ललित – भुजंगराव! 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश उदगीरकर

आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.

परभणीत असताना आमच्या त्रिमूर्ती नगरामध्ये एक व्याख्यानमाला ठेवण्याचे घाटत होते. रामकृष्ण पांडे, प्रभाकरराव देशमुख इत्यादी विचार करत होते की, नेमके कोणत्या वक्त्याला बोलवावे. इथे देवीदास कुलकर्णी आमच्या मदतीला आला.
‘‘अरे, सोनपेठच्या भुजंगराव देसायांना बोलवूया!’’
त्या क्षणापर्यंत भुजंगराव नेमके कोण याची आम्हाला माहिती नव्हती. देवीदासने थोडी माहिती दिली होती. ते पुराणकालीन घटनांवर बोलतात, एकपाठी आहेत इत्यादी. देवीदासला बरोबर घेऊन आम्ही सोनपेठला गेलो. सोनपेठमधले त्यांचे घर म्हणजे एक पडका वाडा होता. दोन-तीन मोडकळीला आलेल्या दगडाच्या खोल्या, समोर तण माजलेले अंगण, जाण्यायेण्यामुळे पडलेल्या पायवाटेवरून आम्ही घरात गेलो.
‘‘या, या!’’
समोर एक शिडशिडीत व्यक्तिमत्त्व उभे होते. डोईच नव्हे तर भुवयाही शुभ्र. काळसर वर्ण, गालाची हाडे वर आलेली. तीक्ष्ण, तेजस्वी डोळे, अंगात पांढरा सदरा, खाली धोतर. त्या धोतरावरची छिद्रे माझ्या डोळ्यांवर आघात करून गेली.
‘‘नमस्कार अण्णा!’’ देवीदासने ‘‘हेच ते’’ असे सुचवले. आम्हीही नमस्कार केला. घरात दोघेच. ते आणि वहिनी. घराची अवस्था कनिष्ठ मध्यमवर्गीय दिसत होती. कशीबशी गुजराण होत असावी. आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्यांच्या बोलण्यामध्ये कुठेही ‘‘मी’’ डोकावत नव्हता. अत्यंत नम्र, मृदू बोलणे. माऊलींनी आम्हाला लिंबाचे सरबत देऊन स्वागत केले. आम्ही व्याख्यानमालेचा विषय काढला.
‘‘कुठला विषय?’’
‘‘महाभारत!’’ त्यांचा चेहरा खुलला.
‘‘विषय मोठा आहे! एका व्याख्यानात हे बसणे अवघड आहे!’’
‘‘अण्णा, सात दिवसांची व्याख्यानमाला ठेवायचा विचार आहे!’’
‘‘अरे वा! विस्ताराने बोलता येईल. नक्की येतो !’’
‘‘अण्णा, मानधन…’’
‘‘देवा ! मी निर्धन ! मला परभणीला न्या आणि आणून पोचवा, बस !’’
‘‘तसे नाही, पण त्याव्यतिरिक्त आम्ही आपल्याला फूल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी…’’
‘‘त्याची काही गरज नाही ! मी एकभुक्त आहे. वाटीभर वरण आणि एक भाकरी एवढी व्यवस्था केलीत तर पुरे आहे!’’
माझ्या डोळ्यासमोर जाता येता एसी गाडी, रात्रीचे अपेयपानासोबत सामिष जेवण, आलिशान लॉज आणि वर मजबूत मानधनाची मागणी करणारे अनेक गरीब साहित्यिक तरळून गेले.
यथावकाश आम्ही त्यांना परभणीला आणले. पांडेंच्या घरी त्यांची राहण्याची सोय केली. देशमुखांच्या ‘पार्वती’ मंगल कार्यालयात त्यांची व्याख्यानमाला ठेवली. त्याचे पहिले पुष्प गोवताना त्यांनी जी प्रस्तावना केली ती मी आयुष्यात कधी विसरणे शक्य नाही. बोलण्याच्या ओघात त्यांनी शंभर काwरवांची नामावळी सांगितली! अत्यंत रसाळ भाषा, आपले ज्ञान श्रोत्यांपर्यंत पोचवण्याची तळमळ जाणवून जात होती. पहिल्या दिवशी पाचपन्नास श्रोते होते. नंतर तो प्रचंड हॉल अपुरा पडायला लागला! लोक देहभान विसरून आतापर्यंत न ऐकलेले महाभारत ऐकत होते. या साध्याशा दिसणाऱया अवलियाने आपल्या जवळची ज्ञानाची हिरेमाणके मुक्तहस्ते उधळून टाकली होती! वाक्यागणिक त्यांचा अभिनिवेश, योग्य शब्दांची निवड थक्क करून सोडणारी होती.
व्याख्यानमाला व्यवस्थित पार पडली. शेवटच्या दिवशी समारोपाच्या वेळी आम्ही दिलेले मानधनाचे पाकीट त्यांनी नम्रपणे नाकारले.
‘‘देवा! वेळात वेळ काढून तुम्ही माझे अडाण्याचे चार शब्द ऐकले! मी तुमच्या ऋणात मायबापहो!’’ असे बोलून त्यांनी निरोप घेतला.
या सात दिवसांत त्यांची जी माहिती मिळाली होती ती अविश्वसनीय वाटणारी होती. हे स्वातंत्र्य सैनिक, पण स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारी हक्काची पेन्शन यांनी नाकारली! ‘‘याच्यासाठी लढलो नाही! देशासाठी लढलो!’’ असे वक्तव्य करणाऱया, गरिबीत दिवस काढणाऱया या माणसाची उंची मोजायला कुठलेही मोजमाप अपुरेच! या ‘अडाणी’ माणसाकडे मार्गदर्शनासाठी रामभाऊ, शेवाळकर, नरहर कुरुंदकरांसारखे प्रकांड पंडित यावेत? मोहमायेवर विजय मिळवणाऱया साधुसंतांविषयी वाचले, ऐकले होते, पण या आधुनिक काळातला हा धोतर, सदऱयात वावरणारा सामान्यातला असामान्य ऋषी मला ‘याचि डोळी याचि देही’ पाहायला, अनुभवायला मिळाला हे माझे थोर भाग्य!

 [email protected]