ठसा – गंगाधर गाडे

>> पंजाबराव मोरे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी चळवळीने हजारो वर्षांपासून सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्यांच्या जगण्याला अर्थ आला. गावपुसाबाहेरील समाजावरील अत्याय अत्याचार दूर करणारी ‘दलित पँथर’ ही आक्रमक संघटना उदयास आली. या लढाऊ संघटनेचे बीज गंगाधर गाडे नावाच्या निखाऱ्याने मराठवाड्यात रुजविले. 1972 चा दुष्काळ, पिण्याचे पाणी, निवारा, शिक्षण अशा मूलभूत गरजांपासून या भागातील दलित समाजाला दूर ठेवले जात होते. या गोष्टीची मनस्वी चीड डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या मिलिंद महाविद्यालयात शिक्षणासाठी आलेल्या अमरावती जिह्यातील कवठाळ या खेड्यातील गंगाधर सुखदेव गाडे या तरुणाला आली. शिक्षण घेत असताना गंगाधर गाडे यांनी दलित पँथर या संघटनेच्या माध्यमातून शिष्यवृत्तीवाढीचे आंदोलन केले. शिक्षणासाठी शिष्यवृत्तीशिवाय पर्याय नसलेल्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला उदंड प्रतिसाद दिला. त्यानंतर गायरान, झोपडपट्टीत राहणाऱया नागरिकांच्या प्रश्नांसाठी उभारलेल्या आंदोलनांनी मराठवाडय़ात गंगाधर गाडे यांचे नेतृत्व उदयास आले. 1977 मध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी सुरू केलेल्या नामांतराच्या लढय़ाने जगाचे लक्ष दलित चळवळीकडे वेधून घेतले. तब्बल 17 वर्षे चाललेल्या या लढय़ात झालेला हिंसाचार, जाळपोळ, अत्याचाराच्या घटनांनी देश होरपळून निघाला. या लढय़ात दलित पँथर या लढाऊ संघटनेच्या स्थानिक नेतृत्वाची धुरा गंगाधर गाडे यांनी सांभाळली. नामांतर लढय़ात मराठवाडय़ातील दलितांवर होणाऱया अत्याचाराला सडेतोड उत्तर देण्याचे काम गंगाधर गाडे यांनी केले. गोरगरीबांच्या प्रश्नांसाठी त्यांनी शासनाला सळो की पळो करून सोडले. नामांतर लढा लढत असतानाच ग्रामीण भागातून छत्रपती संभाजीनगरात येणाऱया गोरगरीबांच्या निवाऱयाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी तब्बल 47 झोपडपट्टय़ा वसवून इतिहास घडविला. दलितांवरील सामूहिक अत्याचाराच्या घटनांना सडेतोड उत्तर देण्यासाठी गाडे नेहमीच आक्रमकपणे पुढाकार घेत. त्यांच्या आक्रमक आणि निर्भीड स्वभावाने ते हजारो कार्यकर्त्यांच्या गळय़ातील ताईत बनले. त्यांना कार्यकर्ते व नेते घडवण्याचा कारखाना संबोधले जात असे. गाडे म्हणजे सामाजिक भान जपणारा प्रगल्भ आणि अभ्यासू नेता. राजकीय पिंड नसल्याने त्यांना राजकारण कधी जमले नाही. मात्र त्यांच्या सामाजिक जाणीवेला तोड नव्हती. त्यामुळे गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी प्राथमिक ते पदव्युत्तर वर्गांपर्यंत एकाच ठिकाणी शाळा सुरू केली. नामांतर होईपर्यंत मुलाचे नाव ठेवणार नाही अशी शपथ घेतलेल्या गाडे यांनी 17 वर्षांनी विद्यापीठ नामविस्तार झाल्यानंतर मुलाचे नाव ठेवले. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील एका खेडय़ातील दलित पुटुंबांना गावाबाहेर काढण्यात आले हे कळताच गाडे यांनी या पुटुंबांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसवून तीव्र आंदोलन छेडले. त्यानंतर या सर्व पुटुंबांना म्हाडाची घरे देण्यात आली. त्या का@लनीचे नाव नामांतर का@लनी ठेवण्यात आले. 1999 मध्ये विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात त्यांना परिवहन राज्यमंत्रीपदावर काम करण्याची संधी मिळाली. जीवन प्रवासात पत्नी सूर्यकांता गाडे यांनी त्यांना समर्थ साथ दिली. माईसाहेब आंबेडकर यांनी या पुटुंबाला मोठा जीव लावला. गेल्या काही वर्षांपासून गंगाधर गाडे आजारीच होते. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीतील एक धगधगता निखारा निवळला आहे.