>> नागेश शेवाळकर
‘राम’ या शब्दात प्रचंड ऊर्जा, अलौकिक शक्ती आहे. त्यामुळे अंतःकरणात आणि शरीरात एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह संचारतो. आपल्याही मुखातून रामनाम बाहेर पडते, हात भक्तिभावाने जोडले जातात. कारण राम सर्वांच्या मनात, हृदयात वसलेला आहे. रत्नाकरला रामनामाची संथा, मंत्र देऊन अंतर्धान पावलेले नारदमुनी अनेक वर्षांनंतर त्याच मार्गाने जात असताना त्यांना ‘राम…राम…’ हा मंत्र कानी पडला. नारदमुनींनी तो आवाज कुठून येतोय याचा शोध घेतला. आवाज मानवाचा होता, परंतु कुणी दिसत नव्हते. एकवेळ अशी आली की, त्या आवाजाचा मागोवा घेताना त्यांच्या लक्षात आले की, त्या परिसरातील झाडे, वेली, पक्षी इतकेच काय, पण दगडमातीपासून तो रामनामाचा ध्वनी येत आहे. बाजूला असलेले एक वारूळ त्या ध्वनी-प्रतिध्वनीचे केंद्र असल्याचे लक्षात येताच मुनींनी ते वारूळ बाजूला केले आणि सर्वांना महर्षी वाल्मीकी मिळाले.
‘राम’ या शब्दातील दोन अक्षरे ‘राम’ अशी न उच्चारता ‘मरा’ अशी उच्चारली तरी प्रभू रामचंद्रांची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. याची प्रचीती आपणास महर्षी नारद यांच्या सूचनेनुसार रत्नाकर नावाचा कोळी चक्क महर्षी वाल्मीकी होतो आणि रामायणासारखा अजरामर ग्रंथ लिहितो यावरून येते.
जर अंतःकरणात खरेच रामनामाची भक्ती असेल तर सोबत आजूबाजूचा परिसर राममय होऊन जातो. मनात असलेले राम ओठांवर येण्यासाठी कुठल्याही जागेची, विशेष आसनाची, वेळेची आवश्यकता नाही. अगदी स्मशानभूमीतही रामनामाचा उच्चार होतो. ही दोन अक्षरे जिथे उच्चारली जातात, तिथला परिसर आपोआप पवित्र, स्वच्छ होतो. इच्छा झाली की, रामनाम मुखी येते.
श्रीरामाचे भक्त मनोभावे रामनाम घेत असले तरीही रामनाम न घेणाऱया आणि श्रीरामाचा मुख्य शत्रू असलेल्या रावणाच्या आणि कुंभकर्णाच्या झालेल्या संवादातून श्रीरामाचा महिमा लक्षात येईल.
राम-रावण युद्ध सुरू असताना कुंभकर्णाला जागे करून सभागृहात आणण्यात आले तेव्हा सारी परिस्थिती लक्षात येताच कुंभकर्ण रावणाला म्हणाला, ‘‘ज्येष्ठ बंधू रावण, एक सांगा, सीतेला ज्यासाठी पळवून आणले ते कार्य साध्य झाले का?’’
‘‘नाही अनुज, नाही. सीता त्यासाठी तयार होणार नाही. श्रीराम एकपत्नी आहे तशीच सीताही पतिव्रता आहे.’’
‘‘ज्येष्ठ बंधो, कपट नीतीचा अवलंब का करत नाही. आपण श्रीरामाचे रूप धारण करून जा. म्हणजे कार्यसिद्धी होईल.’’
‘‘नाही. तसे होणार नाही. मी कपट करून रामाचे रूप घेऊन सीतेजवळ गेलो तरी मी काही करू शकणार नाही; कारण रामरूप धारण करताच मी रामाप्रमाणे एकपत्नी अर्थात मंदोदरीचा होऊन जाईन आणि सीतेपाशी न जाता तसाच परतून येईन.’’ हा आहे रामनामाचा महिमा! जटायूसारखा एक पक्षी बलाढय़ रावणाशी लढला होता तो केवळ त्याच्या मनात राम वसलेला होता म्हणून.
अथांग समुद्रावर सेतू बांधताना दोन दगडांमध्ये असणारी पोकळी भरून काढण्यासाठी चिमुकली खार मदत करते तेव्हा तिच्या पाठीशी कुणाची शक्ती असते… प्रभू रामचंद्र तिच्या पाठीशी नव्हे, तर हृदयात असतात.
सागरी सेतू बांधतानाचा एक प्रसंग रामनामाचे महत्त्व स्पष्ट करणारा आहे. वानरसेना मोठमोठय़ा शिळा समुद्रात टाकत होते त्या वेळी रामनामाचा गजर सुरू होता. श्रीराम ते सारे कौतुकाने पाहत असताना त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की, प्रत्येक सैनिक त्या शिळेवर ‘श्रीराम’ असे लिहून टाकत होता. ती प्रत्येक शिळा समुद्राच्या पाण्यात तरंगत होती. ते पाहून श्रीरामाचीही इच्छा झाली की, आपणही एक शिळा टाकावी. म्हणून श्रीरामानेही एक शिळा उचलली आणि समुद्रात टाकली. आश्चर्य म्हणजे ती शिळा पाण्यावर न तरंगता पाण्यात बुडाली. ते पाहून श्रीराम अधिकच आश्चर्यचकित झाले. जवळ उभा असलेला हनुमंत श्रीरामाला वंदन करून म्हणाला, ‘‘प्रभो, आपण टाकलेली शिळा तरंगणार नाही. कारण त्यावर ‘श्रीराम’ लिहिलेले नाही. प्रभू, हा आपल्या नामाचा महिमा आहे. ज्याच्या जवळ रामनाम नाही तो हमखास बुडणार.’’
पित्याने दिलेली वचनपूर्ती करण्यासाठी वनवास स्वीकारणारा राम, आदर्श पती, एकवचनी राम, पराक्रमी, परोपकारी, आदर्श राजा अशी प्रभू रामचंद्राची ख्याती आहे. सुख असेल, दुःख असेल, आनंदाच्या प्रसंगी ‘आई’सोबत ‘राम’ हा शब्दही आपोआप ओठांवर येतो. कारण तो मनामनांत वसलेला आहे.