
>> रश्मी वारंग
असे फार कमी पदार्थ असतात जे बनवताना फार मोठा तामझाम किंवा वेळही लागत नाही. ऑम्लेट हा या वर्गातील सगळय़ात लोकप्रिय पदार्थ. या ऑम्लेटची ही चवदार गोष्ट.
फ्रेंच शब्द अॅल्युमेलेपासून ‘ऑम्लेट’ शब्द तयार झाला असावा असे म्हटले जाते. त्याचा मूळ लॅटिन भाषेतील अर्थ पसरट भांडे. ऑम्लेटचा आकार पाहता हा मूळ अर्थ साधर्म्य दाखवतो. अंडे हातून फुटले आणि ते वाया जाऊ नये म्हणून उपाय सुचवता सुचवता एखादा पदार्थ गवसला असावा, असे सर्वसाधारणपणे ऑम्लेटच्या बाबतीत म्हणता येईल. फ्रेंच मंडळींना ऑम्लेटच्या पाककृतीचे श्रेय दिले जात असले तरी त्याचे मूळ रोमन असावे अंदाज आहे. रोमन मंडळी मधात अंडी पह्डून पदार्थ बनवत. त्याला ‘ओव्हिमेले’ म्हणत. त्यामुळे ऑम्लेट ‘फ्रेंच की रोमन?’ असा प्रश्न तयार होतो.
जुन्या काळातील दाखल्यांनुसार एक-दोन अंडी वापरून नाही, तर चांगली सात-आठ अंडी वापरून ऑम्लेट बनवले जायचे. अर्थात एका व्यक्तीसाठी नाही, तर पूर्ण कुटुंबासाठी मोठमोठे ऑम्लेट बनवले जाई. गावाकडे, शेतावर काsंबडय़ा राखणाऱया कुटुंबासाठी हा सोयीचा पदार्थ होता. त्यामुळे विशिष्ट नाव मिळालेले नसले तरी घरोघरी ऑम्लेट बनवले जाई. 1700 सालात पाककृती पुस्तकात ‘ऑम्लेट’ हा शब्द आढळतो.
हा पोटभरीचा पदार्थ अमेरिकन, युरोपियन मंडळींचा अतिशय लोकप्रिय नाश्ता आहे. हा पदार्थ नाश्त्याशी कसा जोडला गेला याची एक गोष्ट अशी सांगितली जाते की, दी ग्रेट नेपोलियन बोनापार्ट आपल्या सैन्यासह फ्रेंचच्या दक्षिण भागातून प्रवास करत होता. याच भागातील बिझायर प्रांतात विश्रांतीसाठी तो थांबला. तिथल्या एका स्थानिक खाणावळवाल्याने बोनापार्टला खास ऑम्लेट खाऊ घालून खूश केले. त्या ऑम्लेटची चव नेपोलियनला इतकी आवडली की, त्याने गावातील सगळी अंडी गोळा करण्याचा आदेश सैनिकांना दिला. त्या खूप साऱया अंडय़ांचे भलेमोठ्ठे ऑम्लेट बनवून त्याला सैनिकांना दुसऱया दिवशी सकाळी खाऊ घालायचे होते. ही दंतकथा खरी असो वा नसो, पण आजही फ्रेंचच्या बिझायर प्रांतात वार्षिक उत्सव साजरा केला जातो आणि त्यात मोठमोठी ऑम्लेट्स बनवण्याची प्रथा पाळली जाते. एखाद्या पदार्थाच्या पाककृतीत इतके वैविध्य क्वचितच दिसून येईल. आपल्याकडे शाकाहार, मांसाहाराच्या वर्गवारीत मांसाहार अनेकांसाठी निषिद्ध असला तरी अंडे चालणारे अनेक आढळतात. कमीत कमी साधनांत कमीत कमी वेळेत झटपट तयार होणार पदार्थ म्हणून ऑम्लेट आबालवृद्धांना प्रिय आहे. पांढऱयाशुभ्र बलकावर विराजमान पिवळाजर्द गोळा आणि भुरभुरवलेले मसाले तसेच बाकीचे घटक घेऊन बसलेले ऑम्लेट पोटाची भूक भागवते.
ऑम्लेटचे अगणित प्रकार आहेत. स्पेनमध्ये अंडय़ाच्या जोडीला चक्क बटाटे वापरतात. जपानमधले ऑम्लेट गोलाकार नाही, तर त्रिकोणी आकारात समोर येते. हिंदुस्थानात शक्यतो काsंबडीच्या अंडय़ांपासून ऑम्लेट बनत असले तरी जगभरात बदकासारख्या पक्ष्यांची अंडीही वापरली जातात.
ब्रिटिशांची डिश
आपल्याकडे अर्थात ब्रिटिशांनी ऑम्लेट आणले. आपल्याकडे अंडय़ाच्या पोळय़ा काढल्या जात असणारच, पण त्याला एका सन्माननीय पदार्थाचा दर्जा ब्रिटिश काळात मिळाला असावा. हिंदुस्थानी लोक मसाले अथवा मिरच्या न वापरता हा पदार्थ खाऊच शकत नाहीत. त्यामुळे कांदा, टोमॅटो, मिरची असे अनेक पदार्थ घालून आपले ऑम्लेट सजते. टोमॅटो ऑम्लेट वगैरे शाकाहारींसाठी केलेली सोय, पण ऑम्लेट म्हणजे अंडय़ांचेच. जगभरात विविध पाककृतींनी हा पदार्थ बनतो. ढोबळमानाने अमेरिकन आणि युरोपियन ऑम्लेटमधला फरक बघायचा झाल्यास अमेरिकेत ते खरपूस भाजतात, तर युरोपियन मंडळींना हे मंजूर नाही. युरोपात अंडय़ाचा मऊपणा कायम राखत शक्यतो ते खूप न भाजता खाल्ले जाते.


























































