साहित्यकट्टा – वाचन संस्कृतीचा बदलणारा पोत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. मिलिंद जोशी

समाजाला संवेदनशीलता आणि भावसंपन्नता केवळ साहित्यच देऊ शकते. सुधारणा महत्त्वाच्याच आहेत. कारण त्या समाजाचे बाह्यजीवन समृद्ध करतात, पण त्यांच्या जोडीला संस्कृतीही आवश्यक आहे. कारण ती अंतरंग समृद्ध करते. म्हणून सुधारणांचे सारथ्य संस्कृतीने केले पाहिजे. ही संस्कृती म्हणजेच वाचन संस्कृती. 15 ऑक्टोबर हा दिवस वाचनप्रेरणा दिन म्हणून नुकताच साजरा झाला त्यानिमित्ताने वाचनसंस्कृतीचे चिंतन करणारा लेख

गेल्या शंभर वर्षांत जेवढे बदल झाले नाहीत तेवढे या दहा वर्षात झालेले आहेत. जागतिकीकरण आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे एकूणच जागतिक जीवनशैलीत जे बदल झाले आहेत त्याचे परिणाम त्या त्या देशातल्या संस्कृतीवर झाले आहेत. साहित्य संस्कृती आणि वाचनसंस्कृतीही त्याला अपवाद राहिलेली नाही.

एक काळ असा होता की लोकांना फक्त कथा, कविता आणि कादंबऱयांसारख्या ललित साहित्यात रस होता. गेल्या काही वर्षांत ज्ञानाची क्षेत्रे विस्तारल्यामुळे जीवनाशी निगडित सगळे विषय आपण समजून घेतले पाहिजे अशी वाचकांची मानसिकता झाली. त्यातूनच संगणक कसा शिकावा इथपासून ते पैसे कुठे गुंतवावेत आणि आरोग्य कसे जपावे इथंपासून ते पर्यटन कसे करावे या प्रकारच्या पुस्तकांची मागणी वाढली. गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलनात होणाऱया ग्रंथविक्रीचा आकडा दोन-तीन कोटींच्या आसपास असतो, पण या तीन कोटींमध्ये ललित साहित्याची पुस्तके किती विकली गेली आणि माहितीपर साहित्याची पुस्तके किती विकली गेली यासंदर्भातली माहिती मात्र प्रसिद्ध होताना दिसत नाही. साहित्य आणि ग्रंथ व्यवहाराशी निगडित लोकांना याचे सर्वेक्षण करून बदलत्या वाचक अभिरुचीचा आलेख काढावा असे वाटत नाही ही चिंतेची बाब आहे.

12 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात साहित्य संमेलनात केवळ दोन-तीन कोटी रुपयांची विक्री झाली तरी अत्यानंद साजरा करण्याची मानसिकता अजूनही बदलताना दिसत नाही. एक हजार पुस्तकांची आवृत्ती खपायला पाच-दहा वर्षे लागतात. जागतिकीकरणानंतर मध्यमवर्गीयांची आर्थिक ऐपत वाढली. त्यांच्याकडे भौतिक समृद्धी आली. हा पैसा मॉल्स, मल्टिप्लेक्स आणि रेस्टॉरंटमध्ये जितक्या सढख हाताने खर्च होतो तितका पुस्तकं खरेदीसाठी का होत नाही याचाही विचार केला पाहिजे. भौतिक समृद्धी वाढली तरी सांस्कृतिक श्रीमंती का वाढत नाही याचे चिंतन करण्याची वेळ आली आहे.

अंगावर असणारे उंची कपडे, महागडे दागदागिने, हातातला महागडा मोबाईल, वापरात असलेल्या गाडय़ा हा आजकाल प्रतिष्ठsचा निकष मानला जाता मग घरात मराठीतली सर्वोत्तम 1000 पुस्तके आहेत हा प्रतिष्ठsचा विषय का वाटत नाही? सुधारणांचे आणि समृद्धीचे महत्त्व कुणीही नाकारत नाही, पण त्याचबरोबर सांस्कृतिक गरीबी नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी मानसिकता का निर्माण होत नाही? यावरही मंथन झाले पाहिजे.

वाचनसंस्कृतीचा विचार करताना त्याच्या समाजशास्त्राrय कारणांचाही विचार केला पाहिजे. जेव्हा पुस्तके ही केवळ ग्रंथालयातच उपलब्ध व्हायची तेव्हा अगदी छोटय़ातल्या छोटय़ा गावात प्रत्येक शिकलेल्या कुटुंबातला एक तरी माणूस गावातल्या ग्रंथालयाचा सदस्य असायचा. त्याच्याद्वारे ग्रंथ घरात यायचे. त्या काळच्या एकत्र कुटुंब पद्धतीत घरातली आठ-दहा माणसे त्या पुस्तकाचे वाचन करायची. वडीलधाऱयांचे वाचन पाहून घरातल्या लहान मुलांना वाचनाची गोडी लागायची. आज ही परिस्थिती राहिलेली नाही. घरातला वाचणारा वडीलधारा माणूस गेला की त्या वाचनालयाचे सदस्यत्व मिळविणारी पिढी अभावानेच दिसते. घरातली वाचनाची ही परंपरा खंडित होत चालली आहे.

दुसरी गोष्ट अशी की, गेल्या काही वर्षांत जीवनाचे जे शहरीकरण झाले आहे त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनाला वेग आला आहे. जीवनशैली गतिमान झालेली आहे. या व्यग्र जीवनशैलीत लोकांच्या अपॉइंटमेंट डायरीमध्ये कुठेही वाचनाला वेळ नाही. असलाच तर तो शेवटच्या क्रमाकांचा आहे. करमत नाही आणि झोप येत नाही म्हणून वाचणे. हा प्रकार वाढतो आहे. ‘गुणवत्तापूर्ण वेळ’ देऊन गंभीरपणे वचान करण्याची वृत्ती कमी होताना दिसते.

आज शाळेत शिकणाऱया मुलांची बालवयातच ग्रंथांशी नाळ जोडली तरच ते भविष्यात उत्तम वाचक होतील. निमशहरी आणि शहरी भागातील मुलांची दिनचर्या कमालीची धावपळीची झाली आहे. शाळेत पोहचण्यासाठी एक तास जातो. घरी येण्यासाठी तेवढाच वेळ लागतो. सात तास शाळेत जातात. सकाळी आईच्या आवडीचा एक क्लास असतो. सायंकाळी शिकवणी असते. शाळेने दिलेला गृहपाठ असतो. यातून मोकळं होईपर्यंत घराचा ताबा वाहिन्यांनी घेतलेला असतो. त्यामुळे मुलांना टीव्ही पाहणाऱया वडीलधाऱयांच्या समूहात सामील होण्याखेरीज पर्याय नसतो. त्यामुळे ही मुलं वाचन आणि खेळ या दोन्ही गोष्टीपासून आज वंचित आहेत.

आजचे युग दूरचित्रवाहिन्यांचे आहे असे आपण म्हणता. त्यामुळेही वाचन संस्कृतीला ओहोटी लागलीय असेही म्हणता येईल. हे मनोरंजनाचे प्रभावी माध्यम त्याची ताकद लक्षात घेऊन वापरले जाते का ? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

हा नन्नाचा पाढा आहे. निराशेचा सूर आहे असेही वाटण्याची शक्यता आहे. पण अंधाराच्या जागा दिसल्या तरच त्या ठिकाणी प्रकाश देणाऱया पणत्या नेवून ठेवता येतात म्हणूनच ही वस्तुस्थितीची जाणीव करून घेतली पाहिजे.

प्रकाशन व्यवसायातही गेल्या अनेक वर्षांत बरीच स्थित्यंतरे झाली आहेत. नव्या पिढीची गरज आणि तंत्रज्ञानाचा आधार घेत त्यांनी ई-बुक्सची निर्मिती केली. पुस्तके तरुण वाचकांसाठी ऑनलाइन उपलब्ध झाली, पण ती वाचण्यासाठी मोबाईल, फेसबुक, व्हॉटस्ऍपमध्ये अडकलेल्या त्यांच्याकडे वेळ आहे का ? हेही पाहिले पाहिजे.

स्वातंत्र्योत्तर कालखंडात पदवीधरांचे आणि सुशिक्षितांचे प्रमाण वाढले पण वाचनावर प्रेम करणाऱया पुस्तकप्रेमींचे प्रमाण वाढले का ? या प्रश्नाचे उत्तर मात्र समाधानकारक मिळत नाही.

आपण सभा गाजवणे, फड गाजवणे, मैफल गाजवणे हे शब्द अनेकदा ऐकतो, पण ‘पुस्तक गाजवणे’ या नावाच्या रोगाने साहित्यविश्वाला ग्रासलेले आहे. वृत्तपत्रांचे आणि मासिकांचे संपादक, समीक्षक, लेखक आणि प्रकाशक यांनी संगनमताने एखाद्या पुस्तकाची प्रकाशनापूर्वीच खूप जाहिरात करायची, गाजावाजा करायचा, वाचकांना प्रकाशन पूर्वनोंदणी करायला लावायची आणि प्रत्यक्षात पुस्तकात आल्यानंतर ते तेवढय़ा ताकदीचे नसतेच या प्रकारांमुळे वाचकांची फसवणूक होते आणि तो पुन्हा पुस्तक खरेदीसाठी उत्सुक राहत नाही. याचे भान साहित्य व्यवहारातल्या लोकांना ठेवले पाहिजे.

भाकरी ही पोटाची गरज, पण भावना जागवायला आणि मनं फुलवायला विचारच उपयोगी पडतात ते केवळ पुस्तकातून मिळू शकतात याचे भान लोकांना येणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाचे महत्त्व कोणीही नाकारलेले नाही, पण तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन आपल्याला यंत्रमानव बनायचे नाही. भावनासंपन्न माणूस बनायचे आहे. ही संवेदनशीलता आणि भावसंपन्नता केवळ साहित्यच देऊ शकते. सुधारणा महत्त्वाच्याच आहेत. कारण त्या समाजाचे बाह्यजीवन समृद्ध करतात, पण त्यांच्या जोडीला संस्कृतीही आवश्यक आहे. कारण ती अंतरंग समृद्ध करते. म्हणून सुधारणांचे सारथ्य संस्कृतीने केले पाहिजे. ही संस्कृती म्हणजेच वाचन संस्कृती.

आपण नेहमी साहित्यिकांनी समाजाभिमुख असले पाहिजे असे म्हणतो, पण खरी गरज आहे ती समाजाने साहित्याभिमुख होण्याची. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

(लेखक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत.)