प्रकाशकांच्या शोधात लेखक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रतीक पुरी

पुस्तकांचं गाव भिलार येथे नुकतंच लेखक-प्रकाशक संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनात साहित्यलेखन आणि प्रकाशन क्षेत्राशी निगडित वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. त्यातील प्रकाशकाच्या शोधात लेखक या विषयावरील परिसंवादात प्रतीक पुरी हे आजच्या फळीतील लेखक सहभागी झाले होते. त्यांनी याबाबत काही मुद्दे मांडले आहेत.

भिलार या पुस्तकांच्या गावात, 8 व 9 डिसेंबर, 2018 रोजी अ. भा. मराठी प्रकाशन संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अ. भा. महाराष्ट्र साहित्य महामंडळ यांच्या वतीनं लेखक-प्रकाशक संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्यांतील ‘प्रकाशकाच्या शोधात लेखक’ या परिसंवादात मी सहभागी होतो. सोबत लेखक डॉ. आशुतोष जावडेकर, रोहन चंपानेरकर (रोहन प्रकाशन), विशाल सोनी सर (विश्वकर्मा पब्लिकेशन्स), नीलिमा बोरवणकर, शैलेश नांदुरकर (रसिक प्रकाशन) हे सहकारी मित्र होते. अध्यक्षस्थानी डॉ. रमेश धोंगडे होते. यांत मी जे मुद्दे मांडले व प्रकाशकाकडून लेखकाच्या ज्या अपेक्षा असतात तसेच माझ्या ज्या काही सूचना होत्या त्या खाली देतोय. महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, प्रकाशन संघाचे अध्यक्ष श्री राजीव बर्वे आणि मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या प्रयत्नातून हे वेगळ्या प्रकारचे संमेलन सुयोग्य रीतीनं पार पडले.

या परिसंवादात प्रकाशकाकडून एका नवोदित लेखकाच्या काय अपेक्षा असतात, तसेच प्रकाशकांनी नवोदित लेखकांना कशा प्रकारे वागवले पाहिजे यावर माझे म्हणणे मी मांडले.

एकूणातच या गोष्टींकडे जर प्रकाशकांनी लक्ष दिले आणि त्यानुसार काही गोष्टी करण्याचे मनावर घेतले तर निश्चितच त्याचा एक सकारात्मक बदल दिसून येईल. पण त्यासाठी सर्व प्रकाशकांनी एकत्र येण्याची गरज आहे. लेखकांनीही आपल्या लिखाणाव्यतिरिक्त अन्य भूमिकेत जाऊन प्रकाशकांना पुस्तक विक्रीसाठी मदत करण्याची गरज आहे. जे महत्त्वाचे मुद्दे मांडलेत ते खालीलप्रमाणे आहेत.

– प्रकाशकांनी लेखकांना दत्तक घेऊन वाढवणे. प्रत्येक प्रकाशकानं किमान 2 नवोदित लेखक वाढवायला हवेत. त्यांच्या उमेदवारीची 5 वर्षे तरी त्यांना सांभाळायला हवं. ते अस्सल असतील तर त्यांना पुढे वाचकही सांभाळून घेतील. लेखकांची नवी फळी निर्माण करण्यासाठी हे आवश्यक आहे.

– प्रकाशकांनी लेखकांच्या चांगल्या प्रकल्पांना पाठिंबा द्यायला हवा. मोठी स्वप्नं त्यांनी दोघांनी मिळून बघायला हवी आणि त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. प्रकाशकांनी चांगल्या विषयांवर लेखकांकडून आवर्जून लिहून घ्यायला हवं.

– लेखक-प्रकाशक गप्पा संवाद चर्चा कायम घडत राहायला हवी. त्यासाठी लेखक मेळावे घेण्यात यावे ज्यात प्रकाशकांसोबतच वाचकांचाही समावेश असायला हवा.

– पुस्तकाच्या प्रमोशनमध्ये लेखक-प्रकाशक यांनी मिळून काम करायला हवं. समीक्षकांकडून लेख लिहून घ्यायला हवेत. मार्केटिंगचे जास्तीत जास्त उपाय योजावेत तसेच नवीन शोधून काढावेत. शैलेश नांदुरकर यांनी रसिक प्रकाशन आता चित्रपटगृहात पुस्तकांच्या जाहिराती करणार आहेत असं सांगितलं. अशा नवीन गोष्टींचं स्वागत व्हायला हवं.

– पुस्तकांच्या संपादनाची, त्यासाठी संपादकांची गरज असते हे लेखकांनी व प्रकाशकांनीही मान्य करून संपादकांना योग्य तो मान व धनही द्यायला हवं. एक चांगला संपादक संहितेतील विस्कळीतपणा दूर करून त्याची मूल्यवृद्धी करण्याचं काम करत असतो. फिक्शन अर्थात कल्पित साहित्य जसे कथा-कविता-कादंबरी यांनाही संपादनाची गरज असते.

– पुस्तक विक्रीची जबाबदारी प्रकाशकाने स्वीकारायला हवी. लेखकाचं पुस्तक बाहेर येताच त्याला संपूर्ण रॉयल्टीचा चेक मिळायला हवा. तसं झालं तर ते पुस्तक विकण्याचा एक दबाव प्रकाशकावर निर्माण होईल व त्यासाठी तो आवर्जून प्रयत्न करेल.

– प्रकाशकांनी सेल्फ सेंसरशिप लादण्याची गरज आहे. ज्यामुळे सुमार लेखक व त्यांच्या सुमार लिखाणावर बंधनं येतील. यावर मतभेद होऊ शकतात. पण केवळ खोगीरभरती करण्यानं काही होणार नाही. सोशल मीडियामुळे प्रत्येकाला आपण प्रतिभावंत कवी किंवा प्रगल्भ लेखक असल्याचा साक्षात्कार होत असतो. या अल्पायुषी प्रसिद्धीच्या कृष्णविवरात ओढले जाण्यापासून वाचण्याची गरज आहे.

– प्रकाशकांनी आपली स्वतःची छोटेखानी साहित्य संमेलनं भरवण्याची गरज आहे. जिथे ते त्यांचे लेखक प्रमोट करू शकतील. जेवढी प्रसिद्धी होईल, लेखकाला जेवढं ग्लॅमर मिळेल तेवढं चांगलं. डॉ. रमेश धोंगडेंना हा मुद्दा मान्य नव्हता. ते म्हणाले की लेखकापेक्षा त्याचं साहित्य अस्सल गुणवत्तापूर्ण आहे की नाही याकडे त्यांनी लक्ष द्यावं. ते मग टिकून राहील. गुणवत्तापूर्ण साहित्य ही पूर्वअट लक्षात घेऊनच आम्ही या मुद्याकडे बघतोय. केवळ स्वतःची प्रसिद्धी इतका हेतू यात नाही. आणि तुमचं साहित्य उत्तम आहे म्हणूनच ते लोकांपर्यंत जातं, टिकतं हा गैरसमज आहे. मराठीत म्हण आहे, ओरडणाऱयाचा कोळसाही खपतो, न बोलणाऱयाचं सोनंही विकलं जात नाही. लेखकांच्या बाबतीत हे होऊ द्यायचं नसेल तर त्यानं पुस्तकांच्या प्रमोशनकडे तसेच स्वतःच्या प्रमोशनकडेही गांभीर्यानं बघण्याची गरज आहे.

– पुस्तक प्रकाशनासाठी 5-3-2 चं सूत्र. प्रकाशकांनी दर 10 पुस्तकांमध्ये 5 खपावू धंदेवाईक पुस्तके काढावीत, 3 उत्तम नॉन-फिक्शन व 2 फिक्शन काढावीत. ज्यामुळे त्यांचा आर्थिक व्यवहार हा डळमळीत होणार नाही.

– लेखकांना आर्थिक आधार मिळायला हवा. मराठीत केवळ लिखाणाच्या बळावर लेखक जगू शकेल यासाठी आपण आत्तापासून प्रयत्न करायला हवेत. हे एक दिवास्वप्न वाटत असेल तर ते प्रत्यक्षात कसं पूर्ण होईल यासाठी सर्वांनीच एकत्र येऊन विचार व कृती करण्याची आवश्यकता आहे.

– नवोदित लेखकांचा प्रकाशकांनी मान राखायला हवा. त्यांना उचित मार्गदर्शनही करायला हवं.

– सर्व प्रकाशकांनी एकमेकांचे मतभेद-मनभेद दूर ठेवून एकूण मराठी पुस्तक विक्रीसाठी व मराठी साहित्य व्यवहार कसा मोठा होत राहील यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करावेत.

यांतील किती गोष्टी प्रत्यक्षात येतील याची कल्पना नाही. पण आपण निदान काही एक सुरुवात करण्याची तरी गरज आहे. ती झाली तर त्याचा एकूण मराठी साहित्य व्यवहारावरच सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपण स्वतःलाच शुभेच्छा देऊयात

– [email protected]