काव्यधारा – पडद्यामागचे पडदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> निती मेहेंदळे

त्या संवेदनांच्या तळाशी सापडतं मला एक रहस्य माझीच लेक आहे ना ती! अदृश्य पडद्यामागे उरून आहे जाणिवेसकट, संवादी विसंवादी वेषात ओळखीच्या अनोळखी रूपात…

मुलीचं नव्या उंच इमारतीत
घर आलंय आता
तळावरच्या संपर्कापासून उंच
आलंय तसं बघता…

मोकळ्या अवकाशाला आसुसलं होतं
आलं तेव्हा
वाटलं खुला श्वास घेईल घर
खिडक्या उघडेल जेव्हा…

पण त्या उघडायच्या नाहीत आता
वातानुकूलित होतंय ना घर
या घराला आहेत अनेक पडदे
म्हणून पडदानशील रहातंय घर…

मी गुदमरून जाते जेव्हा
ऐकू येईनासं होतं
त्या बाहेरच्या बोलवित्या
निसर्गाचं आमंत्रण
दिसावेसे वाटतात खरे
निःशुल्क वारे आणि तेजोकिरण…

पण पाहते मी मुलीला
बोलताना आभासी जगाशी
संपर्कात असते ती
निसर्गविरहित सृष्टीशी
तह करते मी वादांशी…

विश्वास आहे अजून मला की
पडदे नसतात नेहमीच अपारदर्शक
कधी चमकत असतात त्यांच्यातून
संवेदना-भावना-स्पंदनांचे लोलक…
आणि त्या संवेदनांच्या तळाशी
सापडतं मला एक रहस्य
माझीच लेक आहे ना ती!
आमच्यामधल्या एका
अदृश्य पडद्यामागे
उरून आहे जाणिवेसकट
मी
एका परिचयाची अपरिचित
संवादी विसंवादी वेषात
ओळखीच्या अनोळखी रूपात…

मूळ कविता : प्रतिभा सराफ

काव्यसंग्रह : खिडक्या आणि पडदे

मुलीने सांगितले,
‘खिडकी उघडायची नाही घराची…
जराही सरकवायचे नाहीत पडदे’

तळमजल्यावरचे घर विकून…
टोलेगंज इमारतीत घेतले हे घर
मोठी झेप घेऊन…

केवळ स्वच्छ सूर्यप्रकाश आणि
खूप नैसर्गिक हवा घरात खेळावी म्हणून…
आता मात्र
दिवसासुद्धा घरात विजेचे दिवे
आणि एअरकंडिशन!

पापण्यांचे पडदे उघडताच…
उघडतात अनेक खिडक्या
एकामागून एक लॅपटॉपच्या…
मग चालत राहतो तिचा आभासी
जगताशी संवाद अशा वेळेस,
मी मात्र टाळते वास्तवातील वाद-संवाद!
किती सहजपणे तोडून टाकले
तिने संबंध निसर्गाशी आणि
खिडकीबाहेरच्या माणसांशीसुद्धा!

तसेच जाणवते, कळते,
गुदमरून टाकते एक जाणीव…
की माझ्या मुलीमध्ये माझेच रक्त वाहत असते
आणि आता
मनाचे पडदे आम्हा दोघींमध्ये…
कोणालाही न दिसणारे…
न जाणवणारे!

कवयित्री : प्रतिभा सराफ

कवयित्रीचा परिचय

कवयित्री प्रतिभा सराफ या मुंबईतील कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र्ााच्या व्याख्यात्या आहेत. त्यांना साहित्यासाठी 50 च्या वर पुरस्कार मिळाले आहेत.

मात्र एक नाही, मातीत पूर्णत्वानं रुजण्यापूर्वी…, उमलावे आतुनीच हे काव्यसंग्रह तसेच कथासंग्रह, व्यक्तिचित्रणे, ललित संग्रह, गझल संग्रह, कादंबरी, बाल एकांकिका, बालकथासंग्रह, माहितीप्रद असे चतुरस्र लेखन त्यांनी केलं आहे.
‘मी प्रतिभा, माझी प्रतिभा’ नावाचा स्वरचित कवितांवर आधारित कार्यक्रम झाला आहे.

मॅजेस्टिकच्या ‘ललित’ या मासिकामध्ये ‘दृष्टिक्षेप’ हे पुस्तक परीक्षणाचे त्यांचे सदर चालू आहे आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळावरील त्या माजी सदस्य आहेत.