>> प्रा. मिलिंद जोशी
मायमराठीचा जयजयकार करताना आपल्यातली ‘मराठीपणाची’ ज्योत तेवत ठेवणे महत्त्वाचे आहे. भाषा आणि संस्कृतीची स्पंदने प्रथम मनात उमटतात. नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकटतात. दिखाऊपणासाठी मराठीचे प्रेम नको. आंतरिक जाणिवेतून ते प्रकट होत राहिले तर भाषा आणि संस्कृती कधीच मरत नाही.
आपली भाषा जीवनाच्या सर्व क्षेत्रांत कार्य करीत असते. जीवनात नवी क्षेत्रे निर्माण होतात तेव्हा आपल्या भाषेतही परिवर्तन घडत असते. आजपर्यंत झालेल्या सर्व साहित्य संमेलनांमध्ये मराठी भाषेच्या अस्तित्वाची काळजी व्यक्त झालेली आहे. आजच्या तरुण पिढीला मराठीशी काहीही देणेघेणे नाही, ती मराठीत बोलत नाही, मराठी संस्कृती लयाला चालली आहे वगैरे वगैरे असे निराशेचे सूर आळवणारी मंडळी जागोजागी दिसतात. या प्रकारचे निष्कर्ष शहरातील मराठी भाषेची स्थिती पाहून काढले जातात, पण महाराष्ट्रातील तीन-चार मोठी शहरे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे हे निष्कर्ष काढणाऱयांना कुणीतरी सांगणे गरजेचे आहे. मी पुण्यात वास्तव्याला असलो तरी मूळचा ग्रामीण भागातला आहे. ग्रामीण महाराष्ट्रात साहित्यिक कार्पाम आणि व्याख्यानांच्या निमित्ताने माझी भ्रमंती सुरू असते. ग्रामीण महाराष्ट्रात आपले ‘मराठीपण’ उत्साहाने जपणारी असंख्य माणसे पाहायला मिळतात. ती उत्तम मराठी बोलतात. त्यांना त्यांच्या बोलींचा अभिमान असतो. तिथे मराठी साहित्यविषयक कार्पामांना, व्याख्यानांना मोठय़ा संख्येने रसिक येत असतात. गावोगावी ग्रंथ प्रदर्शन भरविणारी माणसे त्या लोकांपर्यंत जात असतात. पुण्या-मुंबईतल्या माणसांइतकी पुस्तके विकत घेण्याची ऐपत कदाचित या ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांकडे नसेल, पण तरीही ते त्यांच्या ऐपतीप्रमाणे पुस्तके विकत घेत असतात. हे सारे मला खूप आशादायी वाटते.
2020 साली हिंदुस्थान महासत्ता होणार हा जसा एक फुगा होता आणि महानगरातल्या महिन्याला लाख रुपये पगार मिळविणाऱया काही तरुणांकडे पाहून तो फुगविला जात होता, तर दुसरीकडे पदवीधर झालेल्या अनेक तरुणांना साधी नोकरीही द्यायली कुणी तयार नव्हते. हे स्वीकारायला कठीण असले तरी वास्तवच आहे! मराठी जगते आहे की मरते आहे? यासंदर्भातले निष्कर्ष आणि अनुमान केवळ शहरांतील मराठीच्या अवस्थेवरून आपण काढणार आहोत का? हा खरा प्रश्न आहे. शहरातली मराठी भाषेची प्रकृती ठीक नाही हे मान्य केले तरी मराठीच्या दुरवस्थेविषयी गळे काढण्याची आवश्यकता नाही. जागतिकीकरणानंतर आणि तंत्रज्ञानाचा विस्फोट झाल्यानंतर एकूणच जागतिक जीवनशैलीत जे बदल झाले आहेत त्याचे परिणाम त्या त्या राष्ट्रातल्या भाषा आणि संस्कृतीवरही झाले आहेत. त्यामुळे भाषा आणि संस्कृतीचा पोत बदलत असला तरी त्या नष्ट होतील याची भीती बाळगण्याचे कारण नाही.
सुटाबुटात वावरणारी, इंग्रजीवर प्रभुत्व असणारी, तरीही संवादाच्या वेळी अस्सल मराठीत आवर्जून बोलणारी कितीतरी मुले भेटतात. नव्या पिढीचे भाषाप्रेम, साहित्यप्रेम आणि वाचनप्रेम नव्या पद्धतीने व्यक्त होत असेल तर त्याचेही स्वागत करायला आपण शिकले पाहिजे. मी ज्या ज्या वेळी अनेक छोटय़ा – मोठय़ा ग्रंथालयांना भेटी दिल्या, त्या त्या वेळी मराठी विषय घेऊन स्पर्धा परीक्षा देणारी कितीतरी मराठी आणि अमराठी मुले मला मोठय़ा संख्येने दिसली. मराठी वाङ्मयाचा इतिहास आस्थेने अभ्यासताना मी त्यांना पाहिले. हे चित्र आश्वासक नाही का?
आसपास एवढे सारे बदल घडत असताना मराठी भाषेच्या नावाने गळे काढणारे काय करत असतात? काळाची पावले ओळखून या बदलत्या काळात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अधिक समृद्ध व्हावी यासाठी कोणते प्रयत्न करतात? आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. या युगात आपली भाषा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कशी सशक्त होईल, अधिक लोकांपर्यत जाईल यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असताना तसे प्रयत्न का होताना दिसत नाहीत याचेही चिंतन केले पाहिजे.
कोणतीही भाषा समृद्ध होण्यासाठी आणि व्यवहारात तिचा अधिकाधिक वापर होण्यासाठी ती भाषा बोलणाऱया भाषिकांच्या मनातला न्यूनगंड दूर होणे खूप गरजेचे असते. पुणे विद्यापीठात डॉ. मनोहर जाधव मराठी विभागप्रमुख असताना त्यांनी एक चांगला प्रयोग केला होता. विद्यापीठात इतर विद्याशाखांचे शिक्षण घेणारे विद्यार्थी सुटाबुटात, टापटीप यायचे. मराठी विषय घेऊन शिकणारी मुले साध्या वेशात यायची. राहणीमानातल्या फरकामुळे अनेकदा मराठीचे विद्यार्थी बुजलेले असायचे. त्यातून त्यांच्या मनात न्यूनगंड तयार व्हायचा. तो दूर करण्यासाठी मराठीच्या विद्यार्थ्यांनीही सुटाबुटात, टापटीप यावे असा आग्रह डॉ. जाधवांनी धरला. त्याला यश आले. कपडे बदलून काय फरक पडणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो, पण मानसिकता बदलण्यासाठी केलेला एक चांगला प्रयत्न म्हणून या प्रयोगाकडे पाहायला काय हरकत आहे?
आपल्याकडे भाषेचा संबंध ओठांपुरता मर्यादित समजला जातो. भाषा ओठातून येण्यापेक्षा ती पोटातून येणे गरजेचे आहे. जेव्हा त्या भाषेत ती भाषा बोलणाऱया भाषिकाचे पोट भरण्याचे सामर्थ्य असेल तेव्हाच ती पोटातून येईल. भाषेचा प्रश्न केवळ अस्मितेशी निगडित असतो असे नाही. तो ‘अस्तित्वा’शीच जास्त निगडित असतो. त्यामुळे मराठी हा विषय घेऊन करीअर करू इच्छिणाऱया मुलांना केवळ पदवी देणे एवढय़ाच कामात विद्यापीठांनी धन्यता न मानता त्यांच्या पोटाचा प्रश्न सुटावा यासाठी नोकरीच्या आणि व्यवसायाच्या संधी त्यांच्यासाठी कशा निर्माण होतील याकरिता थोडे चौकटीबाहेर जाऊन उद्योग-व्यवसाय क्षेत्राशी समन्वय साधला पाहिजे. त्यानुसार अभ्यापामात बदल केले पाहिजेत. असे प्रयोग इतर सर्व ज्ञान शाखांमध्ये आज होत आहेत. भाषेचे शिक्षण म्हणजे केवळ ललित साहित्याचे शिक्षण नव्हे. व्यवहारात भाषा कशी वापरली जाते, शास्त्राrय लेखनात भाषेचे रूप कसे असते, विविध व्यवसायांत भाषा कशी वापरतात, साहित्यकृतींमध्ये भाषेची अभिव्यक्ती कशी होते याचे शिक्षण दिले गेले पाहिजे.
लोकमान्य टिळक म्हणत, “नाडीवरून ज्याप्रमाणे शरीरातील रोगाची अथवा स्वास्थ्याची परीक्षा होते, तद्वतच भाषेवरून राष्ट्राची बरीवाईट स्थिती तज्ञ लोक ताडतात. छत्रपती शिवाजी महाराज जन्मण्यापूर्वी पोवाडे का झाले नाहीत? याचे कारण आता सांगण्याची जरुरी नाही. शिवाजी महाराजांचा अभ्युदय म्हणजे मराठी भाषेचा अभ्युदय.” लोकमान्यांच्या सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, शासनाकडे इच्छाशक्ती असेल तर खूप काही घडू शकते. भाषेच्या संदर्भात सारे काही शासनाने करावे ही भूमिकाही फारशी योग्य नाही. समाजाचीही भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे. शासन, समाज, साहित्य संस्था, ग्रंथालये, भाषा तज्ञ आणि विद्यापीठे यांच्यात सुसंवाद निर्माण झाला तर भाषेसंदर्भात चांगले खूप काही घडू शकते.
साक्षेपी समीक्षक आणि अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.रा.ग. जाधव यांनी ‘समाज आणि भाषा’ या लेखात समाजाच्या भाषेसंदर्भातल्या अनास्थेवर बोट ठेवले आहे. ते म्हणतात, “लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ मराठीत लिहिले ते मूलभूत समीक्षा किंवा गीताभाष्य मानले जाते. म्हणून जगभरचे गीता अभ्यासक मराठी शिकतात व लोकमान्य टिळकांचे भाष्य समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आपण समाज म्हणून आणि आपली मराठी भाषा दोन्हीही अजून वासाहतिक पूर्वग्रहाचे बळी आहोत. तो पूर्वग्रह म्हणजे इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही हे खोटे नाही, पण मराठी समाजाला मराठीशिवाय तरणोपाय नाही हे आपण स्वतच्या मनावर व इतरांच्या मानसिकतेवर बिंबवले पाहिजे. समाजाला भाषा असतेच, पण भाषा हे समाजाचे सेंद्रिय घटक नव्हे. भाषा मरतात हा इतिहास आहे. त्या मृत भाषांचा समाज नष्ट होतो. मात्र त्यातील संचित टिकून राहते. ग्रीकांचे ज्ञानविज्ञान अरबांनी जपले म्हणून टिकले. मराठीत टिकण्यासारखे आहेच आहे, पण त्यासाठी उद्या अरबांची मदत घेण्याची वेळ येऊ नये एवढंच!”
(लेखक महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष आहेत)