>> नवनाथ तारे
भारतात आता मान्सून निरोप घेण्याच्या तयारीत आहे. या वर्षी बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी कमी बरसला आहे. हवामान बदलाच्या काळात मान्सूनच्या वितरण पद्धतीतील अस्थिरता कृषी क्षेत्राच्या स्थैर्यावर टांगती तलवार निर्माण करत आहे. बदलत्या वातावरणामुळे पारंपरिक पीक पद्धती कालबाह्य होण्याची शक्यता आहे. परिणामी, शेतकऱयांना आता फारशी माहिती नसलेल्या, परंतु फायदेशीर ठरणाऱ्या पिकांकडे वळावे लागेल. काही ठिकाणी पुराचा सामना करण्यासाठी, तर काही ठिकाणी दुष्काळाचा मुकाबला करण्याचे तंत्र आत्मसात करावे लागेल.
या वर्षी बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी कमी बरसला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडच्या भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. गेल्या दहा वर्षांत नैऋत्य पावसाचे प्रमाण बिहार अणि उत्तर प्रदेशातील बहुतांश भागात कमीच राहिले आहे. बिहारचा विचार केला तर शेतीच्या दृष्टीने हे राज्य महत्त्वाचे असून देशाच्या एकूण कृषी उत्पादनात मोलाची भूमिका बजावते. पण या वर्षी तेथे आतापर्यंत 735.8 मिलिमीटर पाऊस पडला असून तो सरासरीपेक्षा कमीच आहे. बिहारमध्ये पाऊस हा सामान्यपणे 1200 ते 1300 मिलिमीटर होतो. गेल्या एक महिन्याचा विचार केला तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्लीत चांगला पाऊस पडला आहे. त्याच वेळी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड येथे 36 टक्के ते 52 टक्क्यांपर्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे.
हवामान शास्त्रज्ञांनी ग्लोबल वार्ंमगच्या आधारे वर्तवलेल्या अंदाजानुसार नजीकच्या भविष्यात बराच काळ दुष्काळाशी सामना करावा लागू शकतो अशी भीती व्यक्त केली आहे, पण त्याचबरोबर काही भागांत चिंताजनक पातळीवर पुराचाही सामना करावा लागू शकतो. मान्सूनचे असमान वितरण आणि कमी काळात जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण अलीकडील काळात वाढत आहे. महाराष्ट्रात आपण अनेकदा याचा प्रत्यय घेतलेला आहे. किंबहुना, महाराष्ट्रातील पर्जन्यमानातही आता बदल झालेला दिसत आहे. सोलापूर, धाराशीव जिल्ह्यांतील काही गावांत काही वर्षांपूर्वी दुष्काळ पाचवीला पुजलेला होता. त्यामुळे तेथील पीक पद्धती ही कोरडवाहू शेतीवर आधारित होती, पण आता या भागात दरवर्षी दमदार पाऊस पडू लागला आहे. परिणामी, एकेकाळी ज्वारी, बाजरी, उडीद यांची लागवड करणारा येथील शेतकरी आता ऊस उत्पादनाकडे वळला आहे.
हवामानाच्या बदलत्या पॅटर्नमधील ही अस्थिरता कृषी क्षेत्राच्या स्थैर्यावर टांगती तलवार निर्माण करू शकते. दुष्काळ आणि पूर हे दोन्ही घटक पिकांवर विनाशकारी परिणाम करू शकतात. त्यामुळे पिकांचे चक्र बिघडू शकते आणि रोपटय़ांची वाढ कमी राहू शकते. परिणामी उत्पादन कमी होऊन अन्न सुरक्षेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याशिवाय अलीकडील काळात चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची आणि ते सतत येण्याची शक्यतादेखील आहे. त्यामुळे शेतीकामे अडचणीत येऊ शकतात. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी शेतकऱयांना तयार राहावे लागेल. आगामी काळात शेतीकामाचा उत्पादन खर्च वाढू शकतो. कारण शेतकऱयांना सुरक्षात्मक उपायांच्या दृष्टीने गुंतवणुकीसाठी प्रवृत्त व्हावे लागेल. साहजिकच या गुंतवणुकीमुळे उत्पादनावरील खर्च वाढून अनेकांना शेती व्यवसाय हा अनिश्चिततेचा ठरू शकतो. प्रामुख्याने लहान शेतकऱयांना खर्च भागविण्यासांठी बराच आटापिटा करावा लागू शकतो.
जसजसे तापमान वाढेल तसतसा पावसाचा पॅटर्न बदलेल. याचा परिणाम म्हणजे सध्या एका ठरावीक भागात काही विशिष्ट पिकांचे उत्पादन घेतले जाते, परंतु बदलत्या वातावरणामुळे आणि पावसामुळे ते पीक कालबाह्य होण्याची शक्यता अधिक आहे. हा बदल शेतकऱयांना पारंपरिक शेती करण्यापासून परावृत्त करणारा राहू शकतो. अशा स्थितीत शेतकऱयांना आता फारशी माहिती नसलेल्या, परंतु फायदेशीर ठरणाऱया पिकांकडे वळावे लागेल. वार्षिक पिकांना बदलणे तुलनेने सोपे राहू शकते, परंतु जेव्हा उत्पादनाचा मुद्दा येतो तेव्हा हा बदल अधिक आव्हानात्मक राहू शकतो.
हवामानाचे चक्र बदलत असताना कीटकांचा प्रादुर्भावदेखील वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी रासायनिक कीटकनाशकांवरचे अवलंबित्व वाढू शकते. धान्य आणि फळांची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठीही येणाऱया काळात अधिक प्रयत्न करावे लागतील. अन्नधान्यांच्या किमती आवाक्यात ठेवण्याची बाबदेखील आव्हानात्मक राहू शकते. म्हणूनच या वेळी दमदार पाऊस पडला म्हणून हुरळून न जाता शेतकऱयांनी अनिश्चितता आणि बदलत्या हवामानानुरूप पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन, मल्चिंग, पावसाचे पाणी साठवणे आवश्यक आहे. काही ठिकाणी पुराचा सामना करण्यासाठी, तर काही ठिकाणी दुष्काळाचा मुकाबला करण्याचे तंत्र आत्मसात करावे लागेल. पिकांवर होणाऱया परिणामांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
आज निसर्गाच्या लहरीपणामुळे केळी उत्पादक संकटात सापडला आहे. आता केळीला ‘घसा चोकिंग’ रोगाची लागण झाली आहे. केळीच्या फळाचा घड सामान्य पद्धतीने बाहेर येत नसेल तर कधी कधी आभासी देठ फाडून असामान्य पद्धतीने घड बाहेर येताना दिसला तर त्याला घसा चोकिंग म्हणतात. हा केळीचा शारीरिक विकार आहे. वास्तविक आतापर्यंत कडाक्याच्या थंडीतही असा विकार दिसला नव्हता, परंतु या वर्षी अतिउष्णता किंवा थंडीमुळे केळीला या आजाराने ग्रासले. केळी उत्पादक शेतकऱयांना पहिल्यांदाच अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला. अशा कितीतरी समस्यांशी शेतकरी आणि शास्त्रज्ञांना दोन हात करावे लागणार आहेत. बदलत्या काळात शेतकऱयांना प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे.
शाश्वत खरीप पिकाच्या जाती ज्वारी, बाजरी यासह कडधान्यांवरदेखील काम करावे लागणार आहे. तुरीसारखे उच्च प्रतीचे खरीप पीक निवडणे गरजेचे आहे. हवामान बदलामुळे किंवा हवामान चक्रामुळे घाबरण्याची गरज नाही, उलट स्वतःला या आव्हानांसाठी तयार करण्याकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. जागतिक हवामान संघटनेने या वर्षी कडाक्याची थंडी पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. डब्ल्यूएमओचे म्हणणे आहे की, तीव्र थंडीचे कारण ला निना प्रभाव असेल. भारताच्या उत्तर भागात कडाक्याची थंडी पडेल. या वर्षी थंडीचा कालावधीदेखील वाढेल. याचे कारण चालू वर्षाच्या अखेरीस ला निना परिस्थिती आणखी मजबूत होण्याची 60 टक्के शक्यता आहे. यामुळे देशाच्या उत्तरेकडील भागात सामान्य परिस्थितीपेक्षा थंडी वाढेल. सप्टेंबर-नोव्हेंबर 2024 पर्यंत ला निना परिस्थिती निर्माण होण्याची 55 टक्के शक्यता आहे आणि ऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत ती 60 टक्क्यांपर्यंत मजबूत होण्याची अपेक्षा आहे. ला निनाच्या प्रभावामुळे भारतात मान्सूनदरम्यान तीव्र आणि दीर्घकाळ पाऊस पडतो आणि उत्तर भारतात सामान्य परिस्थितीपेक्षा जास्त थंडी पडते. वर्षाच्या अखेरीस ला निनाचा प्रभाव वाढल्यास उत्तर भारतातील राज्ये सामान्यापेक्षा जास्त थंड होऊ शकतात. महाराष्ट्र, कर्नाटकातही त्याचे परिणाम जाणवू शकतात. याचा सामना करण्यासाठी शासनाने आणि शेतकऱ्यांनी तयार राहायला हवे.
शेवटचा मुद्दा म्हणजे पर्जन्य संचयाचा. पावसाचे गेल्या 100 वर्षांतील चक्र पाहिल्यास काही वर्षे अति पावसाची, तर काही वर्षे दुष्काळाची असतात. अति पावसाच्या काळात सिंचनाबाबत सखोल व शाश्वत उपाययोजना केल्यास कमी पावसाच्या वर्षात दुष्काळाचा ताण जाणवत नाही. याला खऱया अर्थाने जलनियोजनातील दूरदर्शीपणा म्हणता येईल, पण आपल्याकडे दुष्काळी उपाययोजनांना दुष्काळ पडल्यावर सुरुवात होते. एरवी पावसाळ्यात पाऊस प्रचंड पडतो आणि वाहून जातो. यंदाही तेच झाले, पण हाच पाऊस भूगर्भात मुरवण्यासाठी कसून प्रयत्न झाले तर एखाद्या वर्षी मान्सूनचे आगमन लांबले, पावसाने दडी मारली, खंड पडला तर आपत्ती ओढवणार नाही. हाच सांगावा घेऊन यंदाचा पाऊस आला होता. तो बरसला आणि परतीला निघाला; पण उपाययोजनांची झोळी तशीच राहिली…. रिकामी !
(लेखक कृषी अभ्यासक आहेत)