
>> प्रा. अनिल कवठेकर
नकळत्या वयात आईमुळेच आपल्यावर गाण्याचे संस्कार झालेले आहेत. तिने गायलेल्या अंगाईने आपल्याला गाणी ऐकायला शिकवलेले आहे. मग मोठे झाल्यावर समजायला लागते की गाणी म्हणजे फक्त शब्द नव्हेत. स्वर किंवा संगीत नव्हे. तर ते आहे जीवनाचे तत्त्वज्ञान जे सोप्या पद्धतीने बऱ्याच गाण्यातून प्रगट होत असते.
गाणं आवडत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. बालपणीच झोपवताना आईने गायलेली अंगाई ऐकत झोपण्याचे भाग्य आपल्याला लाभले. आईचा आवाज कसा होता यापेक्षा तिच्या स्वरात बाळाला सुखाची झोप लागण्याचे सामर्थ्य होते. त्या आईमुळेच आपल्यावर गाण्याचे संस्कार झालेले आहेत. पण जीवनाच्या धावपळीत हळूहळू आपल्याला त्या गाण्याचा विसर पडला.
इतर वेळी कुणी गाणे म्हणायला सांगितल्यावर घाबरणारे आपण सहलीत मात्र सामूहिक गायनात मनसोक्त गाणी गाऊन धमाल करत असतो. कधी कधी गाताना त्यातल्या शब्दांचा अर्थ उलगडू लागतात. तेव्हा थोडा बारकाईने विचार केल्यावर लक्षात येते की, ही गाणी म्हणजे फक्त शब्द नाहीत. स्वर किंवा संगीत नाही. तर त्या गाण्यातून जीवनाचे तत्त्वज्ञान सोप्या पद्धतीने प्रगट होत आहे.
बऱयाचदा अपयश आल्यानंतर आपण निराश होतो. एका छोटय़ाशा अपयशाने जीवनातला सगळा आनंद हिरावून नेल्यासारखा वाटतो आणि कारण नसताना आपण वैफल्यग्रस्त होतो. तसे पाहिले तर जीवनात यश–अपयश येतच असतात. ‘‘मि.इंडिया’’मधले जावेद अख्तर यांनी लिहिलेले गीत जीवनातल्या पराभव आणि यशाबाबत साध्या, सोप्या शब्दात सांगून जातात. हे गाणे चित्रपटातले नसून ते गाणे माझ्यासाठी आहे असे वाटायला हवे. तरच ते गाणे तुम्हाला नैराश्यातून बाहेर काढेल.
‘‘जिंदगी की यही रीत है
हार के बाद ही जीत है
थोडे आंसू है थोडी हंसी
आज गम है तो कल है खुशी…’’
पराभवानंतर जीत आहे असा विश्वास असायला हवा. ती गाणी माझ्यासाठी आहे असे समजून ऐकले तरच त्या गाण्यातले तत्वज्ञान समजू लागते. नैराश्य, अपमान, अपयश, दुःख, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू… जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या वाटय़ाला कोणते ना कोणते दुःख आलेले आहे. पण मित्रांनो हे जीवन कोणासाठी थांबत नाही. ते अविरतपणे पुढे जात असते. तूसुद्धा या जगरहाटीचा एक हिस्सा आहेस. मग स्वतःवर रूसून का बसतोस. चल पुढे मार्गस्थ हो… असे जीवनाचे प्रभावी तत्त्वज्ञान सांगणारे गीत म्हणजे…
‘‘नदिया चले चले रे धारा
चंदा चले चले रे तारा
तुझको चलना होगा तुझको चलना होगा
जीवन कही भी ठहरता नही है
आंधी से तूफा से डरता नही है
तू ना चले गा तो चलते ही राहे
मंजिल को तरसे गी तेरी निगाहे
तुझको चलना होगा…’’
अरे, तू थांबलास म्हणून चंद्र–सूर्य उगवायचे राहतात का? नदीच्s वाहणे थांबलेय का? पशुपक्षी, कीटक कोणीही थांबत नाहीत. जीवनाच्या प्रवासात संकटाची वादळे येणारच. तू जरी चालला नाहीस तरी रस्ता चालतच राहणार आहे. तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी, चल उठ. चालायला लाग. मार्गस्थ हो!
बुद्ध सांगतात, जीवनाचे हेच तर तत्वज्ञान आहे. उद्या मी मरणार आहे असेच समजूनच आज पूर्णपणे जगून घ्यायला हवे. जी कामे उद्या करायचीत ती आज करायची. म्हणजे मृत्यू आला तरी आपण आनंदाने त्याचे स्वागत करू शकतो. बुद्धाने सांगितलेले हे तत्वज्ञान काही गाण्यांमधून आले आहे.
‘‘यम्मा यम्मा यम्मा यम्मा
ये खूबसूरत समा
बस आज की रात है जिंदगी
कल हम कहा, तुम कहा…’’
आज जगून घेऊया. हीच ती सुंदर वेळ आहे जगण्याची. उद्या आपण कुठे अस, ते आपल्यालाही माहित नाही. बऱयाचजणांना हे गणित कळत नाही. मी निवृत्त झाल्यावर असे करेन. मुलीचे लग्न झाल्यावर तसे करेन. आता करायची गोष्ट पुढे ढकलतात. जर काही विपरीत घडले की, करण्याच्या गोष्टी राहून जातात. म्हणून जेव्हा वाटते तेव्हाच ते करा. असे सांगणारे हे गीत. यात आलेल्या ‘‘यम्मा यम्मा’’ या शब्दाला तसा अर्थ नाही. पण थोडा विचार केला तर, त्यातल्या ‘‘यम’’ या शब्दाचा अर्थ कळतो. यमाशी संवाद म्हणजे मनाची खऱया अर्थाने झालेली जगण्याची तयारी होय.
राजेश खन्नाच्या ‘‘अंदाज’’मधले गीत…
‘‘जिंदगी एक सफर है सुहाना
यहा कल क्या हो किसने जाना
मौत आनी है आयेगी इक दिन
जान जानी है जायेगी इक दिन
ऐसी बातो से क्या घबराना
यहा कल क्या हो किसने जाना…’’
मरण तर प्रत्येकाला येणार आहे. ते कोणालाही चुकलेले नाही. पण मरण येणार म्हणून कोणी जगणे थांबवत नसते. अंतिम क्षण येईपर्यंत आनंदाने कसे जगता येईल याचा विचार करायला लावणारे हे गाणे आहे.
गाणी ऐकताना गाणी आपल्याशी बोलू लागतात. कवीच्या शब्दांचा भावार्थ हळुवारपणे उलगडून सांगतात. तेव्हा ते गाणे ऐकण्यात होणारा आनंद हा अवर्णनीय असतो. जो शब्दात सांगता येणार नाही. पण हृदयाच्या अंतरंगात उठणाऱया गीताच्या सूरमयी तरंगात मनसोक्त डुंबून, जगण्याकडे पाहण्याची नजर बदलली तर आपले आयुष्य खूप सुंदर करता येईल.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)




























































