अवलिया- विलास जतकर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

>> मंगेश उदगीरकर

 

आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते.  हे  तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.

 

मी तसा पुरेसा सहनशील आहे, असं माझं माझ्या विषयीचं मत आहे. माझा हा गुण वृद्धिंगत करणाऱया व्यक्तींमध्ये माझ्या मित्रांचा खूप मोठा वाटा आहे. इतके तऱहेतऱहेचे मित्र माझ्या वाटय़ाला आलेले आहेत की, कधी कधी माझाच मला हेवा वाटून जातो. यापैकी अनेकांना मी माझ्या वेडय़ावाकडय़ा अक्षरात ‘उभे’ केले आहे. पण संख्याच इतकी अफाट आहे की, माझ्या क्षीण स्मरणशक्तीमुळे एखादा थोडा बाजूला पडून जातो. मग रात्रीच्या वेळी म्हणजेच माझ्या लिखाणाच्या वेळी एखादा जिवाभावाचा सखा मनाच्या पटलावर टकटक करतो. मी दार उघडतो. समोर तो उभा असतो.

“आयला, जत्या तू?” तो प्रसन्न हसत सरळ मध्ये येतो. त्याच्या येण्याने क्षणार्धात मी तीस-पस्तीस वर्षांनी लहान होऊन जातो. ती रात्र कशीही असो, माझ्यासाठी ती चांदरात होऊन जाते!

‘विलास जतकर’ हे त्याचे मस्टरवरचे नाव असले तरी अगदी पहिल्या भेटीपासून तो माझ्यासाठी ‘विल्या’ किंवा ‘जत्या’च राहिला. मध्यम उंची. सुगठीत बांधा, कपाळावर रुळणाऱया केसांच्या आकडय़ासह व्यवस्थित विंचरलेले केस, कमानदार भुवया, खाली पाणीदार मोठे डोळे, सरळ नाकाखाली मिश्यांचा खाली उतरत गेलेला घोस… एकूण व्यक्तिमत्त्व छाप पाडणारे आणि कुणालाही आपलेसे करणारे. विल्या आणि मी बँकमेट! एकाच बँकेत लागलेले. त्याचे कुटुंब होते. त्याची आई, बायको आणि दोन मुले. मुले लहान होती, पण आई आणि वहिनी यांनी मला त्यांच्यात सामावून घेतले होते. माझे नुकतेच लग्न झालेले. म्हणजे तो सर्वार्थाने मला सीनियर होता. बायको माहेरी गेली की, माझा पडाव जेवणाखाण्यासाठी त्याच्याकडेच पडलेला असायचा.

जत्या म्हणजे विलक्षण रसायन होते. एका शब्दात सांगायचे तर तो ‘हरफनमौला’ होता! त्याला प्रत्येक गोष्टीत गती होती. घर बांधायचे धूसर स्वप्न बघणाऱया आम्हा मध्यमवर्गीयांमध्ये प्लॉट घेऊन घर उभारणीच्या तयारीला लागलेला हा पठ्ठय़ा एकमेव. घराचा प्लॅन याचाच. नगर परिषदेकडून प्लॅन मंजूर करून घेणे, बांधकामासाठी मुकादम नेमणे, पाया खोदण्यासाठी रास्त भावात कामगार नेमणे इत्यादी आमच्या गावीही नसणाऱया गोष्टी हा बँक सांभाळून सहज करत राहिला. सहा महिन्यांत तर एक सुबक बंगली उभी केली याने.

एकदा सहज त्याच्या बांधकामावर गेलो होतो, तर हा फरश्यांचे तुकडे, सिमेंट कालवलेले घमेले, हातात थापी घेऊन काहीतरी करत होता.

“काय करतोयस?”

“अरे, किचन ओटा तयार करतोय ! त्या ‘राज’ला ते जमेनासं झालंय!”

त्याने जो ओटा बांधला होता, त्याचे फोटो काढून लोक नेत होते. त्यांना असाच ओटा बांधून हवा होता. विल्या जे करायचा ते परफेक्ट असायचे. त्याच्या पोरांच्या कटिंगा तो स्वत:च करायचा. पिढीजात नाभिकानेही ओशाळावे इतक्या त्या सुरेख असायच्या. दोघा नवराबायकोला खाण्याचा प्रचंड शौक. तेही सामिष! माझ्यासारख्या ऋग्वेदी ब्राह्मणाला हे खायची दीक्षा त्यांच्याकडूनच मिळालेली. त्याच्याकडे मी जे नाना तऱहेचे पदार्थ चाखले ते ऐकले तर अस्सल खाणारेही मान खाली घालतील. आज मी हे लिहितोय खरा, पण माझे सनातनी मित्र नक्कीच माझ्या नावाने बोटे मोडणार आहेत हे माहित आहे. मासे तर कितीतरी प्रकारचे याने मला खिलवले आहेत. त्याला गणती नाही. बाकीच्या प्राण्यांची आणि पाखरांची नावे मी टाळतो आहे. असो.

“चल मंग्या, मटण घेऊन येऊ!” म्हणत तो मला बाजारात घेऊन जायचा. टांगून ठेवलेल्या बकऱयाच्या धूडासमोर उभा राहायचा आणि बोटाने दाखवत “ये दे दो, वो दे दो,” सांगायचा तेव्हा तो खाटीक हैराण होऊन जायच.

“साब, अब इसमे बेचने के लिये रहा ही क्या?” असे वैतागाने म्हणायचा.

याने घरात कधीही मेपानिक आणलेला माझ्या ऐकिवात नाही. इलेक्ट्रिकपासून घरातल्या कुठल्याही औजारापर्यंत हा सगळी कामे अत्यंत कुशलतेने करायचा. यासाठी लागणाऱया सगळ्या हत्यारांची एक मोठी पेटीच त्याच्याकडे होती. स्क्रू ड्रायव्हर, पकड, हातोडी, खिळे, कसल्या कसल्या लाकडी पट्टय़ा असा खजिनाच त्याने बाळगला होता. विल्या उपजत कारागीर होता.

त्याचे माझे एकदाच कशामुळे तरी बिनसले होते आणि या ऋजू स्वभावाच्या माणसाने माझ्याशी अबोला धरला. मी सुरुवातीला फारसे मनावर घेतले नाही. पण नंतर नंतर मी अस्वस्थ व्हायला लागलो. मग मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करू लागलो. हा शांतच. माझी तगमग होऊ लागली. शेवटी असह्य होऊन मी त्याला गाठले आणि म्हणालो, “जत्या, तुझ्या पाया पडतो. दोन हाण मला, पण काहीतरी बोल यार…” त्याने माझ्याकडे पाहिले, प्रसन्न हसला. “गाढवा, मी तुझ्यावर रागावणं शक्य तरी आहे का? मी आपली तुझी मजा घेत होतो राजा.”

वयोमान म्हणा, जगरहाटी म्हणा, आम्ही आता दूर फेकले गेलो आहोत. म्हणावा तसा संपर्क आता होत नाही, पण एखाद्या दिवशी अवचित त्याचा फोन येतो, “काय मंग्या, काय चाललंय?”

आई शपथ, त्या दिवशी वयातली तीन तपे गळून पडतात…

[email protected]