लेख – गणेशोत्सव आणि पर्यावरणाचा विचार

>> पं. विद्याधरशास्त्री करंदीकर, पंचांगकर्ते

गणेश हा बुद्धिदाता आहे. 14 विद्या आणि 64 कला या गणेश उपासनेने लाभू शकतात. मुळातच आपली संपूर्ण लिपी गणेशाच्या रूपानेच बनली आहे, असा विचारही काहींनी मांडला आहे. गणेश चतुर्थी हे एक व्रत आहे. याला वरद चतुर्थी असेही म्हटले जाते. या काळात गणपतीची जी पूजा केली जाते ती सिद्धिविनायक किंवा पार्थिव गणेश म्हणून केली जाते. यासाठी आपण स्वतः मातीचा गणपती बनवायचा, असे शास्त्रकारांनी सांगितले आहे. मृत्तिकेच्या गणपतीचे विसर्जन सहज होते आणि ते पर्यावरणाला हानीकारकही नसते. यावरून आपल्या शास्त्रकारांनीही सण-व्रतवैकल्ये-उत्सव यादरम्यानच्या प्रथा-परंपरा सांगताना पर्यावरणाचा विचार केलेला आहे हे लक्षात येते.

आज भाद्रपद चतुर्थीला गणेशाचे आगमन घराघरांत होईल. त्यानिमित्ताने गणेशोत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व आपण समजून घ्यायला हवे. शास्त्रकारांनी कोणत्याही मंगलकार्यापूर्वी गणपतीची आराधना करावी, असे सांगितले आहे. कारण तो विघ्नहर्ता आहे. गणेश ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे प्रत्येक सर्जनशील व्यक्ती किंवा अगदी संतमहात्म्यांनीही आपल्या कलेची साधना करताना, निर्मिती करताना, त्याचे आविष्करण करताना गणेशाची उपासना केली आहे. खरे पाहता शारदा ही बुद्धीची देवता आहे असे आपण म्हणतो. मग हा विरोधाभास आहे का? असा प्रश्न निर्माण होते, पण गणेशामुळे बुद्धी, ज्ञान मिळते आणि ते व्यक्त करण्यासाठी शारदेची मदत लागते. विद्या दुसऱयाला देण्याची कला ही शारदेमुळे मिळते. शारदा ही वाणीची देवता आहे. म्हणूनच तिला वाक्देवताही म्हणतात. गणेश हा बुद्धिदाता आहे. 14 विद्या आणि 64 कला या गणेश उपासनेने लाभू शकतात. गणेशाची उपासना करताना अथर्वशीर्षाचे पठण केले जाते. गणेशोत्सवादरम्यान अनेक ठिकाणी अथर्वशीर्षाची आवर्तने केली जातात. अथर्वशीर्षातील मंत्रांमध्ये मोठे सामर्थ्य आहे. मुळातच आपली संपूर्ण लिपी गणेशाच्या रूपानेच बनली आहे, असा विचारही काहींनी मांडला आहे. हे संपूर्ण जग हे गणेशापासूनच बनले आहे असे त्यात म्हटले आहे. गणेश ही युद्धदेवता आहे. तो युद्धाचा प्रमुख होता. एकवीस गणांचा अधिपती हा गणपती होतो. अशा प्रकारे महागणपती हा लक्ष लोकांचा गट असे सांगितले आहे.

गणेश चतुर्थी हे एक व्रत आहे. याला वरद चतुर्थी असेही म्हटले जाते. धर्मशास्त्रातील आणि पुराणांमध्ये यासंदर्भात अनेक संदर्भ आणि माहिती आढळते. गणेश चतुर्थीसाठी आपण स्वतः आपल्या हाताने मातीचा गणपती बनवायचा, असे शास्त्रकारांनी सांगितले आहे. त्याचबरोबर माती आणून, भिजवून मूर्ती तयार होण्यापर्यंत गणपतीच्या नावांचे निरनिराळे मंत्र सांगितले आहेत. या मंत्राचे उच्चारण करत ही मूर्ती घडवली जावी, असे अभिप्रेत आहे. तसेच या मूर्तीची मध्यान्हाला पूजा करून, नेवैद्य दाखवून त्याच दिवशी त्याचे विसर्जन करावे, असा उल्लेख पार्थिव गणेशोत्सव व्रतामध्ये आढळतो. मात्र आपला समाज उत्सवप्रिय आहे. त्यामुळे दीड दिवस, पाच दिवस गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा रूढ झाली.

आपल्याकडे कृषीप्रधान अर्थरचना आणि समाजरचना आहे. श्रीगणेशाचे रूपही शेतकऱयांशी जोडले गेलेले आहे. गणपतीचे कान सुपासारखे आहेत. सूप शेतकऱयांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. शेतातून काढणी केलेला भात सुपातून पाखडला जातो. त्यानंतर भाताचे पह्ल वाऱयावर उडून जातात आणि आतील तांदूळ फक्त सुपात राहतो. अशा प्रकारे या सुपाचा शेतकऱयांना उपयोग होत असतो. भाताची लोंबी गणपतीच्या सोंडेसारखी दिसते. गणरायासंदर्भातील अशा प्रकारची वर्णनेही आपल्याला आढळतात.

गणपतीच्या पूजेमध्ये विविध प्रकारच्या पत्रींचा समावेश असतो. गणरायाला वाहिल्या जाणाऱया पत्री म्हणजे आयुर्वेदिक वनौषधी आहेत. विशेषतः गणपतीला दूर्वा प्रिय आहेत. आयुर्वेदानुसार दूर्वा या अत्यंत थंड मानल्या जातात. यासंदर्भातही एक कथा आढळते. अनलासुर नावाच्या राक्षसाने बालरूपातील गणेशाला गिळण्याचा प्रयत्न केला; परंतु गणपतीने विराट रूप धारण केले आणि अनलासुरालाच गिळंकृत केले. त्या राक्षसाचा नाश तर झाला, पण इकडे गणपतीच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली. तो गडबडा लोळू लागला. त्यानं सर्वांगाला चंदनाचा लेप दिला. तरीही दाह काही थांबेना. तेव्हा देवांनी त्याच्या डोक्यावर चंद्राची स्थापना केली. त्यामुळे गणपतीला भालचंद्र असे नाव पडले. विष्णूने आपल्या हातातील कमळ त्याच्या हाती दिले. त्यामुळे त्यास पद्मपाणी असे नाव मिळाले. भगवान शंकराने आपल्या गळ्यातील नाग गणपतीच्या कमरेला बांधला. वरुणाने गणपतीच्या सर्वांगावर पाण्याचा अभिषेक केला. तरीही अंगाची लाही थांबेना. इतक्यात काही ऋषीमुनी तेथे आले आणि त्या प्रत्येकाने 21-21 दुर्वांची जुडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली. ती ठेवल्याबरोबर तत्काळ गणपतीच्या अंगाची आग शांत झाली. त्यामुळे गणपतीला आजही दूर्वा वाहिल्या जातात. वर्षभर दूर्वा दिसल्या नाहीत तरीही पहिला पाऊस पडला की, त्या उगवतात. मे महिन्यामध्ये ज्या जमिनीत दुर्वेचा अंकुरही दिसत नाही, त्या जमिनीत पहिला पाऊस पडला की, दुर्वेची दोन टोके वर आलेली दिसतात. दूर्वा कधीही मरत नाहीत. त्या चिरंजीवी आहेत. दुर्वांसाठी जो मंत्र सांगितला आहे त्यामध्ये दूर्वा या दुःस्वप्ननाशिनी आहेत असे म्हटले जाते. वाईट स्वप्न पडण्याच्या समस्येवर उपाय म्हणून सकाळी दूर्वा खाव्यात. अशाच प्रकारे इतर प्रत्येक वनस्पतींमध्ये काही ना काही औषधी गुणधर्म आहेत. गणपतीला इतर वेळी तुळस वाहिली जात नाही; मात्र गणेश चतुर्थीच्या पूजेदरम्यान तुळसही वाहिली जाते. तुळशीचे आरोग्यदायी उपयोग सर्वश्रुत आहेत. याखेरीज पिंपळ, देवदार, बेल, शमी, दूर्वा, धोतरा, माका, बोर, आघाडा, रुई, मंदार, अर्जुनसादडा, मरवा, केवडा, अगस्ती/हादगा, कण्हेर, मालती/मधुमालती, बृहती, डाळिंब, विष्णुकांत / शंखपुष्पी, जाई या वनस्पतींच्या पत्री गणरायाच्या चरणी भक्तिभावाने अर्पण केल्या जातात आणि गणेशाकडे कृपादृष्टीसाठी आशीर्वाद मागितला जातो.

आपल्याकडे दीड, पाच, सात, नऊ आणि 11 या दिवसांमध्ये गणपतीचे विसर्जन केले जाते. गणेशाच्या विसर्जनाबाबतही शास्त्रकारांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. आपल्या सर्व देवता मंत्राधीन आहेत. त्यामुळे या देवतांची पूजाही मंत्रांनी होते आणि विसर्जनही मंत्रांनीच होते. मृत्तिकेपासून म्हणजेच मातीपासून बनवलेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यास ती विरघळून जाते. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत नाही. मात्र प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या, रसायनांचा वापर केलेले रंग दिलेल्या मूर्तींमुळे पाणी प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर एक पर्याय म्हणजे गणेश मंडळांनी उत्सवमूर्ती वेगळी ठेवून दरवर्षी शाडूची मूर्ती वापरावी. त्यामुळे नदीचे, पाण्याचे आणि पर्यायाने पर्यावरणाचे नुकसान होणार नाही. शेवटी कोणताही उत्सव हा मंगलदायी असावा. त्यातील मांगल्य जपणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. गणपती हा तर मंगलमूर्ती आहे. त्यामुळे त्याचा उत्सव साजरा करताना सर्वांनीच या सणाचे पावित्र्य, मांगल्य जपण्याचा प्रयत्न करावा.