साय-फाय – आर्टिफिशियल प्रचाराचा उन्माद

>> प्रसाद ताम्हनकर

देशात निवडणुकांची चाहूल लागली, अगदी त्याच वेळी या येत असलेल्या निवडणुकीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठय़ा प्रमाणावर गैरवापर केला जाण्याचा धोका असल्याची भीती ‘सामना’मधून या सदरात व्यक्त करण्यात आली होती. ही भीती किती खरी होती हे सध्या पुन्हा सिद्ध होत आहे. या निवडणुकीमध्ये सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून होत असलेल्या प्रचारामध्ये डीप फेक, मॉर्फ केलेले फोटो आणि खोटय़ा बातम्या यांचा नुसता पूर आलेला आहे. या तंत्रज्ञानाची माहिती नसलेले अनेक सामान्य मतदार या सगळ्या खोटेपणाने पूर्ण भांबावून गेले नसतील तर नवल!

कागदी आणि कापडी फलक, पत्रके, भिंती रंगवणे, मतदारांना प्रत्यक्ष भेटणे, सभा, मिरवणुका, प्रचार फेऱया अशा विविध प्रकारांनी पूर्वीच्या निवडणुका गाजवल्या जात असत. आपल्या उमेदवाराला घराघरांत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते दिवसरात्र पायाला भिंगरी लावल्यासारखे हिंडत असत आणि प्रचाराचा धडाका लावत. आता मात्र मोबाइल आणि संगणकाच्या एका क्लिकवर एकाच वेळी हजारो, लाखो मतदारांपर्यंत पोहोचणे अगदी सुलभ झाले आहे. आपला पक्ष, उमेदवार यांची ध्येयधोरणे, त्यांच्या भविष्यासाठीच्या कल्पना, आजवर केलेले कार्य हे अत्यंत लीलया मतदारांपर्यंत पोहोचवणे इंटरनेटच्या माध्यमातून सुलभ झालेले असले तरी याचाच गैरफायदा घेण्याचा प्रयत्नदेखील मोठय़ा प्रमाणावर होताना दिसत आहे.

विरोधी पक्षांची बदनामी करणे म्हणजे आपल्या पक्षाचा प्रसार करणे अशी एक अत्यंत चुकीची धारणा सध्या सोशल मीडियावर कार्यरत असणाऱया प्रचार कार्यकर्त्यांनी करून घेतल्याचे दिसते. सोशल मीडियाद्वारे केल्या जाणाऱया प्रचाराचे महत्त्व आता जवळपास सर्व पक्षांच्या लक्षात आलेले आहे. या प्रचारासाठी त्यांनी अनेक कार्यकर्ते पगारी नेमलेले आहेत. काही नेते तर उघडपणे अशा प्रचार कार्यालयाला ‘वॉर रूम’ असे जाहीरपणे संबोधतात. कारण हे सोशल मीडियावरील कार्यकर्ते निवडणुका म्हणजे युद्ध आहे आणि आपण लढणारे सैनिक अशा आविर्भावात सर्व नीतिनियमांना मोडीत घालत, भल्याबुऱया आणि हरतऱहेच्या अनैतिक मार्गांचा वापर करत समोरच्याची बदनामी करण्यासाठी झुंजत असतात.

सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रचाराचा स्तर रस्त्यावर आणि इंटरनेटवरदेखील अत्यंत खालच्या थराला पोहोचला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक नेत्यांचे खोटे आणि बदनामी करणारे फोटो सर्वत्र फिरवले जात आहेत. कोणा जुन्या अभिनेत्याचा गांधीजींच्या वेषातला एका पार्टीतला फोटो, ‘गांधीजी परदेशी स्त्रियांबरोबर नृत्य करताना’ म्हणून प्रसिद्ध केला जात आहे, तर कुठे ममता दीदींना रॅप डान्स करताना दाखवण्यात येत आहे. चित्रपटातील अनेक गाजलेल्या प्रसंगांचे मिम्स बनवताना, त्या प्रसंगातील अभिनेत्यांच्या चेहऱयावर राजकारण्यांचे फोटो मॉर्फ करून बदनामी करण्याची तर स्पर्धा सुरू आहे. सर्वच पक्षांचे सोशल मीडिया सैनिक यामध्ये आघाडीवर आहेत.

चुकीच्या आणि खोटय़ा बातम्या विविध वृत्तवाहिन्यांचे लोगो वापरून शिताफीने पसरवल्या जात आहेत. इंटरनेटवर वावरणारे काही सुजाण मतदार अशा खोटय़ा बातम्या तातडीने त्या वाहिनीच्या निदर्शनास आणून देत आहेत. मात्र वाहिन्यांकडून याविरुद्ध काही ठोस कारवाई केली जात असल्याचे अथवा अशा खोटय़ा बातम्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे दिसत नाही. तंत्रज्ञानाच्या अशा गैरवापराविरुद्ध ठोस असा कोणताही कायदा किंवा नियम देशात आहे की नाही? असा प्रश्न यानिमित्ताने सामान्य मतदाराला पडला आहे.

आपल्याविरुद्ध तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आलेल्या काही मजेशीर व्हिडीओ अथवा फोटोंचे काही नेत्यांनी खिलाडूपणाने कौतुकदेखील केले आहे आणि त्यांना स्वतच्या अकाऊंटवरून प्रसिद्धीदेखील दिली आहे. मात्र अशा गोष्टींना दाद देताना तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल चार समजुतीच्या गोष्टीदेखील त्यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याची गरज आहे. भूतकाळात एका खोटय़ा पोस्टमुळे दंगली कशा उसळतात, दोन समाजात तेढ कशी निर्माण होते याचा अनुभव आपण अनेकदा घेतलेला आहे. नेत्यांनी स्वत एक आदर्श कार्यकर्त्यांना घालून दिल्यास निरोगी वातावरणात पार पडणारी निवडणूक ही सर्व देशवासीयांसाठी एक सुखद अनुभव असेल.

[email protected]