>> नीती मेहेंदळे
या लाल चिऱयाच्या दगडात बांधून काढलेलं प्रशस्त मंडप असलेल्या शिवमंदिरापाशी आपण पोचतो आणि दिवेआगर या नावाचं गुपित आपल्याला समजून जातं. देवळाच्या परिसराला फेर धरून असलेल्या अनेक दीपमाळांच्या जोडय़ा पाहून आपण थक्क होतो. त्रिपुरारी पौर्णिमेला किंवा महाशिवरात्रीला जेव्हा या दीपमाळा एकत्र प्रज्वलित होत असतील तेव्हा दिवेआगर हे दिव्यांचं आगर असल्याची प्रचीती पर्यटकांना नक्की येत असेल.
जंजिरा-मुरुडच्या पलीकडे जेट्टीने किनारा धरून दक्षिणेस जात राहिलं की तीन पंचतनं लागतात. पैकी आगर पंचतन आणि बोर्ली पंचतन अशी दोन जुळी गावं अगदी एकमेकांना खेटून आहेत. बोर्ली पंचतनमधूनच आगर पंचतनकडे जायचा मार्ग आहे. हे आगर पंचतन म्हणजेच आताचं दिवेआगर आणि प्राचीन दीपागार. गावात पाऊल ठेवतो तेव्हा राष्ट्रकूट, सातवाहन आणि शिलाहार राजवटींमध्ये आपलं छोटेखानी बंदर आणि अपरान्तातलं व्यापारी गाव म्हणून महत्त्व सांभाळून असलेल्या या प्राचीन गावात दाखल झाल्याची जाणीव होते. आजचं दिवेआगरही काही कमी वैशिष्टय़पूर्ण नाही. इथल्या सगळ्या पाखाडय़ांना जोडणाऱया मुख्य रस्त्याला लागून चालत राहिलं तर मऊसूत रेखीव शुभ्र मोदकांचा घमघमाट अनेक सुग्रास भोजनालयांच्या दरवाजांतून येत असतो. स्वयंभू स्वच्छतेचे महत्त्व उमगलेल्या नाजूक लालचुटुक आळ्या, त्यांना सजवणारं नारळी-पोफळीचं गणगोत, खणखणीत घंटानाद आणि त्यातून कानावर पडणारे संस्कारी आवर्तनं आणि रुद्राभिषेकांचे सूर ही दिवेआगरची तोंडओळख. या गावाच्या नावाची उत्पत्ती जाणून घेण्यासाठी गाव नक्कीच पालथं घालावं लागतं. गावाच्या सीमेवरच काही वर्षांपूर्वी गावाला झटपट प्रसिद्धी मिळवून देणारा सुवर्ण गणेश म्हणजे सोन्याचा गणपती नवंकोरं मंदिर थाटून बसला आहे. त्या मंदिरातली मूर्ती चोरीस गेली. मग ती सरकारने ताब्यात घेतली वगैरे प्रकार झाले खरे, पण शेवटी मूळ सोन्याची मूर्ती आज गाभाऱयात नाही हे वास्तव आहे. दिवेआगरातला बगाडाचा उत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्याची जत्रा भरते ती गावाच्या वेशीजवळ असलेल्या सिद्धनाथ भैरवाच्या देवळापाशी असलेल्या विस्तीर्ण मैदानात.
ते मंदिर मागे टाकत उत्तरेकडे जात राहिलं की रूपनारायण – सुंदरनारायण अशी दोन दृष्टी खिळवून टाकतील अशी लाल मातीच्या चिऱयांनी बांधलेली विष्णू या देवतेची मंदिरं डाव्या बाजूला लागतात. तसंच पुढे जात राहिलं की पहिलं शिवालय लागतं ते हरिहरेश्वराचं. हनुमान पाखाडीमधल्या या देवळाची उंचच उंच दीपमाळ दुरूनही लक्ष वेधून घेते. त्याच्या पुढच्या आळीमधलं अजून एक प्राचीन गोठणेश्वर हे शिवालय आता पुनरुज्जीवित अवस्थेत पाहायला मिळतं. त्याशेजारी एक खूप जुना वड आहे. कोकणातल्या इतर समकालीन देवळांच्या तुलनेत दिवेआगरमधल्या मंदिरांची अवस्था बरीच चांगली आहे. बरीचशी जीर्णोद्धारीत आहेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवेआगरातली ही सगळी शिवालयं ही शिलाहारकालातली म्हणजे 9 ते 13 व्या शतकात बांधलेली आहेत. हे गाव शिलाहारांच्या राजवटीत अस्तित्वात होतं याचे अनेक पुरावे आजही गावात सापडतात. उत्तरेश्वराच्या आणि गोठणेश्वराच्या देवळातल्या भग्नावस्थेतल्या मूर्ती त्यांचं वय आठ ते बाराव्या शतकातलं असल्याची ग्वाही देतात. पूर्वी गावात काही शिलाहारकालीन ताम्रपटही मिळाले आहेत. सध्या गावात ग्रामपंचायतीजवळ धज (ध्वज) या ठिकाणी एका चौथऱयावर एक शिलालेख उघडय़ावर ठेवलेला आहे. निजामशाहीतल्या सुलतान बुऱहाण निजामशहाच्या नावाचा उल्लेख असलेला हा लेख मध्ययुगातील असल्याचा दाखला देतो. तसेच एका गावकऱयाच्या वैयक्तिक मालकीच्या शेतात असलेला गद्धेगाळ बाराव्या शतकातला असल्याचे निदर्शनास आले आहे. इथल्या गणपतीच्या देवळात अन्नपूर्णा देवीची तांब्याची मूर्ती आहे. तिची घडण शिलाहारकालीन असल्याचा दावा करते.
दिवेआगर हे मुळातच संपन्न गाव आहे. गावातील रस्त्यावर चिऱयांच्या दगडाची संरक्षक भिंत, त्यामागे मोठे घर, मागे नारळी, सुपारीची व केळीची वाडी असा प्रत्येक घराचा थाट असलेलं सुबक गाव शोधून सापडणार नाही.




























































