रंगनाट्य – मनोरंजनाचा ‘म्हसवेकर पॅटर्न’…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>राज चिंचणकर

एक छोटी संकल्पना विचारात घेऊन त्यावर नाटकाचा पूर्ण प्रयोग कसा उभा राहू शकतो, याचे उत्तम उदाहरण दर्शवणारे नाटक.

काही नाटय़कृती अधूनमधून रंगभूमीवर येत राहतात आणि रंगभूमीकडे त्यांनी कधी पाठ फिरवलेलीच नाही हे सिद्ध करत जातात. प्रसिद्धीच्या झोतापासून कायम दोन हात दूर असलेले लेखक व दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांची काही नाटके या पठडीत मोडतात. नाटकांच्या व्यावसायिक ग-णताचा खेळ न मांडता केवळ स्वतच्या आनंदासाठी नाटक करत राहणे हा या रंगकर्मींचा पिंड आहे. कुणी स्तुती करो किंवा टीका, त्यांचे रंगभूमीवरचे काम सातत्याने सुरूच असते.

त्यांच्या नाटकांचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे नाटकात नेपथ्याचा कमीत कमी केला जाणारा उपयोग! कुठेही, कधीही करता येणारी नाटके असा फॉर्म ते कायम हाताळत आले आहेत. त्यांचा हा फॉर्म, ‘म्हसवेकर पॅटर्न’ म्हणून नाटय़सृष्टीत ओळखला जातो. अगदी मोजक्या नेपथ्याचे वैशिष्टय़ जपत ‘मुव्हेबल’ प्रकारात मोडणाऱया त्यांच्या नाटय़कृती, ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वावर रंगभूमीवर आणि इतरत्रही सुखाने नांदत असतात.

‘सुनेच्या राशीला सासू’ हे त्यांचे असेच एक नाटक रंगभूमीवर अधूनमधून येत असते किंवा आवश्यक तेव्हा मागणी असल्याप्रमाणे कुठे ना कुठे सादर होत असते. या नाटकाचा विषयही असा आहे की, तो कधीही कंटाळवाणा ठरू शकत नाही. विशेष म्हणजे मनोरंजनाचा ‘म्हसवेकर पॅटर्न’ असलेल्या या नाटकाची भुरळ रसिकांना कायमच पडत आली आहे. नाटकाच्या शीर्षकातच गंमत असलेल्या या नाटकाचे लेखन आनंद म्हसवेकर यांनी मुळातच अशा पद्धतीने केले आहे, की, या नाटकाला रंगभूमीवर कधीही ‘एन्ट्री’ घेता येणे शक्य व्हावे. व्यावसायिक रंगभूमीवर तर हे नाटक गाजतच राहिले आहे; परंतु आजही विविध औचित्य साधून या नाटकाचे प्रयोग अनेक ठिकाणी होत असतात.

केवळ एक छोटी संकल्पना विचारात घेऊन त्यावर नाटकाचा पूर्ण प्रयोग कसा उभा राहू शकतो, याचे उत्तम उदाहरण हे नाटक कायम करते. या सगळ्या खटाटोपासाठी लेखक व दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांनी बारा राशींना हाती धरले आहे. या राशींच्या विविध तऱहा खुलवत आणि त्यातून रंजन करणारे प्रसंग योजत त्यांनी हे नाटय़ सादर केले आहे. बारा राशींना सोबत घेऊन केलेले नाटक म्हटल्यावर डोळ्यांसमोर त्या राशींचा क्रम हटकून येतोच, पण त्यांनी या राशींचा ाढम बदलत ठेवला आहे. त्यामुळे या नाटकात कुठलीही रास आणि त्याबरहुकूम यातली पात्रे रंगमंचावर कधीही अवतीर्ण होतात. राशींचा क्रमउलटसुलट केल्याने सरधोपट क्रमानुसार येणाऱया अंदाजाला आपसूकच बगल मिळते आणि वेगळेपणासह नाटय़ातली रंजकताही वाढते.

या नाटकाचे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे ज्येष्ठ कलावंत नयना आपटे यांची यातली सासूची भूमिका. गायन आणि अभिनय अशा दोन्ही शैली स्वतत सर्वार्थाने मुरवलेल्या नयना आपटे आजही तितक्यात ताकदीने व उत्साहाने रंगभूमीवर उभ्या आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी तर ही पर्वणीच आहे; पण त्याचबरोबर नव्या पिढीच्या मनावरही त्या त्यांच्या अभिनयाचे गारुड अलगद करून जातात. बारा राशींच्या स्वभावानुसार विविध प्रकारच्या सासूंचे अफलातून नमुने नयना आपटे यांनी या नाटकात रंगवले आहेत. अर्थातच, त्यांच्या या वैविध्यपूर्ण भूमिकांना हमखास टाळ्या मिळतातच. या भूमिका रंगवताना त्यांनी घेतलेल्या विविध प्रकारच्या लकबी म्हणजे तर प्रत्यक्ष अनुभवण्याचीच गोष्ट आहे.

नाटकात आणि नाटकाच्या शीर्षकात सासू आहे म्हटल्यावर सून येणारच. सासूप्रमाणेच यातल्या सुनेच्या वाटय़ालाही विविध रंग भरण्याचा योग आला आहे. आतापर्यंत योगिनी पोफळे व नीता दोंदे या कलाकारांनी ही भूमिका साकारली आहे. सध्या नीता दोंदे या नाटकात सुनेची भूमिका रंगवत असून बारा राशींची ही पात्रे रंगवताना तिने भन्नाट बेअरिंग घेतली आहेत. यापैकी कुठल्याही पात्राच्या वैशिष्टय़ाची पुनरावृत्ती होणार नाही याचे अचूक भान राखत तिने या भूमिका लक्षवेधी करून ठेवल्या आहेत. या नाटकात ‘गृहस्थ’ असे अजून एक पात्र आहे. या भूमिकेत मनोहर सोमण यांनी प्रसंगानुरूप अनेक सोंगे घेतली असून सासू आणि सुनेच्या जुगलबंदीतही ते त्यांचे अस्तित्व कायम राखतात.

आनंद म्हसवेकर यांची खासीयत असल्याप्रमाणे अतिशय मोजके नेपथ्य त्यांनी या नाटकासाठी वापरले आहे. म्हटले तर या संहितेला नेपथ्याची काही आवश्यकता नाहीच. साहजिकच, नाटकात सुटसुटीतपणा आला आहे. या नाटकात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाचे पारडे जड असल्याने त्यावरच प्रामुख्याने लक्ष केंद्रित होत राहते. एकूणच, या नाटकातल्या सासू व सुना हा सगळा खेळ धमाल पद्धतीने रंगवत नेतात आणि हे नाटक मनोरंजनाची भरपेट मेजवानी देत राहते.
– [email protected]