प्रासंगिक – हिंदू नूतन वर्षारंभ

>> रामकृष्ण विनायक अभ्यंकर

भारतात अनेक धर्माचे लोक आहेत. ते आपापल्या परंपरेप्रमाणे आपले सण समारंभ साजरे करीत असतात. अर्थात प्रत्यक्ष मागे कोणतीही तरी ठोस भक्कम पार्श्वभूमी असतेच. इंग्लिश कॅलेंडरनुसार जानेवारी ते डिसेंबर ही जरी सर्वमान्य कालगणना होत असली तरी प्रत्येक धर्मानुसार तो कालावधी वेगवेगळा असतो. हिंदू धर्म पद्धतीनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या अशी संवत्सर गणना होत असते. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आपला नूतन वर्षारंभ असतो.

या वर्षी आज म्हणजेच मंगळवारी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा शके 1946 असून क्रोधी नावाचे संवत्सर आहे. राजा विक्रमादित्याने शालिवाहन शक सुरू केले. या वर्षी शक वर्ष 1946 म्हणून सुरू झाले आहे. गुढीपाडवा म्हणजे विजयाचे द्योतक आहे. रामाने रावणाचा वध केल्यावर विजयोन्मादात श्रीरामाडी मंडळी अयोध्येस परतली. त्या वेळी विजयाचे द्योतक म्हणून दारोदारी गुढय़ा, तोरणे, ध्वज, रांगोळ्या, पताका लावून नगरवासीयांनी विजयोत्सव साजरा केला. गुढीपाडवा म्हणजे तोच विजयोन्मादाचा दिवस असे थोडक्यात म्हणता येईल.

आपल्या हिंदू परंपरेत एकूण साडेतीन मुहूर्त शुभ मानले जातात. गुढीपाडवा-चैत्र, अक्षय तृतीया-वैशाख, विजयादशमी व दिवाळीतील पाडवा, अर्धा मुहूर्त-कार्तिक या चार विशेष दिवशी मंगलकार्यासाठी कोणताही मुहूर्त पाहिला जात नाही. त्या दिवसांचे इतके महत्त्व आहे. हिंदू कालगणनेनुसार चैत्र हा प्रथम महिना. चित्रा या नक्षत्रावरून या मासात चैत्र हे नाव पडले. या मासातील जी पौर्णिमा ती पौर्णिमा. ‘चित्र’ याचा संस्कृतमधील अर्थ म्हणजे विविधता होय. आंब्याला फुटलेली पालवी म्हणजेच मोहर, हिरवेगार सृष्टिसौंदर्य, कोकिळेचे मधुर गुंजारव, आंब्याचा मोहोर इ. नैसर्गिक सौंदर्यात भर टाकीत असतात.
विजयाचा हा दिवस अगदी 21व्या यांत्रिकी शतकातदेखील सर्वत्र गुढय़ा, तोरणे, ध्वज उभारून गोडधोड खाऊन संपन्न होत असतो. विजयी युद्धाचे उत्स्फूर्त स्वागत करण्याची ही परंपरागत वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. तोच जोश, उन्माद, उत्साह जराही कोठेही कमी नाही.

सीताहरण, द्रौपदीचे वस्त्रहरण इ. सारख्या निंद्य प्रकारांनी घडलेले रामायण-महाभारत युद्ध होण्यास कारणीभूत ठरले आहे. क्षत्रिय कुलोत्पन्न श्रीरामाने दशग्रंथी विद्वान, शिवोपासक रावणाची हत्या केली तरी रामाला त्याचे पाप लागत नाही. कारण त्यांनी हिंसक, निंद्य कृतीचा बीमोड केला होता. हाच श्रीरामाचा सामाजिक न्याय होता. हा सात्त्विक व तामसी वृत्तीचा संग्राम असून सात्त्विकतेवर मिळवलेला विजय होता. मंदोदरीसारखी पतिव्रता पत्नी घरात असूनदेखील दुसऱया विवाहित स्त्राrची अपेक्षा करणाऱया स्त्राrला बलाने, कपटाने फसवून नेणाऱया व कुबुद्धी रावणाला झालेले शासन केव्हाही योग्य ठरते. त्यासाठीच भगवंताने दिलेल्या पूर्ववाचनानुसार श्रीरामाचा अवतार झालेला होता.

आपल्या पूर्वजांनी परंपरागत समाजास सण, उत्सव, दिन साजरे करण्यास सांगितले आहे. त्यामागे कारणमीमांसा व प्रयोजन नक्कीच आहे. हिंदू धर्मात वर्षभर सणवार साजरे केले जातात. त्यामध्ये नुसते गोडधोड खाणे-पिणे, केवळ मौजमजा करणे इतकाच हेतू सीमित नसून त्या तिथीच्या पुण्यस्मरणातून आपण काहीतरी नक्कीच शिकायचे असते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रभू श्रीरामाला प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. तो मर्यादापुरुषोत्तम, पुत्र, पिता, बंधू, पती ,मित्र,राजा या संबंधांतून त्याचा उमटलेला आदर्श प्रत्येकाने समजून घ्यावा व आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वास्तविक त्याचीच गरज आहे. राम मानव अवतार असल्याने सामान्यपणे त्याला शारीरिक दुःखं भोगावी लागली आहेत हे विसरता कामा नये. अर्थात रामाचा आदर्श किती प्रमाणात आचरला जातो हाच मोठा प्रश्न आहे.