
>> रजनीश राणे
कोल्हापूर कुस्तीच्या ‘दंगल’साठी आणि आता दत्त सोंगी भजनाच्या ‘दंगल’साठी प्रसिद्ध झाले आहे. गंगावेसच्या धोत्रे कॉलनीतील निगवेकरांच्या घरात दर शनिवारी संध्याकाळी भजनाची तालीम होते.
तीन गोष्टी जुळून यायला हव्यात. म्हणजे तुम्ही शनिवारी कोल्हापूरच्या गंगावेसमध्ये सायंकाळी सातच्या नंतर हजर असायला हवे. तेव्हा नक्कीच तुमच्या कानावर दत्तभजनाचा स्वर पडेल. हे मंदिरातील भजन नव्हे तर दत्त सोंगी भजनाची तालीम सुरू आहे. तसे कोल्हापूर हे ‘तालीम’साठी ओळखले जात असले तरी गंगावेसमधील दर शनिवारची ही तालीम वेगळी आहे. बापू निगवेकर यांच्या घरात सुरू असलेली ही तालीम आहे, दत्तमहाराजांच्या करुणेची!
गंगावेसच्या धोत्रे गल्लीतील उत्तम निगवेकर यांना बापू नावानेच अवघे कोल्हापूर ओळखते. वय वर्षे 66, पण बापूंचा आवाज खणखणीत. त्यांच्या ओम् श्री स्वामी चैतन्य भजनी मंडळाच्या दत्त सोंगी भजनाचा अवघ्या महाराष्ट्रात बोलबाला. मुंबईत 17 कार्यक्रम झाले. पुणे, कर्नाटक आणि गोवाही गाजवले. तब्बल 55 जणांचा फौजफाटा घेऊन बापू मुक्कामाला पोहोचतात आणि नंतर मग पाच तास सुरू असतो आध्यात्मिक धमाका.
बापूंना भजनाचे हे बाळकडू लहानपणीच आईवडिलांकडून मिळाले. त्या दांपत्याला स्वामी स्वरूपानंद, चिले महाराज, संत बाळूमामा यांचा दर्शनाचा लाभ मिळाला आणि मग तो आध्यात्मिक संस्कार बापूंच्या मनात कुठेतरी खोलवर रुजला. बापू कोल्हापुरातील शाहू बँकेचे संचालकही होते. आता गणेशोत्सवात गणेशमूर्ती कारखाना उघडतात आणि एरवी दिवसभर पोस्टाचे रिकरिंग डिपॉझिट गोळा करतात. पोटापाण्याचा व्यवसाय तो हाच. मात्र दत्तमहाराज आणि स्वामी समर्थांच्या कृपेने चिंता नाही यावर ते ठाम आहेत.
तसा भजनाचा आणि त्यांचा काहीच संबंध नव्हता. चारचौघांसारखेच ते जुन्या हिंदी गाण्यांचे शौकीन. समर्थांची पूजा करावी, कामधाम करावे आणि कुठेतरी हिंदी गाणी गुणगुणावी असा दिनक्रम होता. अक्कलकोटला जाणे-येणे सुरूच होते. तशात 28 वर्षांपूर्वी समर्थ भक्त परिवारातील एक अधिकारी पुरुष काटकर यांच्या संपर्कात आले आणि बापूंचे अवघे जीवनच बदलून गेले. काटकर यांच्या सांगण्यावरूनच भजनी मंडळाची स्थापना झाली आणि दत्त सोंगी भजन हा वेगळाच प्रकार तयार झाला. बापू निगवेकर यांच्या या भजनी मंडळाचा दरवर्षी 31 डिसेंबरला अक्कलकोट मुक्कामी कार्यक्रम दणक्यात साजरा होतो. तुडुंब गर्दी उसळते.
कोकणात होळीच्या मांडावर सोंगे आणली जातात. तशी ती प्रथाच आहे आणि आजच्या डिजिटल युगातही ती थोडय़ाफार प्रमाणात सुरू आहे. कोल्हापूरकरांचे हे सोंगी भजन मात्र कोकणातील सोंगी प्रथेपेक्षा खूपच वेगळे आहे. दत्त संप्रदायातील अनेक सत्पुरुषांची भजनातून आळवणी केली जाते आणि मग त्या सत्पुरुषांचे, देवाचे रूप घेऊन कलाकार भजनात सामील होतात. हे रूप एवढे हुबेहूब असते की ऐकणारे तृप्त होतात आणि पाहणारे अचंबित होतात. काही भाविक भक्त तर त्या रूपाच्या पायावरच लोटांगण घेतात आणि कृपेची करुणा भाकतात. गणपतीस्तवनाने सुरुवात होते. गणेश येतो, मग साईबाबा, स्वामी समर्थ, शंकर महाराज, विठ्ठल-रुक्मिणी, हनुमान, नवनाथ, खंडोबा, संत बाळूमामा, जोतिबाची शासनकाठी, बुरगुंडा अशी सोंगे एकापाठोपाठ दाखल होतात आणि कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच जातो. या सोंगी भजनात कलाकार आणि भाविक एवढे आकंठ बुडून जातात की शेवटी आयोजकांना येऊन विनंती करावी लागते की, बापू सात तास झाले. आता कृपया समारोप करा. मंदिरातील आरतीची वेळ झाली.
कोल्हापुरातील गंगावेसमधील धोत्रे गल्लीतील निगवेकरांचे घर आता या सोंगी भजनामुळे आध्यात्मिक केंद्रच बनले आहे. दर शनिवारी सायंकाळी सात ते साडेनऊ असा अडीच तास भजनाचा रंगमेळा भरला जातो. सर्वजण समर्थ भक्त आणि हीच यांच्या मंडळाची तालीम. मंडळाच्या कार्यक्रमाचा एवढा बोलबाला आहे की कोल्हापुरातील सावली, आम्ही कोल्हापूरकर मंडळ कार्यक्रम कुठेही असू दे, तेथे आवर्जून पोहोचतात आणि दत्तनामात रंगून जातात.
या मंडळातील सर्वचजण कष्टकरी आहेत. खिशाने नसले तरी कलेने श्रीमंत आहेत. मंडळातील सर्वांचीच नावे येथे स्थलमर्यादेमुळे देता येत नाहीत, पण सीताराम जाधव, अजित शिंदे, जयवंत माने, राजू ठोंबरे, उत्तम ठमके, निखिल मुळे, अर्जुन घाटगे, संजय महापुरे यांच्यासारख्या कलाकारांच्या अदाकारीचा आवर्जून उल्लेख करावाच लागेल. गेली 24 वर्षे अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिरातील भजनसेवा ही विनामोबदला केली जाते. पदरमोड करून हे 55 जणांचे कुटुंब तेथे येते आणि थर्टी फर्स्टचा जल्लोष खऱया अर्थाने आध्यात्मिक होऊन जातो.
बापूंच्या भजनी मंडळाचा जल्लोष जर थर्टी फर्स्ट ‘वेगळय़ाच’ मूडमध्ये साजरा करणाऱयांनी बघितला तर ते नक्कीच म्हणतील, ‘बापू, तू तो हमारे थर्टी फर्स्ट के लिए हानिकारक है…’ कोल्हापूर कुस्तीच्या ‘दंगल’साठी आणि आता सोंगी भजनाच्या ‘दंगल’साठी प्रसिद्ध, हेच खरे!





























































