प्रासंगिक – एका विज्ञान ऋषीची जन्मशताब्दी

>> प्रदीप म्हात्रे

मराठी विज्ञान परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि विज्ञान प्रसारासाठी आयुष्य वाहिलेले प्रा. रा. वि. सोवनी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्त त्याच्या कार्याचा आढावा घेणारा लेख.

प्रा. रामचंद्र विनायक ऊर्फ रा. वि. सोवनींनी विज्ञान प्रसाराकरिता तत्कालीन उपलब्ध माध्यमांमध्ये लीलया संचार केला. केवळ वर्तमानपत्रे, नियतकालिके इतकेच नव्हे, तर आकाशवाणी-दूरदर्शनचे ते हक्काचे लेखक-वत्ते होते. दूरदर्शनवरील ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ या कार्यक्रमात त्यांनी घेतलेल्या (प्रा. जयंत नारळीकर आणि प्रा. शशिकुमार चित्रे यांच्या) मुलाखती विशेष गाजल्या.

प्रा. रामचंद्र विनायक ऊर्फ रा. वि. सोवनी यांचा जन्म 30 एप्रिल 1924 रोजी सातारा येथे झाला. तथापि, त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. फर्ग्युसन आणि स. प. महाविद्यालयात शिकताना त्यांना जी मातब्बर मंडळी प्राध्यापक म्हणून लाभली. त्यामध्ये काही मराठी भाषेतील तर काही विज्ञान प्रसारातील दिग्गज होती. प्राणिशास्त्रातील पदवीधारक सोवनींनी स.प. महाविद्यालयात प्रयोग सहाय्यक म्हणून काम करताना वेळेचा सदुपयोग करत एम. एससीचे शिक्षण पूर्ण केले. 1952साली प्राणिशास्त्राचे व्याख्याता म्हणून मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयातून अध्यापनाची कारकीर्द सुरू केली. प्राणिशास्त्रासारखा किचकट विषय शिकवताना अल्पावधीतच प्रा. सोवनी विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरले. केवळ वर्षभराच्या कालावधीतच त्यांना कुलकर्णी नावाच्या विद्यार्थ्यामुळे ’चित्रा’ मासिकात लेख लिहिण्याची संधी मिळाली आणि अध्यापनाबरोबरच त्यांचा विज्ञान प्रसाराचा मार्ग खुला झाला. अनेक ठिकाणांहून त्यांना मागणी येऊ लागली. आचार्य अत्रे यांनी तर सोवनींचे ‘विज्ञानाची क्षितिजे’ हे सदर दै. ‘मराठा’मध्ये सुरू केले. तो विश्वास सार्थ ठरवत सोवनीनी इतके लिखाण केले की, त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

प्रा. सोवनी हे हाडाचे शिक्षक होते. शालेय मुलांपासून थोरामोठय़ांपर्यंत ते सहज संवाद साधू शकत. मग तो संवाद प्रत्यक्ष असो वा पत्रामार्फत. शालेय विद्यार्थ्यांचे शंकानिरसन त्यांनी ‘रामकाका’ या नावाने केल्याचं धूसरसं आठवतं. त्यांच्या हाताखालून गेलेल्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत आपला नावलौकिक मिळवल्याचंही पाहायला मिळतं. त्याकरिता दोन उदाहरणं बोलकी ठरावीत. नाटय़-चित्रसृष्टीत स्वतःच्या नावाचा ठसा उमटविणारे डॉ. काशिनाथ घाणेकर हे त्यापैकी एक, तर दुसरे म्हणजे डॉ. अजित डांगी, जे अनेक वर्षे जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीत उच्चपदस्थ होते आणि पुढे ते भारतीय औषधोत्पादक संघटनेचे (ओपीपीआय) अध्यक्ष होते.

विज्ञान लेखनाच्या निमित्ताने अनेक तऱहेचे संदर्भ चाळत. साहजिकच मुंबईतील अनेक ग्रंथालयांत त्यांचा राबता असे. त्यामध्ये प्रामुख्याने मराठी विज्ञान परिषद, रुपारेल महाविद्यालय, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, हाफकिन, हिंदुजा रुग्णालय इत्यादी ग्रंथालयांचा किमान समावेश होता. ग्रंथसेवकांशी असलेला त्यांचा ‘कनेक्ट’ खूपच चांगला होता. त्यामुळेच राज्य मराठी विकास संस्थेने प्रकाशित केलेल्या ’विज्ञान वाङ्मय सूची’चे संकलन-संपादन ते यशस्वीरीत्या करू शकले. त्या वेळी त्यांनी ग्रंथसेवकांशी साधलेला संवाद मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. प्रा. सोवनी मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिकेचे अठरा वर्षे संपादक होते. अवती-भवती’, ‘वाटा संशोधनाच्या’ या सदरांमध्ये देश-विदेशातील संशोधनाबद्दल संदर्भ देत खुशखुशीत लिखाण ते करत. त्यात त्यांनी वापरलेले मराठी प्रतिशब्द उदा. यांत्रव (रोबो), रक्तगळ (हिमोफिलिया), फुटवा (क्लोन) वगैरे शब्द गमतीदार, पण संयुक्तिक वाटत. प्रा. सोवनींनी लिहिलेल्या-संपादित केलेल्या पुस्तकांची संख्या पन्नासच्या घरात असून त्यामध्ये ‘मराठी विज्ञान वाङ्मय सूची’ आणि ‘विज्ञान संकल्पना कोश’ उल्लेखनीय आहेत. विज्ञान प्रसार कार्याबद्दल प्रा. सोवनींना मराठी विज्ञान परिषद सन्मान (1972), मविप सन्मान्य सभासदत्व (1994) आणि फाय फाऊंडेशन पुरस्कार (1997) इत्यादी मानसन्मान मिळाले असले तरी ते पुरेसे नव्हते असं मनोमन वाटतं. अर्थात, त्यांनी तशी अपेक्षा कधीच बाळगली नाही. तथापि, 1998 साली मराठी विज्ञान परिषद पत्रिकेला जाहीर झालेला महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार (रु. 50 हजार रोख आणि सन्मानचिन्ह) हा त्यांच्याच कारकीर्दीतला, जो त्यांनी स्वतः उपस्थित राहून परिषदेच्या वतीने स्वीकारला, हीच त्यातल्या त्यात समाधानकारक बाब म्हणायला हवी.

[email protected]