
>> मंगेश उदगीरकर
आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगत विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना…
माझ्या लहानपणी आमच्या खेडय़ामध्ये लाइट अजून यायची होती. त्यावेळी सायंकाळी दिवेलागणीची वेळ झाली की, कंदील, चिमण्या यांचे काचेचे फुगे आम्ही राखेने पुसून स्वच्छ करायचो, त्यात रॉकेल भरायचो आणि वाती वर काढून त्या लावायचो. मग घर उजेडाने भरून जायचे! मग सोप्यात, ओसरीवर कंदील टांगले जायचे. उजेड तसा मिणमिणता असला तरी त्या काळोखात सगळं लख्ख दिसायचं. रात्रीची जेवणं त्या एकमेव कंदिलाच्या साक्षीनं व्हायची ! पानात काय वाढलंय हेही नीट दिसायचं नाही, पण त्या जेवणाला जी चव असायची ती आज मोठमोठी हॉटेलं पालथी घातली तरी मला आजतागायत सापडलेली नाही. सायंकाळी येसकर दारात यायचा. त्याच्या पदरात माझी आई दोन जाड भाकऱया आणि कालवण घालायची. येसकराचं काम म्हणजे त्या छोटय़ाशा खेडय़ात दिवे लावण्याचं असायचं. प्रत्येक गल्लीच्या कोपऱयावर खांबावरच्या दिव्यात तेल घालून ते पेटवणे. ते चौकोनी काचेचे दिवे गावाची शोभा वाढवून जात. रात्री जेवणखाण झालं की, गावातल्या मंदिरामध्ये भजनी मंडळ जमा व्हायचं. त्यावेळी स्पीकर नसायचे, पण तरीही भजनी मंडळाचा गलबला सगळ्या गावात पोचायचा. एखादा ‘तारस्वर’ आर्त होऊन जायचा आणि आम्ही त्या लयीत गुंग होऊन नकळत निद्राधीन होऊन जायचो. तशी झोप आज गोळ्या घेऊनही लागणे मुश्कील.
नंतर काळ बदलला, गावात लाइट आली. आमच्याही घरी ‘फिटिंग’ सुरू झाली. पांढऱया रबरी वायरी रेघारेघाच्या लाकडी पट्टय़ांमध्ये बंदिस्त केल्या गेल्या. मोठमोठे चौकोनी खटके बसवले गेले. कनेक्शन आले, होल्डरमध्ये ‘गोळे’ बसवले गेले. आमचा बाल चमू हे सगळं अपूर्वाईनं पाहत होता आणि एका संध्याकाळी वडिलांनी एक खटका ओढला ‘खट्’ आणि जो चमत्कार घडला तो आठवून आजही अंगावर शहारे येतात. त्या एका खटक्याने संपूर्ण सोफा उजळून निघाला. जसा काही दिवसच उजाडला! लगेच ओसरीवरचा गोळा लागला आणि मग तर सगळं घरच प्रकाशानं न्हाऊन निघालं… आणि मनही! नंतर कंदील, चिमण्या, एक्के इतिहासजमा होऊन गेले. सायंकाळची आमची दिवे लावण्याची करमणूक पडद्याआड गेली. आता रात्री जेवताना पानात काय वाढलंय हे स्पष्ट दिसायला लागलं आणि जेवणातली ती ‘चव’ही हरवून गेली. ते इतकं बाळबोध वातावरण होतं की, संध्याकाळी देवासमोर दिवा लागला की, आपोआप हात जोडले जात आणि ‘शुभंकरोती’ सुरू व्हायची आणि ‘आरोग्यम् धनसंपदा’वर संपायचं. त्यावेळी घरोघरी दणकट तब्येती असण्याच्या मुळाशी हेच कारण असावं!
तेव्हाची दिवेलागणी आणि आजची यात काळाच्या ओघात फरक असला तरी काही गोष्टी कायम राहिल्या आहेत. कायम राहिलेल्या गोष्टींमध्ये दोन प्रामुख्याने येतात, त्या म्हणजे एक देवघरातला दिवा आणि उदबत्ती ! बाकी ‘शुभं करोती’ वगैरे बऱयाचशा घरातून अभावानेच ऐकू येतं, पण दोन मिनिटं का होईना, देवासमोर हात जोडणे मात्र कायम राहिलंय हेही नसे थोडके! अर्थात ती गरजही आहे. ‘संध्याछाया भिवविती हृदया’ ही भावना काही उतारवयातल्या लोकांचा मक्ता नसतो! ती वेळच अशी असते की, विनाकारण मनात काहूर निर्माण करून जात असते. त्यासाठी का होईना, देवासमोर हात जोडले जातात. काही म्हणा, पण धीर येतो हे मात्र खरं! निरांजनातली शांत तेवत असणारी वात आणि उदबत्तीचा सौम्य दरवळ भरकटलेल्या मनाला कुठेतरी स्थैर्य देऊन जातो.
सकाळ आणि सायंकाळ या बहिणींमध्ये सकृतदर्शनी सारखेपणा दिसत असला तरी स्वभावात फरक आहे. सकाळ ही नुकत्याच जन्मलेल्या बालकासारखी गोजिरवाणी असते, निरागस असते. प्रत्येक प्राणिमात्राला नवजीवन प्रदान करणारी असते. आशा, आकांक्षांना बळ देणारी असते. हसरी, प्रसन्न, मंगलदायी असते. मनातली काळजीची जळमटे काढून टाकणारी असते, तर संध्याकाळ ही परिपक्व असते. दिवसभरातल्या कडूगोड अनुभवांचे गाठोडे पाठीवर घेऊन चालताना थकून गेलेली असते. या गाठोडय़ात काळज्या, चिंता यांचा भरणा जास्त असतो. सायंकाळच्या वेळेला ‘कातर’ असं संबोधलं जातं ते यामुळेच. सकाळ उजेडाचा वारसा घेऊन आलेली असते, तर संध्याकाळ अंधाराचा! अशा वेळी धास्तावलेल्या जीवाला एकमेव आधार असतो तो कधीही न पाहिलेल्या, पण तरीही आपलं अस्तित्व अबाधित ठेवणाऱया ईश्वराचा. देवघरातल्या निरांजनाली ज्योत ही अशा वेळी निर्गुण निराकार असं ईश्वराचं रूप लेवून आल्यासारखी भासत असते, त्या मंद प्रकाशात देवघरातली परमेश्वराची रूपे विलोभनीय दिसत असतात. आपण हात जोडून त्या रूपांना शरण गेलेलो असतो. मग संध्याकाळही समजूतदार होऊन जाते. धीर देते आणि दिवेलागणी संपन्न होऊन जाते.




























































