साय-फाय – जगाचे फुप्फुस धोक्यात

>> प्रसाद ताम्हनकर, [email protected]

अॅमेझॉन या वर्षावनाला जगाचे फुप्फुस म्हणून ओळखले जाते. जगातील सर्वात मोठे असे हे वर्षावन पृथ्वीवरील 205 ऑक्सिजन एकटय़ाने तयार करते. तसेच मोठय़ा प्रमाणावर कार्बन डायऑक्साइड शोषून घेत असल्याने पृथ्वीवरील हवामान बदलाचा वेग कमी होण्यास मोठी मदत मिळते. जगातील सर्वात मोठा जैवविविधता असलेला हा प्रदेश दक्षिण अमेरिकेत आहे आणि ब्राझील, पेरू, कोलंबिया व इतर सहा देशांमध्ये पसरलेला आहे. या वर्षावनातील अब्जावधी झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषत असल्याने आणि मोठय़ा प्रमाणावर ऑक्सिजन निर्माण करत असल्याने त्याला जगाचे फुप्फुस म्हणून ओळखले जाते.

जगासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा या प्रदेशाचे भविष्य मात्र सध्या धोक्यात आल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिलेला आहे. मोठय़ा प्रमाणावर होणारी जंगलतोड आणि हवामान बदलाच्या दुष्परिणामांमुळे हे अमेझॉन वर्षावन नाश पावायला सुरुवात झालेली आहे. इथे सातत्याने लागणाऱया आगींमुळेदेखील जंगलाची मोठय़ा प्रमाणावर हानी होत आहे. अमेझॉनची जंगले ही फक्त हवामान बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी महत्त्वाची नसून दलदल आणि गवताळ प्रदेशानेदेखील व्यापलेली आहेत. इथे 40 हजार प्रकारच्या वनस्पती आढळतात. यामध्ये अनेक दुर्मिळ आणि फक्त अमेझॉनमध्ये सापडणाऱया काही प्रजातींचा समावेश आहे. 425 पेक्षा जास्त सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, 375 पेक्षा जास्त सरपटणाऱया प्राण्यांच्या प्रजाती यांचे हे निवासस्थान आहे. डार्टसारख्या बेडकासह इतर 400 प्रकारचे उभयचर प्राणी आणि माशांच्या सुमारे 3000 प्रजातीदेखील इथे आढळतात.

एक संपूर्ण परिसंस्था असलेले हे अमेझॉनचे जंगल शेकडो प्रकारच्या स्थानिक समुदायांचेदेखील आश्रयस्थान आहे. इथूनच जगातील सर्वात मोठी अमेझॉन नदीदेखील वाहते. या नदीच्या तब्बल 1100 उपनद्या आहेत, यावरून तिच्या भव्यतेचा अंदाज यावा. अमेझॉन नदी ही पृथ्वीवरील सर्वात मोठा गोड पाण्याचा स्रोतदेखील आहे. हे पाणी पुढे अटलांटिक महासागरात मिळते आणि समुद्राचे प्रवाह राखण्याच्या संतुलनात मदत करते. मात्र पृथ्वीच्या या फुप्फुसाचा काही भाग जेवढा कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो, त्यापेक्षा जास्त उत्सर्जित करायला लागला आहे.

अमेझॉनच्या विनाशासाठी जंगलतोड, जमिनीचा ऱहास हे घटक जसे कारणीभूत आहेत, तसेच तापमानात झपाटय़ाने होत असलेली वाढ, दीर्घकाळ सुरू असलेला दुष्काळ आणि जंगलात सतत पेटणारे वणवेदेखील तितकेच कारणीभूत आहेत. सहसा ओलसर असणारे हे जंगल आता कोरडे पडत चालले आहे आणि त्यामुळे ते आगीच्या भक्ष्यस्थानी सहजपणे पडण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. या सगळ्यामुळे अमेझॉनच्या नैसर्गिक संतुलनावरदेखील मोठा परिणाम झालेला आहे.

सप्टेंबर 2024 मध्ये ब्राझिलियन अमेझॉनमध्ये 41,463 आगीचे हॉटस्पॉट नोंदवले गेले. अमेझॉनमध्ये वाढत चाललेल्या दुष्काळाच्या आणि आगीच्या घटना हे शास्त्रज्ञांच्या चिंतेचे प्रमुख कारण आहे. तसेच इथे वाढत चाललेले जमिनीची धूपदेखील चिंतेचा विषय बनलेली आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते अमेझॉनच्या जंगलातील काही हिस्से आता अशा निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचले आहेत की, तिथून ते आता सावरणे अशक्य आहे आणि त्यांचा ऱहास निश्चित आहे. जंगलाच्या या बिघडत चाललेल्या आरोग्यामुळे अमेझॉन बेसिनमधील अनेक नद्यांची पातळीदेखील विक्रमी नीचांकाला पोहोचलेली आहे.

काही शास्त्रज्ञ सध्या अमेझॉनमध्ये वाढत चाललेल्या खाणकामांकडेदेखील लक्ष वेधत आहेत. इथे मिळणारी खनिजे ही मोबाईल फोन, पवनचक्की, इलेक्ट्रिक गाडय़ा यामध्ये वापरले जात असलेली दुर्मिळ अशी खनिजे आहेत. त्यामुळे ती आधुनिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरत आहेत. या दुर्मिळ खनिजासाठी अनेक ठिकाणी बेकायदा उत्खननदेखील मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. या बेकायदा खाणींवरील खाण कामगार, इथल्या स्थानिक गुन्हेगारी संघटना यांचे एक घातक जाळे तयार झाले असून इथे बेकायदा शस्त्र विक्री, प्राण्यांची अवैध शिकार आणि जंगलांना आगी लावण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. इथले खाणकामदेखील भविष्यात इथल्या नद्यांच्या पाण्याला दूषित करण्याचा धोका शास्त्रज्ञ व्यक्त करतात. या होत असलेल्या नाशामुळे 10 हजारांपेक्षा जास्त वनस्पती आणि प्राणी प्रजाती नामशेष होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.