स्मरण – ‘प्रबोधन’ची शताब्दी!

>> प्रा. महावीर मुळे

पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करण्यात सिंहाचा वाटा असणारे ‘प्रबोधन’ या पाक्षिकाचे शताब्दी वर्ष 16 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. आपल्या तळपत्या लेखणीने संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत 16 ऑक्टोबर 1921 रोजी ‘प्रबोधन’चा पहिला अंक मुंबईतून प्रसिद्ध केला आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्या विचाराचे वादळ उठविले. प्रबोधनकार ठाकरे हे महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रातील एक आक्रमक सुधारक, प्रभावी वक्ते, व्यंगचित्रकार, छायाचित्रकार, साहित्यिक, तैलचित्रकार असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. ‘प्रबोधन’ पाक्षिकाची शताब्दी सुरू झाली आहे… त्यानिमित्त प्रबोधनकारांच्या वृत्तपत्रीय आणि सामाजिक चळवळीचा थोडक्यात घेतलेला हा आढावा…

ज्या काळी राज्याला स्वातंत्र्यही मिळाले नव्हते त्यावेळी वैचारिक प्रबोधन व्हावे यासाठी मोठय़ा प्रयत्नांतून केशव सीताराम ठाकरे यांनी ‘प्रबोधन’ नावाचे पाक्षिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक नियतकालिक चालू करणे आणि ते चालविणे हे महाकठीण काम. भल्याभल्या भांडवलदारांनाही ते जमले नाही. अनेकजणांनी काही दिवसांतच या व्यवसायाचा गाशा गुंडाळलेला इतिहास समोर असताना प्रबोधनकार ठाकरे यांनी मोठय़ा धाडसाने हे पाऊल टाकले. विशेष म्हणजे प्रबोधनकार ठाकरे हे ब्रिटिश सरकारच्या कार्यालयात नोकरीस होते. सरकारी नोकरीत राहून सरकारी कर्मचाऱयास पुस्तक लिहिणे, प्रकाशित करणे, वृत्तपत्र लेखण करणे आणि वृत्तपत्र चालविणे यास बंदी होती. मात्र प्रबोधनकार ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीत समाजाला जागृत करण्यासाठी वृत्तपत्र चालविण्याची मोठी ओढ लागली होती. या सरकारच्या जाचक अटीमुळे वृत्तपत्र काढणे आवाक्याबाहेरचे होते. प्रबोधनकारांच्या इच्छाशक्तीपुढे ब्रिटीश सरकारही वाकले. त्यांनी आपले सर्व नियम बाजूला ठेवून प्रबोधनकार ठाकरे यांना वृत्तपत्र प्रकाशित करण्याची परवानगी दिली. प्रबोधनकार ठाकरे ज्या कार्यालयात काम करीत होते तिथे ते अधिकाऱयापासून शिपायापर्यंत सर्वांचेच आवडते होते. वृत्तपत्र प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी राजीनामा देण्याचे ठरवून अधिकाऱयांना भेटले आणि आपण वृत्तपत्र काढण्यासाठी या नोकरीचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. मात्र प्रबोधनकारांसारख्या कार्यक्षम कर्मचाऱयाला मुकण्यापेक्षा ब्रिटिश सरकारने एका अटीवर प्रबोधनकार ठाकरे यांना वृत्तपत्र प्रकाशित करण्याची परवानगी दिली आणि ती अट अशी होती की, हा अपवाद वगळता यापुढे कुणालाही परवानगी देण्यात येऊ नये. अत्यंत पुरोगामी विचाराचा पगडा असणारे प्रबोधनकार ठाकरे यांनी आयुष्यात कसल्याच बाबतीत तडजोड केली नाही. त्यामुळे ते महाराष्ट्राचे खऱया अर्थाने प्रबोधनकार ठरले.

‘प्रबोधन’ पाक्षिक हे प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रबोधनकारांनी जिवाचे रान केले. आपला ‘प्रबोधन’ हा अंक इतर सर्वांपेक्षा आगळावेगळा व्हावा यासाठी त्यांनी ‘प्रबोधन’च्या मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंतचा अत्यंत गंभीरपणे विचार केला. ‘प्रबोधन’चे सांकेतिक चिन्ह (लोगो) काय असावे?, त्यात कोणते विषय असावेत?, ‘प्रबोधन’चे अंतरंग आणि बाह्यरंग काय असावेत याची आखणी करून त्यांनी पहिल्या अंकाची मांडणी केली. प्रबोधनकार स्वतःच चित्रकार होते. ते लेखक आणि स्पष्टवक्तेही होते. त्यांच्या पाक्षिकातील संपादकीय हे समाजप्रबोधनाचे एक महत्त्वाचे अंग ठरले. अनेकांना विचार करायला लावणारे संपादकीय काही दिवसांतच अत्यंत लोकप्रिय झाले. ‘प्रबोधन’ पाक्षिकातील लेख, कविता, पत्रोत्तरे (वाचकांची दखल), दीर्घ प्रबोधनात्मक कथा, समाजसेवकांचे अल्पचरित्र याबरोबरच समाजजागृतीचा मुख्य हेतू ठेवून रोखठोक लिखाण चालू केले. ‘प्रबोधन’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन 16 ऑक्टोबर 1921 ला करण्यात आले. दर 1 आणि 15 तारखेला ‘प्रबोधन’ पाक्षिक हे मुंबईच्या दादरमधून प्रकाशित केले जायचे. या पाक्षिकाने संपूर्ण महाराष्ट्रात समाज सुधारण्याचे एक नवे वारे निर्माण केले.
1921 ते 1930 अखेर ‘प्रबोधन’ हे पाक्षिक सुरू होते. या दहा वर्षांच्या काळात या मासिकाच्या माध्यमातून पुरोगामी परिवर्तनाचे मोठे काम प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी केले. जे लिहायचे ते संशोधन करून पुराव्यानिशी. त्यामुळे त्यांनी ‘प्रबोधन’ पाक्षिक अत्यंत संघर्षातून चालविण्याचा प्रयत्न केला. मुंबईतून प्रसिद्ध होणारे हे पाक्षिक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आग्रहाखातर काहीकाळ ते साताऱयातूनही प्रसिद्ध करण्यात आले. जवळपास एक वर्ष ‘प्रबोधन’ हे पाक्षिक साताऱयातून प्रसिद्ध होत होते. त्यानंतर त्याचे प्रकाशन पुण्यातून करण्यास सुरुवात झाली. आर्थिक गणित शेवटपर्यंत जमू शकले नाही, अनेक उलाढाली करून प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘प्रबोधन’ हे पाक्षिक चालविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु नंतर हे पाक्षिक चालविणे कठीण झाले. मात्र या दहा वर्षांच्या काळात ‘प्रबोधन’ पाक्षिकाने महाराष्ट्राला वैचारिक समृद्धी दिली, नव्या विचाराची पिढी घडविण्यात सिंहाचा वाटा उचलला हे नाकबूल करून चालणार नाही. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना आपल्या आजीकडून समाजसेवेचा वारसा लाभला होता. वयाच्या आठव्या वर्षीच अस्पृश्यता निवारण्याचे बाळकडू त्यांना मिळाले. नोकरी सांभाळून त्यांनी दादर येथे स्वाध्याय आश्रम नावाची संस्था चालवून सामाजिक कार्याला सुरुवात केली. ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या माध्यमातून वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नव्या पिढीला प्रेरणा दिली.

……………………………………………………….

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचणारे ‘प्रबोधन’ हे त्याकाळी एकमेव पाक्षिक होते. ‘प्रबोधन’ पाक्षिकाने पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करताना प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर अनेक वेळा कोर्ट केसेस झाल्या. मात्र त्यांनी आपला स्वाभिमान कधीही सोडला नाही. ‘प्रबोधन’ पाक्षिकामुळे नागपूर ते बेळगावपर्यंत अनेक जीवाभावाचे मित्र त्यांना मिळाले. तसेच आपल्या तळपत्या लेखणीने त्यांनी अनेकांचा समाचार घेतला. ‘सामाजिक उक्रांतीशिवाय राजकीय क्रांती नाही’ हा त्यांचा मनोमन रुजलेला सिद्धांत शेवटपर्यंत कायम होता. सामाजिक अन्याय राज्यात कुठेही दिसला की ते त्याचा प्रतिकार ताबडतोब करायचे. मग तिथे ते कोणीही असो. ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, विनोबा भावे, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इतिहासाचार्य राजवाडे यांच्यासह कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही. तळपत्या तलवारीसारखी त्यांची लेखणी जीवनाच्या अखेरपर्यंत चालली आणि साथीला परखड वाणीचा दांडपट्टाही होता. ते नेहमी म्हणायचे, अडकित्त्यात सुपारी आली की ती फोडायचीच. समाजहिताच्या आणि माणुसकीच्या जो कुणी आडवा येईल त्याला उभा सोललाच म्हणून समजा

– (लेखक प्रबोधनकारांच्या साहित्याचे अभ्यासक आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या