लेख – संविधानाचे उपासक फली नरिमन

>> प्रतीक राजूरकर

हिंदुस्थानच्या विधी क्षेत्रातल्या सुवर्णकाळाचा अंत झाला असला तरी त्यांची विधी क्षेत्रातील देदीप्यमान कामगिरी कायम स्मरणात राहील. घटनातज्ञ, लेखक, राज्यसभा सदस्य, दोन पद्म पुरस्कारांचे मानकरी, ज्येष्ठ विधीज्ञ म्हणून फली नरिमन यांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून कार्यरत असताना देशात आणीबाणीविरोधात निर्भीडपणे आपल्या पदाचा राजीनामा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून नरिमन परिचित आहेत. अलीकडेच भोपाळ वायूगळती प्रकरणात दोषींचे कायदेशीर प्रतिनिधित्व केल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली होती. एखाद्या खटल्यात नरिमन यांनी प्रतिनिधित्व करावे आणि त्या खटला, याचिकेला वलय प्राप्त व्हावे असा नरिमन यांचा लौकिक होता. अनेक कायदेशीर प्रकरणे ही केवळ नरिमन यांच्या कायदेशीर उपस्थितीमुळे गाजली. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि विधी क्षेत्र एका कायदेपंडिताला मुकला. विधी क्षेत्रातील नरिमन यांचे योगदान अनन्यसाधारण असेच आहे.

मुंबई शासकीय विधी महाविद्यालयातून नरिमन यांनी 1950 मध्ये कायद्याची पदवी प्राप्त केली. देशाचे संविधान आणि नरिमन यांच्या वकिलीला सुरुवात एकाच वर्षी झाली हा एक योगायोगच म्हणावा लागेल. सुरुवातीच्या काळात नरिमन यांनी नामवंत विधीज्ञ सर जमशेदजी कांगा यांच्यासोबत 22 वर्षे विधी क्षेत्रात योगदान दिले. पुढे 1971 मध्ये नरिमन यांना सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ म्हणून मान्यता प्राप्त झाली. 95 वर्षांच्या आपल्या आयुष्यातील 74 वर्षे नरिमन यांनी विधी क्षेत्रासाठी देत भरीव योगदान दिले. विधी क्षेत्रातील नरिमन यांची कामगिरी बघता 1991 साली नरिमन यांचा पद्मभूषण, तर 2007 साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार संबंधित परिषदेच्या सल्लागार समितीत 1999 साली त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नरिमन हे आंतरराष्ट्रीय विधीज्ञ आयोगाचे 1995 ते 1997 या काळात अध्यक्ष होते. 1999 ते 2005 या कालावधीत नरिमन हे राष्ट्रपती नियुक्त संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य होते. या व्यतिरिक्त विधी क्षेत्रातील अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांचे पदाधिकारी म्हणून नरिमन यांना अनुभव होता. नर्मदा प्रकल्पासाठी त्यांनी न्यायालयात काही काळ गुजरात सरकारचे कायदेशीर प्रतिनिधित्व केले. तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना भ्रष्टाचार प्रकरणात झालेल्या शिक्षेत नरिमन यांनी सर्वोच्च न्यायालयात जयललितांचे प्रतिनिधित्व केले. विधी क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेल्या एस. पी. गुप्ता, गोलखनाथ, पाई फाऊंडेशनसारख्या प्रकरणात नरिमन यांनी केलेले कायदेशीर प्रतिनिधित्व मोलाचे ठरले.

वार्धक्यामुळे नरिमन यांनी अलीकडे वकिली व्यवसाय बंद केला होता. परंतु कायदेशीर आणि सांविधानिक विषयावर माध्यमांत त्यांचे लेखन कार्य सुरूच होते. अनुच्छेद 370 बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर त्यांनी लिहिलेला विश्लेषणात्मक लेख डिसेंबर 2023 साली प्रकाशित झाला होता. वयोमानामुळे प्रत्यक्ष वकिली करताना मर्यादा येत असल्याने त्यांनी समाजासाठी लेखणीने आपल्याकडील ज्ञानाचे उद्बोधन सुरू ठेवले होते. या व्यतिरिक्त त्यांनी लेखन केलेली पुस्तके विधी क्षेत्रच नाही तर त्या बाहेरील वाचकांसाठी पर्वणी ठरली. ‘बिफोर मेमरी फेड्स’, ‘गॉड सेव द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट’, ‘द स्टेट ऑफ द नेशन’, ‘इंडियास लिगल सिस्टम’, ‘द कॉन्स्टिटय़ूशन ऑफ इंडिया’ ही संग्रही ठेवावीत अशा विपुल साहित्याची निर्मिती नरिमन यांनी करून ठेवली आहे.

10 जानेवारी 1929 रोजी फली नरिमन यांचा रंगून येथे जन्म झाला. नरिमन यांचे वडिल सॅम बरियमजी नरिमन यांची फली यांनी प्रशासकीय सेवेत जावे अशी इच्छा होती. आर्थिक कारणास्तव फली नरिमन यांच्या वडिलांची ती इच्छा अपूर्ण राहिली. परंतु फली नरिमन प्रशासकीय सेवेत न गेल्याने त्यांच्या हातून 74 वर्षे संविधानाची, कायद्याची कौतुकास्पद अशी भरीव सेवा झाली. सात दशकांचे नरिमन यांचे योगदान असामान्य असेच आहे. त्यांच्या तालमीत त्यांचे सुपुत्र रोहिंटन नरिमन एक नामवंत विधीज्ञ म्हणून नावारूपास आले आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले. संविधानाचा अमृत महोत्सव सुरू असताना संविधानाचे उपासक असलेल्या फली नरिमन यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे.