
>> मोहन एस. मते
सरत्या वर्षाला निरोप देताना मागे वळून पाहिल्यास हे वर्ष नैसर्गिक आपत्तींचे ठरले असे म्हणता येईल. विशेषतः वर्षभर वादळे आणि अवकाळी पावसाचे संकट देशावर राहिले. हवामान बदलांचे दृश्य परिणाम आपण आता अनुभवू लागलो आहोत. जगातील सर्वात उष्ण ठिकाण असलेल्या कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीमध्ये गतवर्षी आणि यंदा 54.4 अंश सेंटिग्रेड तापमान नोंदले गेले. युनिसेफच्या ताज्या अहवालानुसार, हवामान बदलामुळे दक्षिण आशियाई देशांतील मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. येणाऱ्या काळात हवामान बदलांमुळे अकल्पित घटनांची वारंवारिता वाढणार, हे अटळ आहे.
हवामान बदलामुळे जगभरात सध्या अकल्पित घटना घडताना दिसत आहेत. गेल्या वर्षी रशियाचा सर्वात मोठा भूभाग असलेल्या सायबेरियामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. या तापमान नोंदीला संयुक्त राष्ट्रसंघाने नुकतीच अधिकृत मान्यता दिली आहे. गेल्या वर्षी सायबेरियातील वरखोयनस्क शहरात 100.4 अंश फॅरनहाइट म्हणजे 38 अंश सेटिंग्रेड इतके तापमान नोंदले गेले होते. हा हवामानाच्या दृष्टीने एक इशारा असल्याचे जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे. संघटनेच्या प्रमुखांनी सांगितले की, सायबेरियातील हे तापमान आर्क्टिक वर्तुळातील सर्वाधिक आहे.
वरखोयनस्क या शहराचे तापमान 1885 पासून मोजले जात आहे. सायबेरियातील उष्णतेच्या लाटेच्या वेळी ते मोजले गेले. गेल्या वर्षी उन्हाळ्यात आर्क्टिक सायबेरियात सरासरी तापमान 10 अंश सेंटिग्रेडने जास्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे जंगलात आगी लागून समुद्रात बर्फाचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते. गेल्या वर्षाची ही उष्णतेची सर्वात तीव्र लाट होती. जगातील सर्वात उष्ण ठिकाण असलेल्या कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीमध्ये गेल्या वर्षी आणि यंदा 54.4 अंश सेंटिग्रेड तापमान नोंदले गेले. त्याची पडताळणी अद्यापही जागतिक हवामान संघटना करत आहे. ही संघटना जगातील हवमानातील सर्वाधिक बदलांच्या नोंदी ठेवत असते. त्यामध्ये सर्वात जास्त वीज चमकणे, सर्वात जास्त वाऱ्याचा प्रवाह, सर्वात लांब दुष्काळी कालावधी, सर्वाधिक गारपीट, पर्जन्यवृष्टी आणि तापमान यांचा समावेश असतो.
मुलांना सर्वाधिक धोका
युनिसेफने मुलांवर लक्ष केंद्रित करणारा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. याला क्लायमेट क्रायसिस अचाइल्ड राईट्स क्रायसिसः चिल्ड्रेन एट रिस्कइंडेक्स (सीसीआरआय) असे नाव देण्यात आले आहे. हवामान बदलामुळे दक्षिण आशियाई देशांतील मुलांचे आरोग्य शिक्षण आणि सुरक्षितता धोक्यात आली असल्याचे संशोधन या अहवालातून प्रसिद्ध झाले आहे. या अहवालात चक्रीवादळ आणि उष्णतेच्या लाटांसारख्या पर्यावरणीय धोक्यांपासून मुलांचे संरक्षणाच्या धोक्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. त्यानुसार पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हिंदुस्थान या चार दक्षिण आशियाई देशात जेथे हवामान संकटाच्या परिणामामुळे मुलांना सर्वाधिक धोका आहे. या देशांची क्रमवारी अनुक्रमे 14 वी, 15 वी, 25 वी, आणि 26 वी आहे. सीसीआरआयने हिंदुस्थानला अत्यंत उच्च जोखमीच्या 33 देशांमध्ये स्थान दिले आहे. जिथे पूर आणि वायू प्रदूषणासारख्या वारंवार होणाऱ्या पर्यावरणीय धोक्यांमुळे महिला आणि मुलांसाठी सामाजिक आर्थिक दुष्परिणाम होतात. चार दक्षिण आशियाई देशांसह अत्यंत उच्च जोखीम म्हणून वर्गीकृत 33 देशांमध्ये सुमारे एक अब्ज मुले राहतात. जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ झाल्यास 600 दशलक्षांहून अधिक हिंदुस्थानींना येत्या काही वर्षांत तीव्र जलसंकटाला सामोरे जावे लागेल. त्याच वेळी शहरी भागात ‘फ्लश फ्लड’चा धोकादेखील वाढेल.
जून आणि जुलै महिन्यात हिंदुस्थानसह पश्चिम जर्मनी आणि बेल्जियममध्ये मोठे पूर आले. ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये सलग 17 ते 20 दिवस पाऊस झाला. मात्र पूर येण्यास पाऊस हेच एकमेव कारण नसून समुद्राच्या भरतीमुळेही पूरस्थिती निर्माण होत असते, असे अभ्यासकांचे मत आहे.
अमेरिकेत झालेला हा अभ्यास जगातील किनारपट्टी भागांसाठी खूप महत्त्वाचा मानला जात आहे. हवामान बदलांमुळे समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. भरतीच्या वेळी वादळ आल्यास पूरस्थिती अधिक गंभीर होते.
‘नासा’ आणि हवाई विद्यापीठाने केलेल्या नव्या संशोधनातून भविष्यातील संकटाचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार चंद्राच्या कक्षेतील बदलांमुळे तसेच हवामान बदलामुळे 2030 च्या मध्यावर समुद्राची पातळी वाढून किनारपट्टी भागांत भयंकर पूर येऊ शकतात. भरती अधिक मोठय़ा असतील. त्यामुळे किनारपट्टी भागांत मोठय़ा प्रमाणात पूर येऊ शकतात, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. चंद्राच्या कक्षेतील नैसर्गिक हालचालींचा अभ्यास संशोधकांनी केला आहे. चंद्राच्या कक्षेतील असा बदल 1728 मध्ये आढळून आला होता. चंद्राची सूर्याभोवती कक्षा सपाट नाही. या कक्षेमध्ये काही प्रमाणात चढ आणि उतार होत असतात. त्यामुळे किनारपट्टी भागांत मोठय़ा प्रमाणात पूर येऊ शकतात. नेमकी याच काळात वादळे आल्यास पुराची तीव्रता वाढू शकते असे संशोधनात म्हटले आहे. चंद्राच्या कक्षेतील हालचालींच्या विस्ताराचा मोठा टप्पा 2030 मध्ये येणार आहे. त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.
सध्या राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमधल्या प्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजत असताना जगभरातील टॉप-100 प्रदूषित शहरांमध्ये हिंदुस्थानातील 46 शहरे, शहरातील नागरिकदेखील प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आता समोर आले आहे. जगभरातील हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या आयक्यू एअरने प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली असून यामध्ये जगभरातील टॉप 100 शहरांमध्ये हिंदुस्थानातील 46 शहरे, चीनमधील 42 शहरांचा समावेश आहे; तर पाकिस्तानमधील 6 आणि बांगलादेशमधील 4 शहरांचा समावेश आहे. इंडोनेशिया आणि थायलंड या देशातील प्रत्येकी एका शहरांचा या यादीत समावेश आहे. या सर्व शहरातील पीएम 2.5 एअर क्वालिटी रेटिंग 50 पेक्षा जास्त आहे. धक्कादायक बाब म्हणजे जगातील आघाडीच्या 10 प्रदूषित शहरांमध्ये हिंदुस्थानातील शहरांचा समावेश आहे.
हिंदुस्थानातील गाझियाबाद या शहराची हवा सर्वाधिक विषारी आहे. चीनमधील होटान शहराची हवा जगभरात सर्वाधिक विषारी राहिली आहे. या शहराचा पीएम 2.5 रेटिंग 2020 मध्ये सरासरी 110.2 इतका राहिला. हिंदुस्थान, चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील तब्बल 98 शहरांची हवा अधिक विषारी होत चालली आहे. दिवाळीमध्ये दिल्लीतील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याचं पाहायला मिळतं; मात्र दिल्लीप्रमाणेच 45 शहरांची हवाही दूषित झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही ठिकाणची हवा राहण्यायोग्य नसल्याचेही बोलले जात आहे. हिंदुस्थानने चीनला मागे टाकले आहे. पुढील काही वर्षात ही परिस्थिती न बदलल्यास या शहरांमध्ये राहणं कठीण होणार आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या 5 ते 10 वर्षांतले वेगाने बदलणारे हवामान ही केवळ हिंदुस्थानपुरती समस्या राहिलेली नाही. जागतिक स्तरावर सतत वाढत असलेले वायूप्रदूषण, कार्बन उत्सर्जन आणि त्यामुळे वाढलेले तापमान याचा हा सगळा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अलीकडे ज्या पद्धतीने अवकाळी पाऊस गारपीट किंवा चक्रीवादळासारखी संकटे येत आहेत, ती पाहिल्यावर हा सगळा गंभीर प्रकार केवळ हवामानापुरता मर्यादित राहात नाही. हिंदुस्थानसारखा शेतीप्रधान आणि विविधता असलेल्या समाज जीवनासाठी तो आर्थिक, सामाजिक आव्हान ठरतो आहे. त्यामुळेच याविषयी अधिक गांभीर्याने संशोधन आणि विशेष अभ्यास करण्याची वेळ आली आहे. केवळ नैसर्गिक संकटे किंवा निसर्गातील बदलांचा परिणाम म्हणून याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरते. जागतिक स्तरावर हवामान बदलांबाबत होणाऱ्या परिषदांमध्ये त्या त्या देशांना उपाययोजना करण्याचे आवाहन केले जात आहे. पण हिंदुस्थानने तेवढय़ापुरतेच प्रयत्न ठेवणे अपुरे असून हिंदुस्थानची संपूर्ण भौगोलिक स्थिती आणि इथले समाजजीवन लक्षात घेऊन या बदलत्या हवामानाचा अतिशय गांभीर्याने अभ्यास होणे आवश्यक बनले आहे. ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेंट चेंज यावर होणाऱ्या जागतिक चर्चांमध्ये हिंदुस्थानने पुढाकार घेऊन त्यात स्वतःचे मोठे योगदान दिल्याचेही म्हटले आहे ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. पण ऑक्टोबर 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या एका खासगी अहवालामध्ये हिंदुस्थानात दरवर्षी केवळ प्रदूषित हवामानामुळे 25 ते 30 हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागतात असे म्हटले आहे. अशुद्ध हवा जर हजारो लोकांच्या बळीचे कारण असेल तर आपण हवेसारख्या नैसर्गिक प्रकाराबाबतही किती कृतघ्नपणे व्यवहार करतो हे स्पष्ट होते.
2021 संपूर्ण वर्ष हे वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींनी व्यापले होते. नव्या वर्षात हा विषय आ वासून उभा राहणार आहे. हिंदुस्थानच्या तीनही समुद्रकिनाऱ्यांवर येऊन गेलेली चक्रीवादळे, त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये दोन वेळा आलेली मध्यमस्वरूपाची वादळे, केरळ, तामीळनाडू या राज्यांना बसलेला पावसाचा तडाखा आणि देशाच्या कोणत्याना कोणत्या भागामध्ये सतत पाऊस कोसळत असल्याचे चित्र हवामान बदलांच्या परिणामांची सुरुवात झाल्याचे द्योतक आहेत. ऑक्टोबर महिन्यात उत्तराखंडामध्ये पावसाने धुमाकूळच घातला. केदारनाथ, बद्रीनाथ या भागातील अनेक लोकांना स्थलांतरित करण्याची वेळ आली. त्यानंतर केरळमध्ये पाऊस झाला. तामीळनाडूचे चेन्नई शहर जलमय झाले होते. काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये पावसाने धिंगाणा घातला. प्रसिद्ध देवस्थान असलेल्या तिरुपती बालाजीच्या परिसरात ढगफुटी झाल्यासारखे चित्र होते. अचानकपणे आलेल्या या पावसाने 15-20 जणांचे बळी घेतलेले आहेत. महाराष्ट्रात पावसाळा सुरू होण्यापूर्वीच कोकणामध्ये दोन वेळा चक्रीवादळे आली. भर पावसाळ्यामध्ये चिपळूण खेड या अन्य परिसरात अभूतपूर्व पाऊस झाला आणि कोट्यावधीचे नुकसानही झाले. पावसाळ्यात पाऊस येणे आणि अवेळी पाऊस येणे यात आता काही फरकच राहिलेला नाही. शेतीला बारमाही पाणी असेल तर बागायत शेती करता येते. परंतु आता पावसाळ्याचेच बारमाही कोसळणे सर्वच हंगामातल्या शेतीला नुकसानकारक ठरते आहे.
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)




























































