आगळं वेगळं – दीर्घायुष्याचे गुपित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगल गोगटे

ओकिनावातील लोकांच्या शब्दकोशात ‘सेवानिवृत्ती’ हा शब्दच नाही. त्याऐवजी इकिगाय (ज्या कारणासाठी तुम्ही सकाळी जागे होता) आहे. चांगली जनुकं, योग्य आहार आणि व्यायाम यांच्या जोडीला जगण्याची प्रबळ इच्छा. ही लांब आयुर्मर्यादा असण्याची कारणं आहेत. जगण्याची पद्धत ही अगदी साधी असू शकते. उदाहरणार्थ, एका 102 वर्षांच्या बाईला नातीची लहानगी नात हातात घेणं ही परमसुखाची बाब वाटते. 101 वर्षांच्या मच्छीमाराला दर आठवडय़ाला तीनवेळा कुटुंबासाठी मासे पकडणे हे परमशांतीचं आहे. एकूणच आयुष्यासाठी एक अर्थ शोधणं महत्त्वाचं.

शंभरी सहजपणे गाठलेल्या व तरीही आनंदी आणि सक्रिय आयुष्य जगणाऱया जपान्यांना पाहून जगाला त्यामागची कारणं शोधून काढावीशी न वाटली तरच नवल! या पूर्ण तत्त्वज्ञानाला त्यांनी नांव दिलं आहे ‘कायम तरुण राहण्याची कला’. त्यांच्या शब्दांत (Ikigai) इकिगाय. इकि (iki) म्हणजे जगणे आणि गाय (gai) म्हणजे कारण. म्हणजेच जगण्याला एक कारण शोधणे, ज्यामुळे आपला जगण्याचा उत्साह कायम तसाच राहील.

हे तत्त्वज्ञान ख्रिस्तपूर्व 794 ते ख्रिस्तपूर्व 1185 या काळापासूनचं आहे, पण गेल्या दशकात जगाचं त्याकडे लक्ष वेधलं आहे. मुख्य भागापासून दक्षिणेकडे असलेल्या बेटांवर राहणाऱया ओकिनावा लोकांची आयुर्मर्यादा जगात सगळ्यात दीर्घ आहे.

आपलं ‘इकिगाय’ कसं शोधायचं तर स्वतःच्या अंतरात्म्याला विचारा – मी कशामुळे आनंदी होते/ होतो ? मी काय छान करू शकते/शकतो? मला कशातून प्रेरणा मिळते? याला वेळ तर लागेल, पण इकिगायच्या पाच गोष्टी कायम ध्यानात ठेवाव्यात, ज्यामुळे आपलं इकिगाय लवकर सापडेल.

z सुरुवात लहान करा ः प्रत्येक पाऊल जपून टाका आणि ते लहान टाका. हे तर पाच आधारस्तंभांसाठीचं पहिलं मूल्य आहे, ज्या शेतकऱयांना अगदी उत्तम आणि चवदार उत्पादन काढायचे आहे, ते त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी अगदी तोलून मापून वापरतात. योग्य जमीन शोधतात. छाटणी आणि पाणी दोन्ही योग्य वेळी करतात. अशा सगळ्या गोष्टी अगदी लहान प्रमाणात सुरू करून मग मोठय़ा प्रमाणाचा विचार करतात. अशा व्यक्ती दूरवरचा केलेला विचार प्रत्यक्षात आणू शकतात.

z स्वतःला बंधमुक्त करा ः एकदा का स्वतःला बंधमुक्त केलं की, आपल्याला ज्या इतर गोष्टींनी पछाडलेलं असतं त्यातून आपण मुक्त होतो आणि मग मनातल्या एका गोष्टीवर लक्ष पेंद्रित करणं सोपं पडतं. या ठिकाणी स्वतःला स्वीकारणं महत्त्वाचं…आणि हेच तर आयुष्यातल्या सगळ्यात कठीण गोष्टींपैकी एक आहे, पण तुम्ही स्वतःला स्वीकारून व तुमच्याकडे जे आहे, त्यात आनंद मानून पुढे गेलात तर तुमचा पुढचा मार्ग तुम्हाला खूप संतोष देऊ शकतो.

z समरसता आणि टिकाव ः आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांशी सारखेच भांडत राहिलो तर आपण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही. लागवड आणि देखभाल यातही सगळ्यांबरोबर असण्यानं आयुष्यात जेव्हा आव्हानाचे क्षण पुढे ठाकतील तेव्हा ही संगत तुमची पाठराखण करील.

z छोटय़ा छोटय़ा गोष्टींमध्ये आनंद शोधणं हे आहे चौथं मूल्य. सकाळची सुंदर हवा. एखादा गरम वाफाळत्या का@फीचा कप, झाडांमधून डोकावत येणारे सूर्यकिरण, एखादा मोकळा क्षण, एक फुलताना सुवास निर्माण करणारी कळी यात किती आनंद आहे ते अनुभवणं.

z इथे असणं आणि आता असणं ः सगळ्यात प्रगल्भ असं हे मूल्य. वर्तमानकाळावर लक्ष पेंद्रित करून प्रत्येक दिवशी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. सुमो पहिलवानांच्या मते ‘इथे व आता’ हे तयारी करताना आणि प्रत्यक्ष चढाओढीत भाग घेताना अतिशय गरजेचे आहे. इष्टतम कामगिरीसाठी स्वतःला ‘आज’ मध्ये बुडवण्याने खूप मानसिक फायदाही होतो.

‘इकिगाय जागं करणे’ (Awakening Your Ikigai) हे केन मोगी यांचं पहिलं पुस्तक, जे दीर्घायुष्याची गुपितं यावर आहे. त्याच्या जवळपास 10 लाख प्रती आतापर्यंत विकल्या गेल्या आहेत.

– [email protected]