, मासा, कासव, बेडूक असे विविध प्राणी, पक्षी यांच्या आपृती इथे दिसतात. काही भौमितिक रचना आढळतात. वीजवाहक मनोरे आणि त्यांच्या तारा जशा दिसतील अशा काही रचनादेखील दिसतात. राजापूर-आडिवरे रस्त्यावर सोलगाव फाटा आहे. तेथून आत दहा किलोमीटरवर देवाचे गोठणे नावाचे गाव आहे. त्या गावी भार्गवरामाचे सुरेख मंदिर आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी ते गाव ब्रह्मेंद्रस्वामींना आंदण दिले होते. त्या गावात असलेल्या भार्गवराम मंदिरात एक सुंदर पोर्तुगीज घंटा टांगलेली आहे. मंदिराच्या समोर एक पायवाट डोंगरावर जाते. डोंगरावर गेले की, काही अंतर उजवीकडे चालून गेल्यावर एक आश्चर्य सामोरे येते. या कातळशिल्पात एक मानवी आकृती कोरलेली आहे, पण आश्चर्य असे की, त्या मानवी आपृतीच्या पोटावर जर होकायंत्र ठेवले तर ते चुकीची दिशा दाखवते! तो चौकोन अंदाजे वीस चौरस फूट लांबीरुंदीचा आहे. तेथे कोठेही होकायंत्र नेले तरीसुद्धा दिशा चुकीची दिसते. कातळशिल्प खोदताना त्या मंडळींना याची माहिती होती हे तर नक्कीच. मग त्याच ठिकाणी असे का खोदले गेले असेल? वर्तमानकाळात प्रसिद्ध असलेली चुंबकीय चिकित्सा त्या काळी ज्ञात होती का ? त्यासाठीच झोपलेल्या मानवाची ही आपृती आणि तेथे होकायंत्राची गडबड यांचा काही संबंध असेल का? मुळात त्या काळी होकायंत्रे होती का? हे सगळे प्रश्न येथे भेट देणाऱयांना भंडावून सोडतात, परंतु त्या खोदचित्रामागे काहीना काही संकेत नक्की आहेत. दुसरे एक सुंदर कातळशिल्प आहे देवीहसोळ या गावी. राजापूरच्या पुढे असलेल्या ‘भू’ या एकाक्षरी नाव असलेल्या गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर देवीहसोळ हे गाव येते. तेथे आर्यादुर्गा देवीचे सुंदर मंदिर आहे. कऱहाडे ब्राह्मण कुपुटुंबांची ती पुलदेवता आहे. त्या मंदिराच्या अलीकडे व मंदिराला लागून रस्त्याच्या डाव्या हाताला अंदाजे पंधरा चौरस फुटांची चौकट आखलेली दिसते. त्या चौकटीला चारही बाजूंनी साखळ्या लावून संरक्षित केलेले आहे. चौकटीच्या आत सुरुवातीला सर्पाकार आकृती आहेत. चौकटीचे चार भाग केलेले दिसतात. त्या चार भागांमध्ये विविध आपृती कोरलेल्या आहेत. त्यातील काही समजतात, काही अनाकलनीय आहेत. चौकटीच्या मध्यभागी गोल खोलगट खड्डा आहे. त्यात पाणी साठलेले असते. देवीहसोळच्या जवळ भालावली नावाचे गाव आहे. त्या गावात नवदुर्गेचे मंदिर आहे. देवीहसोळच्या आर्यादुर्गेचा उत्सव मार्गशीर्ष वद्य अष्टमीला असतो. त्यावेळी भालावलीहून नवदुर्गेची पालखी त्या देवीच्या भेटीला येते. त्या दोन गावांच्या दोन देवींची भेट त्यावेळी कातळशिल्पावर होते. त्या भेटीच्या वेळी कातळशिल्पाच्या मधोमध असलेल्या खोलगट भागात फुरसे नावाचा विषारी साप येतो आणि तो तेथेच दिवसभर बसून असतो असे स्थानिक सांगतात. त्या कातळशिल्पापासून देवीच्या मंदिरापर्यंत शंभर मीटर अंतर आहे. तेथे सर्वत्र विविध कातळशिल्पे खोदलेली दिसतात. त्यामध्ये हत्ती, मासा यांसारखे प्राणी प्रामुख्याने आढळतात. एपूणच एका प्रकारच्या शिल्पांसाठी कातळावर ठरावीक अंतराची चौकट खोदून घेतलेली दिसते. त्या चौकटीत ही शिल्पे कोरलेली असतात. त्यांना उठाव काहीसा कमी असतो. अशी शिल्पे कोकणात तुलनेने अत्यल्प आहेत. दुसऱया प्रकारात सरळ रेषेच्या आधारे द्विमितीय चित्रे दिसतात. कोकणातील कातळशिल्पांमध्ये त्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, गोपद्मे, मासा, कासव असे विविध प्राणी, पक्षी यांच्या आपृती व सांकेतिक खुणा दिसतात. रत्नागिरी आणि लांजा तालुक्यात 42 गावांमधून 850 कातळशिल्पे सापडली आहेत. राजापूरजवळच्या गोवळ या गावातही मानवी संस्कृतीच्या प्रागैतिहास काळातील कातळशिल्पे आहेत.
z [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या