
>> नामदेव सदावर्ते
महाराष्ट्रातील सारे संत इतके निर्भीड, निर्भय वागणारे व परखडपणे बोलणारे का होते? संतांना सतत त्रास देणारे असंख्य लोक होते, पण त्यांना शरण जाऊन त्यांच्याशी संतांनी कधी जुळवून घेतले नाही. संतांनी कुणाकडे क्षमा मागितली नाही. त्यांच्या वागण्या-बोलण्यात इतकी निर्भीडता कशी आली? याचे एकमेव कारण म्हणजे संत निर्मोही होते, निःस्वार्थी, निरपेक्ष होते. कधी कुणाकडून काही मिळवायचे नाही, कुणाकडे काहीही मागायचे नाही यामुळे ते स्वतंत्र राहून ईश्वरचिंतन करीत होते. संतांनी ईश्वराला सर्वस्व अर्पण केले होते. निर्भीडता, सर्वाभूती समभाव व नामस्मरणी तल्लिनता हा संतांचा स्वभाव होता.
समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे?
असा प्रश्न करणारे संत रामदास स्वामी हे श्री प्रभूरामचंद्रांना समर्थ मानीत होते. ज्याचा प्रभू समर्थ, त्याची सारी लेकरे समर्थच असणार. रामदास स्वामींचे सारे जीवन समर्थसमाज निर्माण करण्यासाठी होते. बलोपासना केली तरच ज्ञानोपासना समर्थ होते.
विवाह मंडपातून बाहेर पडणे, गोदावरीत उभे राहून रामजप अनुष्ठानासाठी जो त्याग केला तोही निर्भयपणाच होय. संन्यस्त वृत्तीने जीवन जगण्यासाठी जे मानसिक धैर्य लागते ते संत समर्थांकडे असल्यामुळे ते निर्भीड जीवन जगले. छत्रपतींनी आपले सगळे राज्य समर्थांच्या झोळीत टाकल्यावर समर्थांनी छत्रपती शिवरायांना ‘हे राज्य श्रींचे आहे, ते तुम्ही वाढवा, राजे छत्रपती व्हा’ असा आशीर्वाद दिला.
समर्थांच्या वाङ्मयात त्यांच्या निर्भीडपणाचे दर्शन घडते. हनुमंत कुळदैवत असल्यामुळे आमचा परमार्थसुद्धा सिद्धीप्राप्त झाला, असे ते म्हणत आकाश कोसळले तरी आम्ही अविचल राहू.
म्हणोनि आम्ही रामदास ।
श्रीरामचरणी आमुचा विश्वास ।
कोसळोनि पडो हे आकाश ।
आणिकाची वास न पाहू ।।
परमार्थ सुखाची गोडी लागली की इतर मायावी, क्षणभंगुर सुखाची आवड निर्माण होत नाही. प्रापंचिक ज्ञानाचा गर्व मनात धरून शरीरास विषय सुखात डुंबत ठेवणाऱया अज्ञानी पढतमुर्खाचे वर्णन संत रामदास करतात. आत्मज्ञान हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. इतर प्रापंचिक ज्ञान हे अज्ञानासारखेच दुःखकारक असते. इतर सर्व ज्ञानप्राप्तीनंतर गर्व, अहंकार निर्माण होऊन ते ज्ञानच आत्मनाशास कारण होते, पण आत्मज्ञान जीवन धन्य करते. पढतमूर्खांबद्दल समर्थ म्हणतात-
ज्ञान बोलोन करी स्वार्थ ।
कृपणा-ऐसा सांची अर्थ ।
अर्थासाठी लावी परमार्थ ।
तो एक पढतमूर्ख ।।
सांडोनिया श्रीपती । जो करी नरस्तुती ।
कां दृष्टी पडिल्यांची कीर्ती ।
वर्णी तो एक पढतमूर्ख ।।
पढतमूर्खाप्रमाणेच मूर्ख-लक्षणेही समर्थांनी अत्यंत निर्भीडपणे सांगितले आहेत. त्यातून त्यांचे मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण दिसते. प्रापंचिक अशा ज्या लोकांना आत्मज्ञान नाही, त्यांना समर्थ अज्ञानी म्हणतात. अशा मूर्खाची काही लक्षणे ते सांगतात- श्रेष्ठांशी अहंकाराने वागतो. स्वतःच आपली स्तुती करतो. स्वकियांना दूर लोटून परकियांशी मैत्री करतो. उठता बसता दुसऱयाची निंदा करतो. आळसात संतोष मानतो.
सभा पाहून गडबडून जाऊ नये. वेळप्रसंगी उत्तर देण्याचे टाळू नये. कुणी धिक्कार केला तरी आपले धैर्य चळू देऊ नये. सत्य मार्ग कधीही सोडू नये. खोटय़ाच्या मार्गाने कधी जाऊ नये. शेवटी समर्थ सांगतात-
हरिकथा सांडूं नये । निरूपण तोडूं नये ।
परमार्थास मोडू नये । प्रपंच बळे ।।
दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरपणा ही राक्षसी संपत्तीची लक्षणे आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, तिरस्कार, गर्व, ताठा, अहंकार, द्वेष, विषाद, विकल्प, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, अहंता, कामना, भावना, असूया, वासना, अतृप्ती, आसक्ती, निंदा, गावगुंडपणा, मस्ती ही सारी कुविद्या लक्षणे आहेत. समर्थ अत्यंत निर्भीडपणे या वृत्तीचे वर्णन करतात-
आळशी आणि खादाड ।
दुर्बळ आणि लाताड ।
तुटक आणि लबाड । अतिशयेंसी ।।
तो मूर्ख असून तापट, वेडा असून वाचाळ, खोटा असूनही तोंडाळ असतो. स्वतःला काही कळत नाही, तरी दुसऱयाचे ऐकत नाही. स्वतःस काही येत नाही आणि कुणी शिकवू लागले तर शिकतही नाही. स्वतः काही करत नाही आणि कुणी काही करत असेल तर त्याकडे अभ्यास दृष्टीने पाहतही नाही. तो भित्रा असून, उन्मत्त असतो. कुचकामाचा असून ऐट मिरविणारा आणि भ्याड असून, पराक्रमाच्या बढाया मारणारा असतो. तो दुसऱयाचे न्यून उघड करणारा, लावालावी करणारा, चहाडखोर, अशुभ शब्द बोलणारा, बोलणे फिरविणारा, द्वेषयुक्त, असत्य भाषण करणारा असतो. तो कपटी, कुटील, आतल्या गाठीचा, मनातल्या मनात कुढणारा, कामचुकार, वाईट मार्गांनी द्रव्य मिळविणारा व टवाळखोर असतो.
शाब्दिक बोले उदंड वाचा ।
लेश नाही वैराग्याचा ।
अनुताप धारिष्ट साधनाचा । मार्ग न धरी ।।
आत्मज्ञान संपन्न संत रामदास स्वामी निर्भय होते, समर्थ होते, स्वामी होते. निर्भीड विचार देणारे, मराठी बाणा जगणारे होते.





























































