ग्रंथालये – महत्त्व वाढले; पण विकास कधी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. प्रीतम भि. गेडाम, [email protected]

आज आपण आधुनिक युगात जगत आहोत. जगभरात ग्रंथालयांनी जलद प्रगती केली आहे. आपल्या देशातील आयआयटी, आयएएम, एम्स यासारख्या केंद्रीय संस्थानांची ग्रंथालये किंवा काही मोठय़ा खासगी संस्थानांची ग्रंथालये विकसित दिसतात, पण जेव्हा आपण आजूबाजूची ग्रंथालये पाहतो तेव्हा असे दिसते की, ग्रंथालयांचा विकास कुठे झाला आहे? देशातील हजारो लहानमोठी ग्रंथालये अविकसित दिसतात. आम्ही अजूनही ग्रंथालयाच्या विकासामध्ये खूप मागास आहोत… 14 ते 20 नोव्हेंबर या काळात पाळल्या जाणाऱया राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताहनिमित्त.

कोणत्याही युगात किंवा भविष्यात ग्रंथालयाशिवाय शिक्षणाचे अस्तित्व अशक्य आहे. कारण ग्रंथालय हे शिक्षणाचे मुख्य केंद्र आहे, जेथे पूर्ण जगाचे ज्ञान आहे. पूर्वीपासूनच याचे महत्त्व सर्वोपरी ठरले आहे. देशाचे सुवर्ण भविष्य ग्रंथालयामध्ये तयार होत असते. सर्वात जास्त शैक्षणिक केंद्रे असणारा जगातील तिसऱया क्रमांकाचा देश हिंदुस्थान आहे. जर देशाची शिक्षण व्यवस्था बळकट करायची असेल तर प्रथम ग्रंथालये सक्षम करायला हवीत. आज ग्रंथालये संशोधन केंद्र म्हणून कार्यरत आहेत. पारंपरिक ग्रंथालयापासून आजच्या आभासी ग्रंथालयापर्यंत या क्षेत्राच्या प्रत्येक बाबीमध्ये बरेच प्रगतिशील बदल झाले आहेत.

क्षेत्रवार वेगवेगळी ग्रंथालये असतात. जसे – राष्ट्रीय ग्रंथालय, सार्वजनिक ग्रंथालय, व्यावसायिक ग्रंथालय, शैक्षणिक ग्रंथालय, शासकीय ग्रंथालय. याशिवाय विषय विभागानुसार विशेष ग्रंथालये आहेत, जसे- वैद्यकीय ग्रंथालय, रेल्वे ग्रंथालय, बँक ग्रंथालय, कारागृह ग्रंथालय, विभागीय ग्रंथालय, संसद ग्रंथालय, विविध मंत्रालयांची ग्रंथालये, प्रांतीय ग्रंथालय, जिल्हा ग्रंथालय, कायदा ग्रंथालय, वृत्तपत्र ग्रंथालय, अंध वाचक विशेष ग्रंथालय, संगीत ग्रंथालय, बाल ग्रंथालय, सैन्य ग्रंथालय, मोबाईल (चालते-फिरते) ग्रंथालय, खासगी ग्रंथालय वगैरे. अशा प्रत्येक क्षेत्राचे आणि विभागाचे स्वतःची ग्रंथालये असतात. जगातील कोणत्याही देशातील अत्यंत दुर्मिळ ग्रंथ, ताम्रपत्र लेखन, चित्रपट, मासिके, नकाशे, हस्तलिखित कागदपत्रे आणि ग्रंथ, ग्रामोफोन रेकॉर्ड, ऐतिहासिक दस्तऐवज, जागतिक ख्यातनाम व्यक्तींचे संकलित दस्तऐवज, जसे की विधिलिखित निर्णय, डायरी, पत्र, संभाषण रेकॉर्ड, मोहर आदेशपत्र आणि शेकडो वर्षे जुने असे अनेक अमूल्य साहित्य आपल्यासाठी इंटरनेटच्या एका क्लिकवर ग्रंथालयातून त्वरित उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त ग्रंथालयात जगभरातील सर्व क्षेत्रांमध्ये विकसित केलेले साहित्य, कार्यक्रम, घटना, संशोधन, पेटंट्स आणि सध्याच्या क्रियाकलापांची संपूर्ण माहिती असते. वाचकांच्या गरजा भागविण्यासाठी नवीन संसाधने उपलब्ध करून गुणवत्तापूर्ण ज्ञानाबरोबर वाचकांचा वेळही वाचविला जातो.

ग्रंथालय महत्त्वाचे आहे, मग विकास का होत नाही?

आज आपण आधुनिक युगात जगत आहोत. जगभरात ग्रंथालयांनी जलद प्रगती केली आहे. आपल्या देशातील आयआयटी, आयएएम, एम्स यासारख्या केंद्रीय संस्थानांची ग्रंथालये किंवा काही मोठय़ा खासगी संस्थानांची ग्रंथालये विकसित दिसतात, पण जेव्हा आपण आजूबाजूची ग्रंथालये पाहतो तेव्हा असे दिसते की, ग्रंथालयांचा विकास कुठे झाला आहे? देशातील हजारो लहानमोठी ग्रंथालये अविकसित दिसतात, जेव्हा की देशातील सर्वात मोठा वाचक वर्ग या ग्रंथालयांमधून आहे. या लायब्ररीत वाचकांसाठी अत्याधुनिक संसाधने पाहणे तर दूरच, पण मूलभूत ग्रंथालयीन सेवादेखील उपलब्ध नाहीत. बऱयाच लायब्ररीत साहित्याच्या नावावर काही मोजकी वर्तमानपत्रे येतात. शासनाने प्रत्येक क्षेत्र, विभाग, शाळा, महाविद्यालय, संस्था, समाज यांच्या विकासाकरिता ग्रंथालयाचे महत्त्व ओळखले आहे, परंतु आम्ही अजूनही ग्रंथालयाच्या विकासामध्ये खूप मागास आहोत.

ग्रंथालयात तज्ञ कर्मचारीच नाहीत

केवळ या क्षेत्रातील तज्ञ कर्मचारीच ग्रंथालयात वाचकांना अधिक चांगली सेवा देऊ शकतात, परंतु देशातील बऱयाच राज्यांच्या शाळांमध्ये, विभागात अनेक वर्षांपासून ग्रंथालय कर्मचाऱयांची भरतीच झालेली नाही. कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत, परंतु त्यांच्या ठिकाणी नवीन कर्मचारी येत नाहीत. अनेक ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांच्या भरवशावर ग्रंथालये चालू राहिली आहेत. कुशल कामगारवर्ग, दर्जेदार वाचन साहित्य, सुविधा, पुरेसा निधी यांची कमतरता आहे. स्थानिक प्रशासन (महानगरपालिका, नगरपालिका) यांच्या सार्वजनिक ग्रंथालयांची स्थिती अशीच आहे.

बरीच ग्रंथालये उद्ध्वस्त होत आहेत. देशातील हजारो ग्रंथालये अस्तित्वाची लढाई लढत आहेत. म्हणजेच पुष्कळशा लायब्रऱया पुरेशा निधीअभावी आणि चांगल्या व्यवस्थापनाच्या कमतरतेमुळे संपण्याच्या मार्गावर आहेत. तेथील मौल्यवान वाचन साहित्य नष्ट होत आहे. बऱयाच लायब्ररीत वाचकांसाठी पुरेशी टेबल, खुर्च्या, पंखे, प्रकाश, पिण्याचे पाणी, शौचालये, तर कुठे वीजदेखील नाही आणि ग्रंथालय इमारतींच्या खिडक्या, दारे, भिंती कमकुवत झाल्या आहेत. पावसाळय़ात आणखी वाईट परिस्थिती होते. ग्रंथालयाची इमारत जीर्ण अवस्थेत आहे. छोटय़ा खेडय़ापासून मोठय़ा शहरांपर्यंत सर्वत्र ही परिस्थिती दिसून येते. तरीही अशा परिस्थितीत वाचक मोठय़ा संख्येने ग्रंथालये वापरत आहेत. उज्ज्वल भवितव्यासाठी अभ्यासाचे धोरण आणि स्पर्धा परीक्षांमुळे ग्रंथालयाकडे तरुणांचा कल वाढला आहे.

प्रत्येक ग्रंथालयाचा विकास अत्याधुनिक व्हावा

शिक्षण पद्धती सुधारित करायची असल्यास ग्रंथालयांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे फार महत्त्वाचे आहे. केंद्र, राज्य, स्थानिक प्रशासनाने अर्थसंकल्पात शिक्षणाव्यतिरिक्त ग्रंथालयासाठी मोठय़ा प्रमाणात आर्थिक सहाय्य प्रदान केले पाहिजे. देशातील सर्व प्रकारच्या लायब्ररीत दरवर्षी आवश्यकतेनुसार भरती केली पाहिजे. ज्याप्रकारे शहरे आता महानगराचे रूप घेत आहेत, वाढत्या लोकसंख्येनुसार शहरे वाढत आहेत, गरज वाढत आहे, त्यानुसार ग्रंथालयांची संख्या वाढत नाही. ग्रंथालयात अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी दूरदुरून येतात. देशात ग्रंथालयांची कमतरता आहे म्हणूनच ग्रंथालयांचा विस्तार अत्यंत महत्त्वाचा आहे. आयआयटी, आयआयएमच्या ग्रंथालयासारखे ग्रंथालय प्रत्येक शहरात असायला हवे.

शहरांमधील प्रत्येक प्रभागात, प्रत्येक गावात ग्रंथालये स्थापन करावीत. मोबाईल (चालते-फिरते) ग्रंथालये वेगवान करावी लागतील. शालेय शिक्षणाच्या अगदी सुरुवातीपासूनच मुलांना लायब्ररीचे महत्त्व शिकवले पाहिजे. प्रत्येक विद्यापीठाच्या ग्रंथालयाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय बनवून विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या प्रत्येक महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला ऑनलाइन जोडले गेले पाहिजे. प्रत्येक शाळा, महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक विभागाच्या लायब्ररीला ई-लायब्ररी तयार करायला हवी, जे त्यांचे साहित्य ऑनलाइन अपलोड करून त्याला डिजिटल ग्रंथालयाचे स्वरूप देतील आणि आपल्या संस्थेचा ई-रिपॉझिटरी स्थापित करतील. आपल्या देशात, राज्यात शालेय स्तरीय ग्रंथालये आणि सार्वजनिक ग्रंथालयांची अवस्था फार गंभीर आहे. ती सुधारण्यासाठी राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवर ग्रंथालय माहिती विज्ञान क्षेत्रातील अनुभवी तज्ञांच्या समिती स्थापन केली पाहिजे. ही समिती सरकारकडे विविध स्तरांच्या ग्रंथालयांचे मूल्यांकन करून त्याच्या विकासात्मक बाबींवर सल्ले देईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रंथालय तयार करण्याच्या पद्धतीवर देखरेख ठेवेल.