काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी…

>> मृणाल घनकुटे

आपण चेहऱयाची, हाताची आणि पायांची चांगली काळजी घेतो, परंतु आपण आपल्या काखेला (अंडरआर्म्स) विसरतो. आपल्या काखेची त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदनशील आहे. म्हणूनच तिची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक उपायांचा वापर करणे महत्त्वाचे आहे.

बऱयाच मुली आणि स्त्रिया त्यांच्या काखेत काळपट असण्याने त्रस्त असतात. त्यामुळे त्या स्लीव्हलेस कपडे घालू शकत नाहीत. काखेत काळे होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. डर्माटोलोजिस्ट आणि त्वचातज्ञ डॉ. शरिफा चाऊस यांनी दिलेल्या काखेतील काळेपणा दूर करण्यासाठीच्या काही सोप्या आणि घरगुती टिप्स जाणून घेऊ या.

लिंबू – आपण अनेकदा आपल्या काखेत लिंबाचा रस लावला तर ती हलकी होण्यास आणि काळ्या डागांपासून मुक्त होण्यास मदत होते.

बटाटा- बटाटय़ामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात, जी आपल्या शरीरासाठी चांगली असतात. ती आपल्या काखेची त्वचा हलकी बनविण्यातदेखील मदत करू शकतात. काळे डाग दूर करण्यासाठी तुम्ही बटाटय़ाचा रस किंवा तुकडे लावू शकता. दुसरा मार्ग म्हणजे बटाटय़ाचा रस लिंबाच्या रसात मिसळून काखेत लावावा .

बेकिंग सोडा – जेव्हा आपण काख नियमितपणे स्वच्छ करत नाही, तेव्हा त्वचेच्या मृत पेशी तयार होतात आणि त्वचा अधिक गडद होते. यापासून आणि कोणत्याही वाईट वासापासून मुक्त होण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाणी वापरून एक विशेष पेस्ट बनवू शकतो. दुसरा उपाय म्हणजे बेकिंग सोडा मिसळलेल्या खोबरेल तेलाने मसाज करावा.

काखेतील काळसरपणा दूर करण्यासाठी हे काही घरगुती उपाय आहेत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे यापैकी कोणत्याही गोष्टीचा प्रयत्न करण्यापूर्वी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

कारणं कोणती…
 काखेत काळसरपणा येण्याची काही कारणे आहेत. जर आपण केस काढण्यासाठी क्रीममध्ये गरम मेण किंवा रसायनांचा वापर केला तर असे होऊ शकते.
 अंडरआर्म्स शेव्ह करण्यासाठी रेझर वापरल्याने त्वचा काळी होऊ शकते.
 काही वेळा आपली संप्रेरके असंतुलित होऊ शकतात आणि आपल्या काखा गडद करू शकतात.
 खूप घट्ट कपडे परिधान केल्यानेदेखील हे होऊ शकते.
 जर आपण जास्त प्रमाणात डिओ वापरत असू तर ते काखेत काळसरपणा निर्माण करतात. जर आपण काखांची नीट स्वच्छता राखली नाही तर संसर्गाने त्या काळ्या होऊ शकतात.