इतिहासाच्या पानातून – वेढ्याचा तिढा

>> ऍड. प्रतीक राजूरकर

इतिहास हा विषय मानवी जीवनावर अधिक प्रभाव ठेवून आहे. इतिहास काल्पनिक विश्वात रममाण न करता वस्तुस्थितीची जाणीव करून देणारा आहे. जागतिक इतिहासाच्या पानात दडलेल्या काही घटना, प्रसंग निश्चितच काही शिकवून जाणाऱया आहेत.

जगाच्या इतिहासात डोकावल्यास अनेक घटना, प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवून जातात. इतिहास वर्तमान आणि भविष्यासाठी प्रेरणादायी आहे. इतिहास दडवत नाही तर सत्याची उकल करणारा आहे. मानवी जीवनात काल्पनिक कथांप्रमाणे इतिहास अनेकदा मनोरंजक नसेलही, परंतु मानवी जीवनाला वास्तवाची जाणीव करून देतो. इतिहासाला शपथेवर काही सांगावे लागत नाही, कारण इतिहास भूतकाळाची साक्ष आहे. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. वेड लागलेला इतिहासच भविष्यात आपल्याला शहाणपण शिकवून जातो. उदात्त ध्येयाने झपाटलेले अनेक प्रसंग, घटना मानवाला अधिक परिपक्व करून जातात. इतिहासाचे वैशिष्टय़ आहे, भूगोलाचा, विज्ञानाचा, गणिताचा इतिहास आहे. परंतु इतिहासाचा भूगोल, विज्ञान, गणित मांडता येत नाही. म्हणूनच इतिहास हा विषय मानवी जीवनावर अधिक प्रभाव ठेवून आहे. इतिहास काल्पनिक विश्वात रममाण न करता वस्तुस्थितीची जाणीव करून देणारा आहे. जागतिक इतिहासाच्या पानात दडलेल्या काही घटना, प्रसंग निश्चितच काही शिकवून जाणाऱया आहेत.

इतिहासात बालेरचा वेढा सुटायला वर्तमानपत्राच्या आतील पानावरची बातमी निमित्त ठरली. स्पेन, फिलिपाइन्स आणि अमेरिकेतील तिढा वर्तमानपत्रांची ठळक बातमी सोडवू शकली नाही, ते आतल्या पानावरील एका लहानशा बातमीने शक्य झाले. स्पेनची 400 वर्षांपासून वसाहत असलेल्या फिलिपाइन्समधील बालेर हे अतिदुर्गम भागातील गाव संपर्काबाहेरच. या ठिकाणी बोटीने अथवा पायी घनदाट पर्जन्यवनातून जाता येईल असे दोनच मार्ग. स्पेनविरोधात फिलिपाइन्सच्या नागरिकांची सशस्त्र क्रांती सुरूच होती. दरम्यान, अमेरिका व स्पेनच्या युद्धात फिलिपाइन्सचे सशस्त्र क्रांतिकारक अमेरिकेसमवेत स्पेनविरोधात लढले. 1 जुलै 1898 रोजी पडलेला वेढा सुटला तो 2 जून 1899 रोजी.

अमेरिका-स्पेन युद्ध सुरू झाल्यावर स्पेनने 57 सैनिकांची एक तुकडी बालेरला कॅप्टन एनरिक लास मोरेनास यांच्या नेतृत्वात रवाना केली. जून-जुलै 1898 साली स्पेनचा कॅप्टन मोरेनासने आपल्या तुकडीसमवेत बालेर गावातील एका चर्चमध्ये आश्रय घेतला. स्पॅनिश सैन्याच्या वास्तव्याने चर्चला सैनिकी छावणीचे रूप आले. ही संधी साधत फिलिपाइन्सच्या 800 सशस्त्र सैनिकांनी एका रात्री बालेरला शिरकाव करत चर्चला वेढा घातला. स्पॅनिश सैनिकांना शरण येण्यासाठी फिलिपाइन्सच्या सेनेने अनेकदा निरोप पाठवले. परंतु स्पॅनिश तुकडीने नकार दिला. दिवसागणिक वेढय़ात अडकलेल्या स्पॅनिश सैन्य तुकडीच्या अडचणीत वाढ होऊ लागली. वेढय़ात अडकलेल्या सैन्याला अन्नाचा तुटवडा जाणवू लागला. बाहेर पडता येणे शक्य नसल्याने पोषक अन्नाची चणचण जाणवू लागली. स्पॅनिश तुकडी तापाने फणफणत होती. सप्टेंबर 1898पर्यंत दोन सैनिकांचा मृत्यू झाला. तुकडीतील इतर सैनिकांच्या मरणयातना वाढत होत्या. सप्टेंबर 1898 मध्ये स्पॅनिश सैन्य तुकडीचे नेतृत्व करणाऱया कॅप्टन लास मोरेनास यांना बेरीबेरीने (ब जीवनसत्त्वे न मिळाल्याने होणारा आजार) ग्रासले, त्यात कॅप्टनचा मृत्यू झाला.

कॅप्टन मोरेनासच्या मृत्यूने तुकडीचे नेतृत्व आले ते मार्टीन सिरेझोकडे. स्पॅनिश सैन्य तुकडीचा अन्नसाठा संपुष्टात आला होता. नोव्हेंबर 1898 मध्ये फिलिपाइन्स सैनिकांनी चर्चसमोर स्पॅनिश वर्तमानपत्रे टाकण्यास सुरुवात केली. वर्तमानपत्रांत ठळक बातम्या स्पेन फिलिपाइन्समधून माघार घेणार या आशयाच्या होत्या. स्पॅनिश सैन्य तुकडीला शरणागती पत्करण्यासाठी फिलिपाइन्सने मुद्दाम हे छापल्याचे स्पॅनिश कॅप्टनचा अंदाज होता. नोव्हेंबर 1898 मध्ये स्पॅनिश-अमेरिका युद्ध संपुष्टात आले. डिसेंबर 1898 रोजी पॅरिस करार होऊन 20 दशलक्ष डॉलर्सच्या मोबदल्यात अमेरिकेने फिलिपाइन्स स्पेनकडून मिळवले होते. स्पॅनिश तुकडी मात्र बालेरचा किल्ला स्पॅनिश साम्राज्य म्हणून लढवत होती. भूक, आजारपणाला कंटाळून एक स्पॅनिश सैनिक फिलिपाइन्सला जाऊन मिळाला. तीन स्पॅनिश सैनिकांनी फिलिपाइन्स सैन्याला जाऊन मिळण्याचा प्रयत्न केला असता स्पॅनिश सैन्य दोघांना ठार मारण्यात यशस्वी ठरले. स्पॅनिश तुकडीचे मनोबल पूर्णतः ढासळू लागले होते. मांजरी, कुत्री, कावळे मिळेल ते खाऊन स्पॅनिश सैन्य तुकडी ठाण मांडून होती. आपण अमेरिकेच्या साम्राज्याचे संरक्षण करतो आहोत हे बालेर स्पॅनिश तुकडीच्या गावीही नव्हते.

28 मे 1899 रोजी पुन्हा काही वर्तमानपत्रे बालेर चर्चसमोर टाकण्यात आली. त्यात स्पेनने फिलिपाइन्सचा ताबा अमेरिकेला दिल्याचा उल्लेख होता. परंतु आतील पानावरच्या स्पॅनिश सैन्यातील काही अधिकाऱयांच्या बदल्यांची बातमी स्पॅनिश कॅप्टन मार्टिनच्या वाचनात आली. त्यातील एका मित्राला हव्या असणाऱया ठिकाणी बदली झाल्याचे मार्टिनच्या वाचनात आल्याने वर्तमानपत्र खरे असल्याची खात्री पटली. ठळक बातमीवर विश्वास ठेवण्यास आतील पानावरची बातमी संदर्भ ठरली व स्पॅनिश सैन्य तुकडीने शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला. 337 दिवसांच्या वेढय़ात स्पॅनिश तुकडीतील 57 पैकी 35 सैनिक जिवंत बाहेर निघाले. केवळ दोन सैनिक युद्धातील जखमांनी मरण पावले, तर उर्वरित 15 आजारपणाने. फिलिपाइन्स सैन्याला जाऊन मिळालेल्या स्पॅनिश सैनिकाला मार्टिनच्या आदेशाने ठार करण्यात आले. फिलिपाइन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पॅनिश सैन्य तुकडीला युद्धबंदी न करता मित्र म्हणून मायदेशी परतू दिले. लहान सैन्य तुकडीने दाखवलेले धैर्य बघता मार्टिन व तुकडीवर कौतुकाचा वर्षाव झाला. स्पेनला गेल्यावर तुकडीचा गौरव करण्यात येऊन बढती देण्यात आली. अमेरिकेचा जनरल फ्रेडरिक फनस्टॉन मार्टिनच्या तुकडीने इतका प्रभावित झाला की, मार्टिनच्या आठवणी इंग्रजीत भाषांतर करून अमेरिकेन सैन्याला वाटण्यात आला.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या