शिवमंदिरांच्या राज्यात – हतनूर वालूरची शिवराजवट  

>> नीती मेहेंदळे
महाराष्ट्र प्रांतावर अनेक राजवटी राज्य करून गेल्या असे इतिहास सांगतो आणि इतिहास शोधताना भौतिक पुराव्यांची गरज असते. मग ते लिखित असोत किंवा शिल्पकलेत. चालुक्य, यादव, वाकाटक या राजांनी त्यांच्या देवतांची इथे मंदिरे बांधली ती शिल्पकलेची व धार्मिक दृष्टीने वारसा ठरली असली तरी हा एक मोठा ऐतिहासिक दस्ताऐवजही आहे. परभणी जिल्हा म्हणजे वाकाटक वंशातल्या कर्तबगार राणीच्या नावाने वसवली गेलेली प्रभावतीनगरी. मराठवाडय़ात इतरत्र मोठय़ा प्रमाणावर सापडलेल्या प्राचीन मंदिरांबरोबर परभणीतही अशा मंदिरांमुळे महत्त्वाचा इतिहास जतन केला गेला आहे.
हतनूर हे तसे अगदी कमी लोकवस्तीचे लहानसे गाव. सेलू या परभणी जिह्यातल्या महत्त्वाच्या शहरापासून फक्त 15 किमीवर असलेल्या गावात शिवमंदिराचा प्राचीन वारसा आजही तग धरून आहे. उत्तरेश्वराचे शिवालय आणि नागनाथ मंदिर ही दोन महत्त्वाची हेमाडपंती धाटणीची मंदिरे गावाच्या दोन्ही बाजूला वसलेली दिसतात. उत्तर चालुक्य व यादव काळातल्या या मंदिरांच्या मिश्र रचनेत व जवळच असलेल्या चारठाणा येथील हेमाडपंती मंदिरांमध्ये विशेष साम्य आढळते. मंदिराच्या भिंती साध्या असून त्यावर कोरीव काम नाही. मंडप चौरसाकृती असून खुला आहे. अगदी अर्धभिंतसुद्धा नाही. नागेश्वर मंदिराला जोडून असलेली प्रशस्त बारव आपले लक्ष वेधून घेते. बारवेच्या चारही बाजूंनी उतरता येते. मध्यभागी चार बाजूंना पायऱया असून नंतर खाली एकाआड एक पायऱया आहेत. बारव खोदण्याचा उद्देश मंदिराचा दगड पुरवणे हा तर सर्वज्ञातच आहे. हतनूरच्या जवळपासच्या बऱयाच गावांमध्ये अशा आणि अधिक सुघड बारवा सापडतात.
उत्तर चालुक्य कालीन खांबांचे तुकडे नागनाथ मंदिर परिसरात विखुरलेले आढळतात. तसंच भैरव, महिषासुरमर्दिनी, नंदी, गणपती इत्यादींच्या खंडित मूर्तीही आढळतात. मंदिराचा तलविन्यास मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गाभारा असा असून प्रदक्षिणापथ निरंधार आहे. मंदिराचं मूळ अधिष्ठान उत्तर चालुक्यकालीन असून नंतरचे मंदिर यादवकालीन असल्याचे जाणवते. याचा मोठा पुरावा तिथे स्तंभावर असलेल्या शिलालेखातून स्पष्ट होतो. शके 1223 म्हणजे तेराव्या शतकात पुरुषदेव पंडित याने नागनाथ मंदिराची वृद्धी केली असा थेट संदर्भ देणारा हा लेख असून मूळ मंदिर त्याआधीचे असावे हे समजते. या मंदिरास शिलालेखात प्रसाद म्हटले आहे व हे पंचरथ भूमीज मंदिर आहे. अजून महत्त्वाची बाब म्हणजे सभामंडप व गर्भगृह या दोन्हींचे विधान तारकाकृती आहे आणि त्यांच्या चार कोपऱयांवर शिखर प्रतिकृती व चैत्य गवाक्ष आढळतात. सभामंडप विशेष उंच असल्याचे लक्षात येते. या स्तंभविरहित मंडपात नागशीर्षयुक्त अर्धस्तंभ आहे. सभामंडपाचे छत वैशिष्टय़पूर्ण असून चारही बाजूंना पाकार रेषा मध्यावर असलेल्या चौरसांना सांधलेल्या दिसतात. दगडात हे कोरीव काम फार सुंदररित्या साकारले आहे. मंदिराच्या बाह्य पृष्ठभागावर कुंभ, खूर असे मोजके थर असून जंघा भागावर रत्नपट संपूर्ण मंदिरभर दिसतो. मोजके कोरीव काम व कमी कुशल कारागिरी ही यादव काळातल्या मंदिर स्थापत्याची खूण काळ ठळक करायला मदत करते.
अजून एक वैशिष्टय़ म्हणजे भूमीज शिखर. मूळ शिखर विटांचे असून भूमीज शैलीत बांधलेले आहे. याचा अर्थ शिखरांच्या प्रतिकृतीच्या रांगा रचून वर निमुळते होत जाणारे शिखर यातून अनेक मजली असल्याचा आभास निर्माण होतो आणि मंदिरास भव्यता प्राप्त होते. शिखरावर आमलकाचे तीन थर आहेत. पडलेले मूळ शिखर नवे बांधताना जुने जपण्याचा प्रयत्न केलेला स्तुत्य आहे, फक्त रंगीत मुलामा टाळता आला असता.
जवळ असलेले उत्तरेश्वर मंदिरही अशाच रचनेचे आढळते. शेजारी असलेल्या वालूर गावात वाल्मिकेश्वर हे अजून एक हेमाडपंती मंदिर आढळते. मंदिर पुन्हा उत्तर चालुक्य व यादव संगमकाळातले असल्याचे जाणवते. मंदिर परिसरात अनेक भग्नावस्थेतल्या मूर्ती सापडतात. त्यात शेषशायी विष्णू, सूर्य, गजलक्ष्मी अशा सुंदर मूर्तीही आहेत. गावात अजून महत्त्वाचे आकर्षण म्हणजे पाकार रचनेची भव्य बारव. हजार वर्षांपूर्वीचे स्थापत्यविशेष जपणारी ही बारव म्हणजे परभणीच्या गळय़ातला मौल्यवान दागिनाच म्हणायला पाहिजे. पुरातत्त्व खात्याकडून मार्गदर्शन घेऊन सहकार्य करणे अधिक उचित ठरू शकेल. हजार वर्षांपूर्वीचा वारसा जपणे हे स्थापत्य दृष्टीतून कौशल्याचे काम आहे. ते केवळ मुलामा किंवा रंगरंगोटी ठरू नये व त्या भरात बारकावे व पुरावे गाडले जाऊ नयेत ही दक्षता घेणे नितांत गरजेचे आहे.