
>> प्रज्ञा सदावर्ते
वस्तुसंग्रहालये आपल्या परंपरांचा आरसा आहेत. पूर्वजांचा अनमोल ठेवा ते सांभाळून ठेवतात भविष्यकाळात शिक्षकाची भूमिका बजावण्यासाठी. एकेक शिल्प म्हणजे कलेचा अभ्यास करणाऱयांसाठी पूर्ण ग्रंथच आहे. येथील पाषाणशिल्प, धातुशिल्प कुठल्याशा शतकातील अनामिक शिल्पकारांनी आजच्या कलाप्रेमींसाठी मागे ठेवलेला अनमोल ठेवा आहे. हा वारसा जपण्याचा वसा प्रत्येकाने घेतला पाहिजे.
नाशिक शहरात गोदावरी नदीपासून अगदी जवळ पेशवेकालीन सरकारवाडय़ात महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाचे प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. दोन मजल्यांवरील दोन भव्य दालनांतील कोपरान् कोपरा आपल्याला इतिहासाशी जोडू पाहतो. एखादे पाषाणशिल्प 5व्या शतकाचा इतिहास सांगते, कुठे नाणी, धातुशिल्प, अप्रतिम चित्रे हिंदुस्थानी कलेचा वारसा सांगू लागतात, तर एखादा कोपरा शस्त्रास्त्रांची वैशिष्टय़े उलगडून दाखवतो.
महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे नाशिक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय 19 ऑक्टोबर 1985 रोजी स्थापन करण्यात आले आहे. या संग्रहालयात नाशिक, धुळे, नगर, जळगाव, नंदुरबार जिह्यांतील उत्खननात सापडलेले तसेच सर्व्हेदरम्यान मिळालेले पाषाणशिल्प, धातुशिल्प मांडण्यात आले आहेत, तर काही दुर्मिळ मूर्ती त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन जाणकार व्यक्तींनी पुरातत्व विभागाला भेट दिल्या आहेत. मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टकडून दुर्मिळ शस्त्रास्त्रs मिळाली आहेत. मुळात पेशवेकालीन सरकारवाडय़ाचेच स्वतःचे असे वैभव आहे. या वाडय़ात वर्षभरापूर्वी नव्या रूपातील वस्तुसंग्रहालय नाशिककरांसाठी खुले झाले आहे. त्यामुळे सरकारवाडा आणि दुर्मिळ वस्तू बघण्याचा दुहेरी योग साधला जातो. पाषाणशिल्प दालन, शस्त्रास्त्रs, नाणे व धातुशिल्प आणि जगविख्यात चित्रकार राजा रविवर्मा यांची अप्रतिम चित्रे अशी दालने संग्रहालयात करण्यात आली आहेत.
संग्रहालयाच्या भव्य मुख्य दरवाजातून आत येताच डावीकडे 12व्या शतकातील आयताकृती शिल्पपट आपले स्वागत करतो. याच रांगेत 12व्या शतकातील जैन तीर्थंकर यांच्या मूर्ती आहेत. सुमारे तीन फूट उंचीची अच्युतमूर्ती मोठी देखणी आहे. याच पाषाणशिल्प दालनात सर्वात मोठी साधारण साडेचार फूट उंचीची लक्ष्मीमूर्ती आहे. श्रीनारायण, मधुसूदन, श्रीगणेश अशा अनेक पाषाणमूर्ती शिल्पकलेचा समृद्ध वारसा सांगतात. या संग्रहालयातील सर्वात प्राचीन म्हणजे 5व्या शतकातील शक्तीगणेश, सिंहमुख, गंधर्व या मूर्ती लक्ष वेधून घेणाऱया आहेत. 12 व्या शतकातील शिव-पार्वती, श्रीगणेश, 14 व्या शतकातील स्त्राrशिल्प, 17 व्या शतकातील गरुडमूर्ती हाही अमूल्य ठेवा आहे.
शस्त्रास्त्र दालनात श्रीविष्णूंचे दशावतार कोरलेली तलवार आहे, तिचा उपयोग मानसन्मानासाठी केला जात होता. सरदार विंचूरकर यांच्याकडील 17 व्या शतकातील चकमकी बंदूक, दंडाच्या सुरक्षेसाठी वापरला जाणारा दस्ताना, मुघल व मराठा कालखंडातील शस्त्रास्त्रs जसे- कटयार, खड्ग बारूददान, खंजीर, ढाल हेही संग्रही आहेत. गंज न चढणाऱया बर्मी धातूपासून तयार केलेली हिंदुस्थानच्या उत्तर पूर्वेकडील शस्त्रास्त्रsदेखील येथे मांडण्यात आली आहेत.
धुळे जिल्हय़ातील साक्री-पिंपळनेर भागात उत्खननात सुमारे 25 पंचधातूच्या मूर्ती सापडल्या आहेत, त्या आकाराने छोटय़ा आहेत. त्यांचा कालखंड 17वे ते 18वे शतक आहे. यात उमा-महेश्वर, गरूड, वसुंधरा, श्रीगणेश, बालकृष्ण, कालियामर्दन, दीपसमई यांचा समावेश आहे. दुसऱया मजल्यावरील दालनात 19व्या शतकातील फारशी शिलालेख आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या शतकातील चामुंडा, महिषासुरमर्दिनी, श्रीधर, मधुसूदन, बुद्धमूर्ती, श्रीविष्णू यांच्या पाषाणमूर्ती बघावयास मिळतात.
पुरातत्व विभागाच्या राज्यातील 13 वस्तुसंग्रहालयांपैकी नाशिकचे प्रादेशिक संग्रहालय एक आहे. येथील दुर्मिळ नाणी संग्रहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराई आहेत. इ.स.पूर्व 1 ते इ.स. 3 मधील सातवाहनकालीन व पहिल्या शतकातील सम्राट कनिष्क यांच्या काळातील तांब्याची नाणी, इ.स.पूर्व 6 ते पहिल्या शतकातील नंद-मौर्य यांची चांदीची नाणीही बघण्यासाठी उपलब्ध आहेत. मुघल, टिपू सुलतान काळातील नाणीही येथे आहेत. हा अमूल्य ठेवा जतन करण्यासोबतच जनतेला त्याची माहिती मिळावी, विद्यार्थ्यांमध्ये त्याविषयी गोडी वाढावी यासाठी पुरातत्व विभाग प्रयत्नशील आहे. या दुर्मिळ शिल्पकृतींची माहिती मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा वैभवशाली वारसा जनतेला समजावा या भावनेतून पुरातत्व विभाग कायम प्रयत्न करतोय, अशी माहिती सहाय्यक संचालक डॉ. विराग सोनटक्के यांनी दिली.
वस्तुसंग्रहालये आपल्या परंपरांचा आरसा आहेत. पूर्वजांचा अनमोल ठेवा ते सांभाळून ठेवतात भविष्यकाळात शिक्षकाची भूमिका बजावण्यासाठी. एकेक शिल्प म्हणजे कलेचा अभ्यास करणाऱयांसाठी पूर्ण ग्रंथच आहे. येथील पाषाणशिल्प, धातुशिल्प कुठल्याशा शतकातील अनामिक शिल्पकारांनी आजच्या कलाप्रेमींसाठी मागे ठेवलेला अनमोल ठेवा आहे. हा वारसा जपण्याचा वसा प्रत्येकाने घेतला पाहिजे.
























































