पाठराखीण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संकलन – निनाद पाटील

ते म्हणतात ना की, कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला भरारी घ्यायची असेल तर पहिला हात देणारी व्यक्ती लागते आणि माझ्या आयुष्यात ती व्यक्ती वैशाली सामंत आहे. धन्यवाद वैशाली… अशीच पाठीशी रहा, सांगतोय गायक जयदीप बगवाडकर.

स्वप्न ही एक फारच मजेशीर गोष्ट आहे. आपण स्वप्न पाहतो आणि बहुतांशी ते स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करतो. मी लहानपणापासूनच एक स्वप्न पाहिलं होतं, पार्श्वगायक होण्याचं, ते म्हणजे माझ्या बाबांमुळे. ऑर्केस्ट्राच्या सुवर्णकाळामध्ये स्टेजवर बाबांना गाताना पाहायचो तेव्हाच मनात पक्क केलं होतं मी.

पण परिस्थिती बदलली. मी नववीत असतानाच बाबा लवकर गेले आणि माझ्या आयुष्याचं ध्येय बदललं. मी कॉम्प्युटर इंजिनीअर बनून थेट दुबईत नोकरी गाठली. इथे मुंबईत आई एकटीच होती. त्यामुळे तिला सपोर्ट करणं हे माझं पहिलं कर्तव्य होतं. गाणं सुरूच होतं. जमेल तसं, स्टेज मिळेल त्याप्रमाणे दुबईत गात होतोच आणि एके दिवशी मला वैशाली सामंतसोबत रंगमंचावर गायचा योग जुळून आला.

तिचा सहगायक येऊ शकत नाहीये हे समजल्यावर दुबईतल्या माझ्या मित्रांनी माझं नाव पुढे केलं आणि वैशालीच्या मनात धाकधूक सुरू झाली की, आता हे कॉन्सर्ट कसं पार पडेल दुबईतल्या ज्याला आपण ओळखत पण नाही अशा गायकासोबत? तिने मला ऐकलं आणि आमचा कार्यक्रमही उत्तम झाला. कार्यक्रमानंतर ती माझ्याशी सविस्तर बोलली. तिला माझ्यात असं काय दिसलं, जाणवलं माहीत नाही, पण तिने मला अतिशय सकारात्मकतेने मुंबईत येण्याचा सल्ला दिला…व्यावसायिक गायनासाठी! माझ्यासाठी हे खूपच मोठं होतं. वैशालीसारख्या प्रथितयश गायिकेने मला हा सल्ला द्यावा म्हणजे काहीतरी असेल तिच्या मनात.

ते म्हणतात ना की, कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला भरारी घ्यायची असेल तर पहिला हात देणारी व्यक्ती हवी आणि माझ्या आयुष्यात ती व्यक्ती वैशाली सामंत आहे. तिने मला ज्याप्रमाणे गाइड केले आणि माझ्यावर एक चांगला कलाकार बनण्याचे संस्कार केले, म्हणूनच कुठेतरी आज मी या क्षेत्रात रुजू शकलो. तिच्याकडे पाहून, तिच्यासोबतच्या प्रत्येक कॉन्सर्टमधून, रेकार्ंडग स्टुडिओमध्ये तिच्या ऐकलेल्या प्रत्येक गाण्यातून मी खूप शिकलो.

वैशालीने सतत मला पॉझिटिव्हिटी दिली, अजूनही देते. कुणीतरी आहे जे तुमच्या कामावर लक्ष ठेवतंय, जर चुकलो तर आपला कान धरण्यासाठी कुणीतरी आपल्या आजूबाजूला आहे हे फारच मोलाचं आहे. आजही कुठेही अडलो तरी मला खात्री असते की, एक मेसेज किंवा पह्न कॉलवर मला वैशाली मोलाचं मार्गदर्शन करेल. खूप भाग्यवान असल्यासारखं वाटतं.

आतापर्यंतच्या सांगीतिक प्रवासात एक गोष्ट जी प्रकर्षाने जाणवली की, तुम्हाला तुमच्या प्रवासात कोण माणसं भेटतात, ती माणसं तुमच्या जडणघडणीत काय योगदान देतात, प्रत्येक कामागणिक तुम्ही काय शिकत जाता, जेव्हा तुम्ही कुणाला संधी देता तेव्हा तुम्ही कसं वागता, या सगळय़ा गोष्टींचं मर्म म्हणजे तुमच्यात असलेली सकारात्मकता! जर तुम्ही प्रत्येक कामात आणि तुमच्या रोजच्या जीवनात सकारात्मक दृष्टीने काम करत राहिलात तर चांगला रिझल्ट येणारच आणि त्याच सकारात्मक दृष्टिकोनाने आपण स्वप्ने पाहत राहिली पाहिजेत. ती नक्कीच पूर्ण होतात आणि आपल्याला भरपूर मानसिक समाधान देतात…थॅंक्स यू वैशाली….अशीच पाठीशी रहा.