आता कोणाचा नंबर?

>> शब्दांकन – राज चिंचणकर

(आयुष्यात आलेल्या सुखानुभवाची मांडणी करत आहेत ज्येष्ठ अभिनेते व कार्यकारी निर्माते भूषण तेलंग.)

नेहमीच्या धबडग्यात आपण इतके व्यस्त असतो की पितृपक्ष हे निमित्त ठरते आपल्याला सोडून गेलेल्या माणसांना आठवण्यासाठी! आई-वडिलांच्या आठवणी तर कायम येतच राहतात. माझे आई-वडील आणि मोठय़ा बहिणीच्या पश्चात मला काही सुखानुभव आले. माझे वडील 2002 या वर्षी गेले. त्यानंतर आई 2012 आणि ताई 2019 या वर्षी गेली. मला असे वाटते की, गेलेल्या माणसांच्या हुबेहुब चेहऱयांसारखी दिसणारी माणसे आपल्या संपका&त येऊन दृष्टांत देतात आणि आपल्याला सुखावतात. यामागे जगन्नियंत्याचा काय उद्देश असेल याचे मला कुतूहल आहे.

माझे वडील आणि ताई मला अधूनमधून वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या माणसांच्या रूपात दर्शन देतात. अगदी तशाच दिसणाऱया व्यक्ती आपल्या समोर येतात आणि त्या व्यक्तींना पाहून आपल्याला स्तब्ध व्हायला होते. मग त्यांच्याशी बोलण्यासाठी जिवाचा आकांत, धडपड आणि घालमेल होते. आईच्या संदर्भात मुंबई मेट्रोत मनावर कोरला गेलेला एक अनुभव माझ्या गाठीशी आहे.

शूटिंगहून मी घरी जात असताना वर्सोवा स्थानकात, माझ्या आईसारखी हुबेहूब दिसणारी स्त्राr मला दिसली. मी थबकलो. ते रूप मी नजरेत साठवून ठेवत होतो. मनात कल्लोळ, घालमेल झाली. ती बोलत होती तिच्या बरोबरच्या माणसाबरोबर! आता ती माझ्याशी बोलावी म्हणून माझा आटापिटा सुरू होता. अचानक तिने माझ्याकडे पाहिले, ओळख असल्यासारखी ती हसली आणि तिने चक्क माझ्याशी संवाद साधला. अर्थात ती एक प्रवासी म्हणून माझ्याशी बोलत होती आणि मी ‘आई’ म्हणून आज्ञाधारकपणे तिच्या प्रश्नांना उत्तरे देत होतो.

माझे मन थाऱयावर नव्हते. घाटकोपर स्टेशन आले; जे कधीच येऊ नये असे वाटत होते. अजाणतेपणे हृदयाचे ठोके वाढले होते. हृदय बंद पडतेय की काय असे वाटत होते. डोळ्यांत अश्रूंनी दाटी केली होती. पावले जड झाली होती. गर्दी ओसरल्यावर सरकत्या जिन्यावर मी तिला हात दिला. कृतकृत्य झालो तिच्या स्पर्शाने! तिने एक्झिट घेतली; जी माझ्या आईने काही वर्षांपूर्वी घेतली होती. तिच्या दूर जाणाऱया आकृतीकडे मी असहाय्यपणे बघत होतो. मला किरण येलेची माझ्या आईवरची कविता आठवली… ‘ती अजूनही तशीच…!’ आता या घटनेला वर्षे लोटली आहेत. मी दिवसाआड मुंबई मेट्रोने प्रवास करतोय. संध्याकाळी किंवा रात्री परतीच्या वेळी घरी जाताना आजही माझी शोधक नजर ‘तिला’ शोधतेय. गेलेला आपला माणूस कधीच परत येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण आयुष्यात कधी ना कधी माणसे भेटत राहतात आणि आपल्या गेलेल्या माणसांच्या भेटी घडवतात. आपण परत परत ‘रिवाइंड’ होतो.

चित्रपट, मालिका क्षेत्राच्या चंदेरी दुनियेत काम करताना मी खूप चढ-उतार बघितले आहेत. ही दुनिया मुखवटय़ांची आहे. पण मी या क्षेत्रात मानाने, अभिमानाने जगलो आणि आजही भक्कम आत्मविश्वासाने उभा आहे. यासाठी माझी पत्नी वसुधा व मुलगी परी यांचे माझ्या मागे असलेले पाठबळ मला सकारात्मक ऊर्जा देते. अभिनेत्री परी तेलंगचे वडील आणि वसुधाचा नवरा, फिल्म लाईनमधला ज्येष्ठ कार्यकारी निर्माता आणि अभिनेता आहे; अशी माझी आज ओळख करून दिली जाते. आमच्या तिघांचे ‘बॉण्डिंग’ घट्ट आहे. त्यात आता माझा जावई, रोहन शिरगांवकर पण सामील झाला आहे. आमच्या कुटुंबाचा चौकोन आता खऱया अर्थाने परिपूर्ण झाला आहे. पण आई ही आईच असते. तिची पोकळी सतत जाणवत राहते. मात्र आपण प्रत्येक बाबतीत पर्याय शोधत असतो. वसुधा आणि परी यांच्या रूपाने मला ते पर्याय सापडले; नव्हे तर ते माझ्याजवळ असल्याची जाणीव मला झाली. या दोघींमध्ये मला माझ्या आईचे अस्तित्व सतत जाणवत राहते.