>> प्रशांत गौतम
‘‘जी हां बहनों और भाईयों, मैं हूं आपका दोस्त अमीन सयानी’’ अशा मखमली, पण तितक्याच भारदस्त आवाज आणि स्वरात गुंफलेले हे जादुई शब्द आता पुन्हा कधीच ऐकू येणार नाहीत. बिनाका -गीतमालेतील गाण्यांपेक्षा कित्येक पटीने लोकप्रिय असलेला हा स्वर आता कायमचा शांत झाला. दिग्गज निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाने आपण रेडिओ युगाच्या सुवर्णकाळाचा एक शिल्पकार,आवाजाचा जादूगार गमावला आहे. आजची पिढी जेव्हा शाळेत होती तेव्हा ‘बिनाका गीतमाला’ अमीन सयानी यांच्या आवाजातल्या जादूमुळेच ऐकली जायची. या पिढीतील अनेकांना अजूनही आठवते ते त्यांचे “अगले पायदान पर…’’ हे भारून टाकणारे शब्द.
1951 ते 2000 पर्यंतचा काळ त्यांच्या खुमासदार निवेदनाने, खर्जातील आवाजाने भारावून टाकणारा राहिला. रात्रीचे आठ वाजले की, बहुचर्चित ‘बिनाका गीतमाला’चा तासाभराचा माहौल सुरू होत असे. कोणते गाणे टॉपखाली आहे, असे सांगणारी ‘अगले पायदान पर’ अशा जादुभरी आवाजातील ते अजरामर शब्द आजही ऐकणाऱ्याच्या कानात साठवलेले आहेत. ‘बिनाका’ असो की ‘सिबाका’ असो, रेडिओ सिलोन असो की विविध भारती असो, अमीन सयानींचा आवाज, निवेदन जेव्हा जेव्हा लाभत गेले, ती बहुतेक गाणी पह्कसमध्ये आली. 54 हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रम, 1900 स्पॉट्स कार्यक्रम, जिंगल्सची निर्मिती त्यांनी केली. रेडिओ शोची निर्मिती आणि सूत्रसंचालन, आंतरराष्ट्रीय स्तरावरील थेट कार्यक्रम सादरीकरणाने ते जगभरातील रसिकांच्या मनातील अढळ स्थान प्राप्त करणारे ठरले.
ऑल इंडिया रेडिओला जगात लोकप्रियता मिळवून देणाऱया अमीन सयानी यांचा जन्म 21 डिसेंबर 1932 रोजी मुंबईत झाला. शालेय शिक्षण मुंबईतील सिंधिया स्कूल, तर महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्समध्ये झाले. मोठे बंधू हमीद यांनी सयानी यांच्यातील गुण ओळखून ऑल इंडिया रेडिओवर अवघ्या 11व्या वर्षीच त्यांना कामाला लावले. दशकभर ते इंग्रजी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असत; पण या अनुभवाचा फायदा त्यांना पुढील काळात होत गेला. साध्या, सोप्या भाषेत निवेदन करण्याची हातोटी आणि मुख्य म्हणजे आवाज या गुणविशेषाने त्यांची व्यावसायिक कारकीर्द यशोशिखरावर गेली. उमेदीच्या काळात म्हणजे 1960-62 च्या सुमारास त्यांनी टाटा ऑईल मिलच्या मार्पेटिंग विभागात जबाबदारी सांभाळली.
या सर्व प्रवासात त्यांना खरी ओळख मिळाली ती निवेदक म्हणून, जी आयुष्यभर कायम सोबत राहिली. रेडिओ शोची निर्मिती आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. ‘बिनाका’, ‘सिबाका’, ‘रेडिओ सिलोन’, ‘विविध भारती’ यात 42 वर्षांपेक्षा अधिक काळ व्यस्त होते. चारेक वर्षांच्या अंतराने वर्षभरासाठी ‘कोलगेट सिबाका गीतमाला’ हिंदुस्थानच्या राष्ट्रीय नेटवर्कवर प्रसारित झाली. त्यानंतर ‘एस कुमार्स का फिल्मी मुकाबला’, ‘फिल्मी मुलाकात’, ‘आकाशवाणी’वर 7 वर्षे सुरू होते. ‘सॅरिडॉन के साथी’ (ऑल इंडिया प्रायोजित शो), ‘बोर्नव्हिटा क्विझ कॉन्टेस्ट’ (इंग्रजी)-8 वर्षे, ‘मराठा दरबार शो’, ‘सितारों की पसंद’, ‘चमकते सितारे’, ‘महेकती बाते’ (14 वर्षे)अशा कार्यक्रमांना निवेदन सयानी यांचे होते. त्यांनी एड्स निर्मूलन प्रचार आणि प्रसारासाठी 13 भागांची रेडिओ मालिका तयार केली. (यात डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखतीही समाविष्ट आहेत.). त्यांची ‘स्वप्ननाश’ ही मालिका ऑल इंडियाने सुरू केली. ज्याच्या ऑडिओ पॅसेट अनेक सेवाभावी संस्थांनी त्यांच्या प्रचार कार्यासाठी विकत घेतल्या. सयानी यांनी ध्वनिफीत, एलपी आणि सीडीवर अनेक फीचर्सची निर्मिती केली. 1976च्या सुमारास रेडिओ शो व जाहिरात निर्मितीसाठी पुढाकार घेऊन महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या अफाट कार्याची नोंद ‘लिम्का बुक रेकॉर्ड’मध्ये घेतली गेली. तसेच त्यांना 2007 साली प्रतिष्ठत हिंदी भवनाचा हिंदी रत्न पुरस्कार, 2008 साली पद्मश्री हा नागरी सन्मान लाभला. यासह विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मानसन्मान अमीन सयानी यांना लाभले. ते या जगात नसले तरी आवाजाला प्रतिष्ठा निर्माण करून देणारा त्यांचा आवाज अजरामरच राहील!