
>>मंगेश उदगीरकर
आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.
खाणे आणि गाणे यावर मी अनेकदा लिहिले आहे, पण मला यावर पुनः पुन्हा लिहावेसे वाटते. का? याला उत्तर नाही. त्यातल्या त्यात मी खाण्यावर जरा जास्तच प्रेम करत आलो आहे. मी काही कुंभकर्णासारखा हादडणारा नाही, पण जे खातो ते चवीने खाण्याकडे माझा कल आहे हे मात्र निश्चित! आमिष, सामिष असा काही भेदभाव मी कधीच केला नाही. तरीही मी मांसाहारी नाही असे सांगण्याइतपत ते फार कमी, अभावानेच ग्रहण करतो. थोडक्यात, ‘आले अंगावर घेतले शिंगावर’ अशापैकी. मला व्हेज प्रचंड आवडते. कारण त्यात इतक्या व्हरायटीज असतात की, एकेक पदार्थ आठवला की, तोंडाला पाणी सुटावे. शिवाय, मला ते शिजवायलाही आवडते. त्यामुळे बायकोही खूश असते.
माझ्या लहानपणी आम्ही गावाकडे जायचो, तेव्हा आमच्या भागणाची कारभारीण पितळीमध्ये गरम हातसडीच्या आसट गुलाबी भातावर नुकतेच काढलेले निरसे दूध ओतून माझ्यासमोर ठेवायची. ती चव मी कधीच विसरू शकत नाही. आमची अक्का-आई जी वांग्याची ओली भाजी करायची, तशी भाजी मला प्रयत्न करूनही अद्याप जमू शकली नाही किंवा रात्री ती जे कांद्याचे आंबट वरण करायची, ते इतके खमंग असायचे की, त्यासोबत किती भाकऱया कुस्करल्या त्याचा हिशेब मी अजूनही मांडतोय. असाच एकदा गावाकडे गेलो होतो, तेव्हा अक्का म्हणाली, ‘‘अरे, दोन-चार कैऱया तोडून आण, तुला पन्हे करून घालते.’’ मी विसरून गेलो. रात्र झाली होती. माझ्या विसरभोळेपणावर ती ओरडली, पण मी जेव्हा जेवायला बसलो तेव्हा वाटीत पन्हे होते. ते तिने चिंचगूळ वापरून केले होते. तसे पन्हे त्यानंतर मी कधीच चाखले नाही. माझ्यावर चवदार जेवणाचे संस्कार करणारी माझी पहिली गुरू म्हणजे माझी आई!
तिचा संपूर्ण नसला तरी बराचसा गुण मी घेतला आहे अशी माझी समजूत आहे. मला खाऊ घालायला मनापासून आवडतं. अर्थात माझी पहिली शिकार असते माझी बायको. ‘‘तुम्ही किचनमध्ये पाय ठेवायचा नाही!’’ इत्यादी तिच्या धमक्यांना दाद न देता मी काहीना काही लुडबूड करतच असतो. थोडी खुशामत करावी लागते एवढेच! मग एखाद्या प्रसन्न सकाळी पिवळय़ाधमक पोह्याची डिश तिच्या हातात ठेवताना मी कृतार्थ होऊन जातो. ‘‘मी आज इडली करणार आहे’’ अशी घोषणा झाली की, मी गडबडीने ओल्या नारळाची चटणी करतोच. आता तिलाही याची सवय होऊन गेली आहे. त्यामुळे फारसा विरोध होत नाही.
शेवटी चव महत्त्वाची! आमचे चिरंजीव एखाद वर्षाचे झाले असतील त्या वेळी त्याला खाण्याची सवय लावण्यासाठी मी गुरगुटय़ा भात त्यावर साजूक तूप, साधे वरण, त्यावर सायीसकट दूध कालवून त्याचे घास भरवायचो. त्यानंतर हे घोडं विशीत आलं तरी फर्माईश करायचं, ‘‘बाबा! भात कालवून द्या!’’ हिच्या चिडचिडीकडे लक्ष न देता मी ते काम आनंदाने करायचो! केवळ मसाल्यांची लयलूट केली म्हणजे पदार्थ चांगला होतो असे नाही. साधी कद्दूची भाजी घ्या. केवळ हळद, मिठाने ही भाजी किती चवदार होते! नाहीतर हाच कद्दू शिजवून त्यात गोडसर दही टाकून माफक फोडणी टाकून वाढा, नुसते ओरपत राहाल. एकेकाळी आमच्याकडे गुऱहाळ व्हायचं. त्या वेळी गुळाच्या पाकाचे डबे भरून ठेवलेले असायचे. अक्का सकाळी खपट ज्वारी-गव्हाचे जाड रोट भाजायची, त्यासोबत नुसत्या तिखटमिठाचा झणझणीत भुरका आणि साजूक तूप घातलेला गुळाचा पाक. आम्हा भावंडांच्या स्थूल प्रकृतीचे गूढ इथे उकलते.
अजूनही साबुदाण्याची खिचडी असो की वांग्याची भाजी असो, चिरंजीव माझ्या हातची खाण्यासाठी आग्रही असतात. याचा अर्थ ‘ही’ चांगली करत नाही असे नाही, पण त्याला ती सवयच पडून गेली आहे. बालपणी मी माझ्या वडिलांशेजारी जेवायला बसायचो. त्यांचे भात कालवणे मला प्रचंड आवडायचे. एखादा गायक जसा ख्याल रंगवतो तशापैकी ते कालवणे असायचे. मी अधाशीपणाने ते पाहायचो. त्यांचे घास मोठे असायचे. माझ्याकडे मिस्कीलपणे पाहत ते माझ्या पानात त्यांचा एक घास ठेवायचे. माझ्या चिमुकल्या हाताने मी तो घास संपवायचो. आज मी जवळपास त्यांच्या वयापर्यंत पोचलो आहे, पण ही आठवण मला लहान करून जाते.
खाण्यावर जितके लिहावे तितके थोडे. बाकी कशात नसलो तरी या क्षेत्रात मी श्रीमंत आहे हे नक्की. आता रात्रीचे दहा वाजत आले आहेत, डोळय़ांवर झापड येते आहे, पण मनात एकच विचार… उद्या सकाळचा नाश्ता काय असेल? चलो कल मिलेंगे…





























































