आगळं वेगळं – राजा भीमदेव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगल गोगटे

आपल्यापैकी बहुतेकांसाठी मुंबईचा इतिहास सुमारे 1661 च्या सुमारास सुरू होतो. त्यावेळी इथली ही सहा बेटं ब्रिटिशांना लग्नामध्ये हुंडय़ात मिळाली, जेव्हा पोर्तुगीज कॅथरीन ब्रगॅन्झाचं इंग्लंडच्या चार्लस (दोन) बरोबर लग्न झालं. प्रत्यक्षात त्या आधीपासूनचा मुंबईचा इतिहास सहज सांगता येईल. पाषाण युगातही इथली बेटं आणि शहराच्या काही भागांचं वर्णन असल्याचं आढळतं. असं असलं तरी असं सहज म्हणता येईल की इंग्रजांच्या खूप आधी भीमदेव नावाच्या राजाचं यापैकी एका बेटावर राज्य होतं. या राजाचं एखादं चित्र देखील आता उपलब्ध नाही, पण जिथे त्याचं राज्य होतं ते माहीम आजही आहे.

तेराव्या शतकात भीमदेवच्या राज्याची राजधानी माहिकावती, आजचं मुंबईतलं माहीम येथे होती. या राजाचं मूळ कुठलं ते माहीत नाही. कदाचित ते अनहिलवाडा (पाटण) वा गुजराथ वा देवगिरीच्या यादवांच्या वंशातलं असू शकेल. तो देवगिरीचा राजा रामरावदेवाचा मुलगा असावा असा अंदाज आहे. एका पर्शियन फर्मानात भीमदेवाचा उल्लेख भीमबाशाह असा आहे. हा राजा अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणात हरला आणि अकरा सरदार आणि एक राजघराण्याचा पुजारी यांच्याबरोबर कोकणातील पामेरा, शिरगाव येथे पोचला. नंतर 1290 च्या सुमारास तो माहिकावती इथे पोचला.

भीमदेवाने प्रभादेवीत एक महाल आणि न्यायालय बांधलं. तसंच बाबुलनाथचं पहिलं मंदिरही त्यानेच बांधलं. इथे आजूबाजूला असलेल्या बाभूळ झाडांमुळे या देवाचं नाव बाबुलनाथ असं पडलं. शिवाय त्याने प्रभादेवीत एक मंदिर बांधलं.

या बेटांवर राहण्यासाठी त्याने पाचकळशी, पाठारे प्रभू, भंडारी, आग्री, भोई, पाल्शी, ब्राह्मण अशा अनेकांना पाचारण केलं. यातले भंडारी ताडी काढणारे होते, तर वाडवळ बागा करणारे होते. सगळ्यात विशेष गोष्ट ही की त्याने अनेक फळांच्या झाडांबरोबर नारळाची झाडं देखील आणली. एवढंच नाही तर ती इथे छान रूजली आणि सासरी जाऊन रूळलेल्या मुलीसारखीच इथलीच होऊन राहिली. इतकी की ती मूळ इथलीच असं आपल्याला कायम वाटत राहिलं.

राजा भीमदेवचं एकही चित्र आज अस्तित्वात नसलं तरी जी काही माहिती आहे त्याप्रमाणे तो एक पक्षपात वा भेदभाव न करणारा आणि न्याय्य राजा होता. त्यामुळेच तर त्याने इतके वेगवेगळे लोक जमा केले आणि सगळे गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होते. त्याने एकूण किती वर्ष राज्य केलं हे इतिहासाला ज्ञात नसलं तरी त्या काळात अनेक जाती–जमातीचे लोक माहिकावतीमध्ये आले, संपन्न झाले आणि स्थिरावले. तो मात्र आग्री जातीचा होता, असं म्हणतात. हे अनेकांना माहीत आहे की मुंबई बेटाची पूर्वीची राजधानी माहिकावती होती.

1348 मधे माहिकावती गुजरातच्या मुस्लिम राजांनी काबीज केली आणि 1534 पर्यंत ती त्यांच्याच ताब्यात राहिली. बहादूर शहा आणि नुनो द कुन्हा हे पोर्तुगीज गव्हर्नर यांच्यामध्ये बसीन (वसई) येथे झालेल्या कराराप्रमाणे हे बेट पोर्तुगीजांच्या हाती गेलं.

17 व्या शतकाच्या शेवटी ही बेटं मुघलांनी ताब्यात घेतली आणि 18 व्या शतकात ही बेटं व्यापाराची बंदरं झाली. इथून साऱया जगाशी, उदाहरणार्थ बसरा व मक्काशी व्यापारी संबंध जोडले गेले. 19 व्या शतकात या बेटांनी हळूहळू वेगळा आकार घ्यायला सुरुवात केली आणि काही वर्षांतच माहिकावती आताच्या माहीम मध्ये बदलली.

आता आपल्याला हे माहीत आहे की बेटांचं असलेलं हे मुख्य शहर माहीमपाशी संपतं. माहीम कॉजवेच्या उत्तरेकडे असलेली सगळी आहेत उपनगरं. आता माहीममध्ये भीमदेवाच्या राज्यानंतर अनेक शतकांनी बांधलेला आणि मोडकळीस आलेला फक्त एक किल्ला आहे जो जुन्या गौरवशाली जमान्याची आठवण करून देतो.

[email protected]