
>> मंगल गोगटे
आपल्याला तर जवळपास माहितीच आहे आता, की आपली राहण्यासाठीची जागा हळूहळू कमी होण्याच्या मार्गावर आहे. असं म्हणताहेत की पुढील काही वर्षांतच समुद्रकिनाऱ्यावरील गावं-शहरं नाहीशी होण्याच्या वाटेवर आहेत. जागतिक तापमान वाढीमुळे अती उत्तरेकडील व अती दक्षिणेकडील बर्फ विरघळू लागलं आहेच. परिणामी समुद्राची पातळी वाढली की हेच तर होणार आहे. मानवाच्या अती विकासाच्या हव्यासापायी हवामान बदल तर अपेक्षेपेक्षा लवकर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामुळे इतरही अनेक गोष्टी घडण्याची संभावना आहे.
कदाचित आपल्याला कमी खाऊन राहावे लागेल वा आपले नेहमीचे खाद्यपदार्थ आपल्याला मिळणार नाहीत. जगभरातील सुमारे 15 टक्के हरितवायू उत्सर्जनासाठी पशुपालन जबाबदार आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला कमी मांस मिळेल. आपले मुख्य खाद्यपदार्थ सुध्दा आपल्या जेवणातून कमी होऊ शकतात आणि त्याचं कारण असेल वारंवार पडणारा दुष्काळ आणि अनेकदा अवेळी पडणारा पाऊस, जे आपल्याकडे दिसतच आहे. पास्ता, तांदूळ, फळं, भाज्या आणि कॉफी यांची स्थितीसुध्दा अशीच आहे.
वाढत्या तापमानाच्या परिणामांमुळे तांदुळातील आर्सेनिक वाढू शकतं. 2019 च्या ‘जर्नल नेचर कम्युनिकेशन्स’मधे प्रकाशित झालेल्या एका वैज्ञानिक अभ्यासात असं दिसून आलं आहे की वातावरणातील CO2 च्या एकाग्रतेमुळे आर्सेनिकची पातळी वाढते, जी सूक्ष्म जीवांव्दारे अधिक प्रमाणात सोडली जाते. दरवेळी शेतात सिंचन करताना हे आर्सेनिक तांदळाच्या धान्यामधे जमा होतं. तांदूळ हे जगातील तिसऱया क्रमांकाचं तृणधान्य आहे, त्यामुळे ही एक मोठी समस्या आहे. शिवाय तांदळाच्या पौष्टिक गुणांवर हवामान बदलाचा वाईट परिणाम झालेला आधीच आढळला आहे. संशोधकांच्या असं लक्षात आलं आहे की, तांदळातील लोह, जस्त आणि B1, B2, B5 आणि B9 ही जीवनसत्त्व उच्च कार्बनडाय ऑक्साईडची एकाग्रता असलेल्या वातावरणात कमी होतात. हे एक दुष्टचक्र आहे, कारण तांदळाचं उत्पादन 9 टक्के ते 11 टक्के मिथेनचा उत्सर्ग करतं.
सूर्यप्रकाशात तयार झालेली वांगी असोत वा छानसे रसाळ टोमॅटो, आज मिळताहेत तोवर खाऊन घ्या. विशेषतः दक्षिण युरोपमधे, भाजी उत्पादन धोक्यात आहे. 2018 मधे PANS जर्नलमधे प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार सध्याची जागतिक तापमान वाढ अशीच अव्याहतपणे चालू राहिली तर जगभरातील भाजीपाला कापणी 31.5 टक्के कमी होऊ शकते. उष्ण हवा आणि आटत आलेले जलस्त्रोतात यामुळे कित्येक भाज्यांना परिस्थिती अनुकूल होणार नाहीत. या अभ्यासात 1975 पासून हवामान बदलाचा भाजीपाला आणि त्यांची पौष्टिक तत्त्वे यावर होणारा परिणाम याबद्दलच्या 174 संशोधन पेपरांचा अभ्यास केला. निष्कर्ष असा होता की, अनेक ठिकाणी उत्पादन धोक्यात आहे.
वाढत्या तापमानाचा परिणाम फळांच्या उत्पादनावरही होतो. सफरचंदाचा रंग बदलण्यापासून, विकृत झालेल्या पेरूपर्यंत! फ्रेंच फळ उद्योगाला त्याच्या आर्थिक विकासात मदत करणाऱया आणि हवामान बदलाशी जमवून घेण्यास मदत करणाऱया ‘जिओग्राफिकल इंडिकेशन’ फळांनुसार हंगामी कॅलेंडर उलटे होऊ शकते. फळांच्या झाडाची फुलं येणं अनियमित होऊ शकतं. बिया व एक मोठी बी असलेली फळं लवकर तयार होतात. उष्ण हवामान आणि दिवसा व रात्रीच्या तापमानातील कमी झालेला फरक ही या परिस्थितीची मुख्य कारणं आहेत.
पास्ता हे अनेक देशांचं मुख्य अन्न आहे, तोही गव्हाचा. हा डुरम जातीच्या गव्हापासून बनवला जातो. त्याऐवजी ज्वारी वा चण्याचा पास्ता कुणालाही नको असतो. आपण हा प्रश्न गंभीरपणे घ्यायला हवा. कारण फ्रेंच पास्ता मॅन्युफॅक्चरर्स युनियनने हवामान बदलांमुळे धोक्याची घंटा वाजवली आहे. फ्युसिली, पेन्ने, मॅकरोनी आणि इतर पास्ता प्रकारांच्या उत्पादनासाठी आवश्यक अशा डुरम गव्हाच्या शेतात दुष्काळ आणि संतत पावसामुळे शेती उद्ध्वस्त होत आहे. ऑगस्टमधे असं सांगण्यात आलं की, कॅनडातील या उन्हाळ्यातील दुष्काळात येथील गव्हाची कापणी 32 टक्के कमी होईल. शिवाय गव्हाच्या गुणवत्तेवर परिणाम होईल तो वेगळाच. आपल्याकडे तर पावसाबद्दल काही अंदाज बांधणंसुध्दा कठीण झालंय. त्यामुळे आपल्या ताटातील पोळी-भाकरीदेखील किती दिवस नक्की मिळेल आणि पोटभर मिळेल की नाही याबाबत साशंक असणं योग्य होईल. असं म्हणतात की, उष्णता वाढीमुळे कॉफीची चव बदलेल. कॉफी उंचावर आणि जरा थंड हवामानात छान वाढते. जगातील सगळ्यात जास्त प्यायलं जाणारं पेय म्हणजे कॉफी. खरं तर आणखीही अशी उत्पादने असतील ज्यात बदल होऊ शकतात, हे आपण लक्षात ठेवायला हवं.
[email protected]




























































