पुढील जग सेटॅलाईट इंटरनेटचे!

>> प्रसाद ताम्हनकर

इंटरनेट ही आता काळाची गरज बनलेली आहे. कोरोना लॉक डाऊनच्या काळात तर या इंटरनेट सेवेचे महत्त्व अधिकच ठळकपणे सामोरे आले आहे. एकेकाळी ‘चैन’ ठरणारे इंटरनेट आता सामान्य ग्राहकांच्यादेखील आवाक्यात आले आहे. असे असले तरी हिंदुस्थानात अनेक दुर्गम भागात आजही इंटरनेटची सेवा उपलब्ध नाही. इंटरनेटची यापुढील काळात लागणारी गरज बघता सर्वदूर इंटरनेट पोचवणे ही अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. मात्र दुर्गम भागात केबल्सचे जाळे पसरवणे हे सर्वच दूरसंचार कंपन्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक काम असते.

अशावेळी मग एलॉन मस्कसारखा जगातील अग्रणी श्रीमंत माणूस ‘सॅटेलाईट इंटरनेट’ची भन्नाट संकल्पना घेऊन अवतरतो आणि क्षणात चर्चेचा विषय बनून जातो. एलॉन मस्कला दुनिया ओळखते ते एक भन्नाट कल्पना राबवणारा हरहुन्नरी उद्योगपती म्हणून. जागतिक श्रीमंताच्या यादीतच नव्हे, तर यशस्वी उद्योगपतींच्या यादीतदेखील कायम पहिल्या पाचात राहणाऱया या अवलियाने स्पेस, वाहन निर्मिती क्षेत्रात उच्च दर्जाचे यश प्राप्त केल्यानंतर आता दूरसंचार क्षेत्रात उडी मारण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्थानसह जगातील इतरही अनेक महत्त्वाच्या देशांच्या कानाकोपऱयात इंटरनेट पोचवण्याची खात्री एलॉन मस्क देत आहे.

वायरलेस अर्थात थेट सॅटेलाईटच्या माध्यमातूनच जगाच्या कोणत्याही कोपऱयात इंटरनेट पोचवण्याची अभिनव योजना तो प्रत्यक्षात आणत आहे. ‘स्पेस एक्स’ या त्याच्या अंतराळ उद्योग कंपनीच्या स्वतःच्या मालकीच्या सॅटेलाईटतर्फे ही ‘स्टारलिंक’ नावाची सुविधा पुरवली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या ‘स्पेस एक्स’ने 4400 सॅटेलाईटच्या मदतीने अमेरिका आणि कॅनडा येथे ‘सॅटेलाईट इंटरनेट सेवा’ प्रदान करण्यास सुरुवातदेखील केली आहे. ‘स्पेस एक्स’च्या जोडीलाच ऍमेझॉन आणि एअरटेल या दिग्गज कंपन्यादेखील या सेवेचा पुरवठा करण्यासाठी कंबर कसू लागल्या आहेत. ‘प्रोजेक्ट क्युपर’ नावाने ऍमेझॉन कंपनी आपल्या या मोहिमेला सुरुवात करत असून त्यासाठी या कंपनीला एकूण 3200 पेक्षा जास्त सॅटेलाईट (उपग्रह) आकाशात सोडण्याची अनुमती अमेरिकन सरकारने दिलेली आहे.

दुसरीकडे एअरटेल ‘वनवेब’ या नावाने आपली ‘सॅटेलाईट इंटरनेट सेवा’ सुरू करण्याच्या प्रयत्नात असून ‘स्पेसक्राफ्ट ऑर्बिटस’च्या मदतीने ही सेवा दिली जाणार आहे. एकूण 648 ‘स्पेसक्राफ्ट ऑर्बिटस’ यासाठी उपयोगात आणली जाणार असून यापैकी 74 ‘स्पेसक्राफ्ट ऑर्बिटस’ अंतराळात सोडण्यात आलेली आहेत. केंद्र सरकारने ‘भारतनेट’ या योजनेंतर्गत सीमा भागातील दुर्गम क्षेत्रं, विविध नक्षलीग्रस्त क्षेत्रं आणि द्वीपसमूहातील दुर्गम भाग अशा ठिकाणी असलेल्या एकूण पाच हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायती ‘सॅटेलाईट इंटरनेट ब्रॉडबँड सेवे’च्या अंतर्गत जोडण्याची आखणी केलेली आहे. नैसर्गिक आपत्तींच्या वेळी ही ‘सॅटेलाईट इंटरनेट सेवा’ बिलकुलही क्षतिग्रस्त होत नसल्याचे मदतकार्यासाठी प्रचंड उपयोगी ठरणार आहे. तसेच केबल पसरवण्याचा व्याप नसल्याने सहजपणे कोणत्याही दुर्गम जागी पोचू शकणारी ही सेवा सैनिक आणि विद्यार्थ्यांसाठीदेखील मोलाची ठरणार आहे. ‘स्टारलिंक’ने तर आपल्या या सुविधेसाठी ‘प्री-ऑर्डर’ बुकिंगदेखील घेण्यास सुरुवात केलेली आहे. पुढील जग ‘सॅटेलाइट इंटरनेट’चे असणार हे नक्की!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या