साहित्य जगत : संमेलनाला जाता येता…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रविप्रकाश कुलकर्णी

अमळनेर साहित्य संमेलन वारीचा अनुभव थोडक्यात सांगताना बरंच काही हाती गवसतंय. अमळनेरला जायचे ठरले ते जव्हारला वळसा घालून. याचे मुख्य कारण आमचे रसिक मित्र सुभाष बोरसे यांनी जव्हारला घर बांधले हे निमित्त. जव्हार संस्थानाचा इतिहास लिहिणारे प्राध्यापक हेमंत मुकणे यांना भेटायचे होते, पण ते बाहेरगावी गेल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. टेबलावरचे पेपर चाळत असताना त्या ढिगामध्ये दिवाळी अंक दिसला. नाव होते ‘जव्हार कालरंग’ हा 26वा दिवाळी अंक. दिवाळी अंक काढणे सोपे काम नाही. अशा वेळी गावपातळीवर ‘जव्हार कालरंग’सारखा दिवाळी अंक 25 वर्षे पूर्ण करून 27व्या वर्षात पदार्पण करतो ही निश्चितच कौतुक करण्याची गोष्ट आहे. म्हणून या अंकाचे संपादक प्रशांत दयानंद मुकणे यांच्याशी संपर्क साधला. ऑफसेट प्रिंटिंगचा व्यवसाय असणारे प्रशांत मुकणे हे दिवाळी अंकाची छपाई करण्यापासून स्वत सगळ्या गोष्टी करतात. त्यांचे लेखकसुद्धा प्राधान्याने पालघर, जव्हार या परिसरातले दिसतात. या अंकात प्रा. डॉ. लक्ष्मण ढवळू टोपले यांचा पालघर जिह्याबद्दल एक लेख आहे, अभ्यासपूर्ण लेख आहे. त्यातील एका गोष्टीकडे लक्ष वेधतो. टोपले सांगतात,

“जव्हारचे त्या वेळचे दिवाण भाऊराव चिपळूणकर यांची कन्या श्रीमती यमुना ऊर्फ माई यांचा विवाह सन 1901 मध्ये स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्याबरोबर झाला. पुढे सावरकरांना अटक झाल्याचे वृत्त समजल्यानंतर त्या वेळच्या रेसिडेंटच्या आदेशावरून चिपळूणकरांचे जव्हारमधील घर व पैसाअडका जप्त झाला आणि 24 तासांत जव्हार सोडून जाण्याचा हुकूम त्यांच्यावर बजावण्यात आला.”

त्यानंतरची माहिती फारशी माहीत नसलेली आहे. सावरकर मार्सेलिस येथे बोटीतून निसटले ही बातमी जव्हारमध्ये ‘ते सुटले’ अशी आली असावी. त्यानिमित्त साखर वाटण्याच्या गुह्याखाली श्री. गुलाबदास रामदास मेहता यांच्यावरही 24 तासांत जव्हार सोडून जावे असा हुकूम आला. जावयाच्या तथाकथित गुह्याचे प्रायश्चित्त त्यांच्या निरपराधी श्वसुरास भोगावे लागले. जव्हारमधला हा एकमेव अंक असावा, असे मी म्हणताच संपादक प्रशांत मुकणे म्हणाले, नाही, ‘कालतरंग’ हा दिवाळी अंक आमच्या अगोदरचा आहे. तो आमचे बंधूच काढतात.

त्याबद्दल मी अधिक माहिती विचारू लागताच प्रशांत म्हणाले की,“त्यांचे आमचे संबंध राहिलेले नाहीत. त्यामुळे त्याबद्दलची माहिती मी देऊ शकत नाही.”
अर्थात मग संदीप मुकणे यांचे घर शोधणे अवघड नव्हतेच, पण तेथे गेल्यावर कळले की, हे मुकणे हल्ली येथे राहत नसून ठाण्याला राहतात. दोन सख्खे भाऊ दोन वेगवेगळे दिवाळी अंक काढतात ही दिवाळी अंकांच्या इतिहासातील एकमेव घटना असणार. म्हणून त्याची नोंद.

जव्हारला मी गेलो होतो म्हणून मला ही घटना कळली. एरवी कशाला कळली असती? तिथेच प्रकाश विश्वासराव नावाचे शेतकरी भेटले. ते आधी मोगऱयाची शेती करत. सध्या ते सोनचाफ्याची आणि हळदीची शेती करतात. त्यांचे वेगळेच अनुभव ऐकताना असे वाटले, यांच्याशी विस्ताराने बोलायला पाहिजे, पण दुसऱया दिवशी अमळनेरला जायचे असल्यामुळे घाई होती. त्यासाठी परत एकदा जव्हारला यायला पाहिजे असे वाटून गेले. धुळ्याला सुभाष बोरसे यांच्या मदतीने घाईगडबडीत भालचंद्र गुजर यांना शोधून काढले. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या मार्लन ब्रांडो पुरवणीत त्यांचा लेख होता! (त्याबद्दल पुन्हा कधीतरी )

अमळनेरला घाईगडबडीत उभ्या उभ्या भेटले त्यामध्ये ज्ञानेश्वर शेंडे हे एक. हे भवरलाल जैन यांचे लेखनिक होते. बोलता बोलता ते म्हणाले, “भवरलाल जैन यांची संसार कहाणी सांगणाऱया ‘तो आणि ती’ (मॅजेस्टिक प्रकाशन) पुस्तकाच्या लाखावर प्रती संपल्या आहेत.”

अमळनेरला केदार मोरेश्वर ब्रह्मे यांना भेटायचं होते. त्यांनी अमळनेरची ओळख करून देणारे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी काही बारीकसारीक नोंदी केल्या आहेत. उदाहरणार्थ, अमळनेर येथे पहिली रिक्षा बाळ देशपांडे यांनी चालवली तो दिवस होता 8 फेब्रुवारी 1976 आणि त्यात बसणारा पहिला प्रवासी होता चंपा लिमये. घाईगडबडीत त्यांना भेटायचे राहिले.

आणखी एक. ‘सत्यकथे’त गणेश कुडे यांच्या उत्तम कविता येत असत. त्यांचे चिरंजीव आणि भावगीतांचे अभ्यासक आणि संग्राहक विजय कुडे यांची भेट झाली, पण ती तुटपुंजी होती. असे बरेच काही परतताना मनात येत राहिले. संमेलन आले आणि गेले, पण या आठवणी कायम लक्षात राहतील म्हणूनच ही अल्प नोंद.