साय-फाय – हिमखंडाचा धोका

>> प्रसाद ताम्हणकर

जगातील सर्वात मोठा हिमखंड जवळपास 30 वर्षे समुद्रात अडकल्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्या जागेवरून सरकला आहे. ‘ए23ए’ असे नाव या हिमखंडाला शास्त्रज्ञांनी दिलेले आहे. या हिमखंडाचा आकार 4000 चौरस किलोमीटर इतका प्रचंड आहे आणि त्याची जाडी 400 मीटर आहे. दिल्ली किंवा ग्रेटर लंडन या शहरांच्या आकारापेक्षा दुप्पट मोठा असा या हिमखंडाचा आकार आहे. यावरून त्याच्या भव्यतेची कल्पना येऊ शकते. 1986 साली हा हिमखंड अंटार्क्टिकाच्या किनारपट्टीपासून विलग झाला होता. मात्र पुढे वेडेल समुद्राच्या तळाला अडकून तो थांबला आणि त्याचे एका भव्य अशा बर्फाळ बेटामध्ये रूपांतर झाले.

या हिमखंडापासून निर्माण होऊ शकणाऱया संभाव्य धोक्यावर शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत. खरे तर हिमखंड, त्यातल्या त्यात मोठे हिमखंड हे वितळतात आणि अदृश्य होतात. ‘ए23ए’बाबत असे काही घडते आहे का? यावर लक्ष ठेवले जात आहे. हा हिमखंड जर असाच पुढे सरकत राहिला आणि दक्षिण जॉर्जियामध्ये थांबला तर इथल्या लाखो पेंग्विन आणि सीलसाठी तो धोकादायक ठरू शकतो. या बेटावर प्रजननासाठी येणाऱया विविध जातींच्या पक्ष्यांनादेखील त्याचा धोका आहे. याचे कारण म्हणजे या हिमखंडाचा आकार इतका भव्य आहे की, त्याच्यामुळे इथल्या अनेक सागरी जिवांच्या अन्नमार्गात अडथळे येऊ शकतात. मात्र काही शास्त्रज्ञ या हिमखंडाच्या प्रवासाकडे व्यापक पर्यावरणाच्या दृष्टीने पाहत आहेत. हिमखंड वितळल्यानंतर त्यातील खनिजेदेखील बाहेर पडतात. अंटार्क्टिकाच्या पायथ्याशी असलेल्या नद्या ही खनिजे आपल्यात सामावून घेतात. सागरी अन्नसाखळीचा महत्त्वाचा हिस्सा असलेल्या सागरी जिवांसाठी ही खनिजे अत्यंत पोषक असतात.

‘ए23ए’ हा हिमखंड पूर्वी अंटार्क्टिकामधील विशाल अशा फिल्चनर आईस शेल्फचा एक हिस्सा होता. हा हिमखंड फिल्चनर आईस शेल्फपासून तुटल्यानंतर फारसा दूर प्रवास करू शकला नाही. याचा खालचा हिस्सा वेडेल समुद्राच्या तळाशी अडकला आणि तिथेच त्याचा प्रवास थांबला. जेव्हा हा हिमखंड फिल्चनर आईस शेल्फपासून वेगळा झाला तेव्हा तिथे सोव्हिएत रशियाचे संशोधन केंद्र होते. हा हिमखंड वेगळा झाल्यावर तत्कालीन सोव्हिएत सरकारने ‘द्रुझनाया-1’ नावाच्या या तळावरून महत्त्वाची शास्त्राrय उपकरणे हलवण्यासाठी आणि त्यांचा बचाव करण्यासाठी एक मोहीमदेखील आखली होती.

हा हिमखंड अचानक कशाने सरकू लागला आहे, यावर शास्त्रज्ञांची विभिन्न मते आहेत. पाण्याच्या तापमानात काही बदल झाल्याने असे घडले असावे असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे, तर 1986 साली जेव्हा हा हिमखंड वेडेल समुद्रात येऊन अडकला, तेव्हाच तो वितळायला लागला होता आणि आता त्या वितळण्यामुळे त्याची तळाकडची पकड सैल झाली आणि तो हलायला लागला असेदेखील काही शास्त्रज्ञांचे मत आहे.

2020 सालापासून त्याच्या हालचालींना सुरुवात झाल्याचा दावादेखील केला जात आहे. गेल्या काही महिन्यांतील वाऱयांचा प्रभाव आणि समुद्राच्या लाटा यामुळे या हालचालींना अचानक वेग आला आणि सध्या तो अंटार्क्टिकाच्या उत्तरेकडून प्रवास करत आहे. वेडेल समुद्राच्या इतर हिमखंडाप्रमाणे ‘ए23ए’देखील अंटार्क्टिकाच्या सर्कम पोलर करंटमध्ये प्रवेश करेल आणि त्यानंतर दक्षिण अटलांटिकाच्या रस्त्याने त्याचे मार्पामण होईल असा अंदाज आहे. या रस्त्याला आइसबर्ग अॅले अर्थात हिमखंडांचा मार्ग म्हणूनदेखील ओळखले जाते.

या हिमनगाने दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने प्रवास केल्यास जगाची चिंता वाढू शकते. कारण त्याच्या भव्य आकारामुळे समुद्रमार्गे प्रवास करणाऱया अनेक जहाजांना मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. शास्त्रज्ञ उपग्रहाच्या मदतीने त्याच्या प्रवासावर लक्ष ठेवून आहेत. हा हिमखंड हळूहळू वेग पकडत असल्याचे उपग्रहामुळे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी 2020 सालीदेखील ‘ए-68’ नावाच्या अवाढव्य हिमखंडामुळे दक्षिण जॉर्जियाला प्रचंड धोका निर्माण झाला होता. मात्र सुदैवाने ‘ए-68’चे लहान लहान तुकडे पडले आणि प्रचंड मोठे संकट टळले. या घटनेमागे हवामानातील बदलांना सर्वतोपरी जबाबदार धरण्यास अजून तरी शास्त्रज्ञ तयार नाहीत. या घटनेमागील नक्की कारण कळण्यास काही वेळ लागेल असा अंदाज आहे.
[email protected]