
>>ऋता कळमणकर
अरावली पर्वतांच्या रांगांमध्ये वसलेली सेणा, बेरा ही छोटी छोटी गाव अन् विस्तृत जवाई डॅम येथे दरसाल स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी दिसते, पण बेरा प्रसिद्ध आहे ते मोठमोठे दगडी कातळाचे डोंगर अन् त्यात असलेल्या बिबळ्यांच्या गुहा, त्यात दिवसभर विश्रांती घेऊन बिबळे रात्री शिकारीसाठी बाहेर पडतात. हिवाळ्यात कधीतरी उन्हात उंच कातळावर बसलेले आढळतात. अशा प्रकारच्या अधिवासात बिबळे हे अतिशय क्वचित दिसतात. मानवी वस्तीच्या अगदी आसपास राहणारे बिबळे हे बेराचे वैशिष्टय़.
हिंदुस्थानातील सर्व जंगलांमध्ये बिबळ्या सर्रास दिसतो. दिवसभर दाट झाडीत, कधी झाडावर तर कधी दगडी गुहांमध्ये बेमालूम लपतो, अजिबात नजरेस पडत नाही.
मार्जार कुलातील हा प्राणी अतिशय चपळ, सावध व क्रूर असतो. माकड, हरीण, ससे तसेच गावातील कुत्रे, गुरेढोरे खातो. बिबळ्या स्वतःच्या वजनाच्या दुपट्ट वजनाची शिकार सहज झाडावर ओढून नेतो. अतिशय पट्टीचा पोहणारा हा प्राणी नदीतील मासेदेखील खातो. विविध प्रकारच्या वातावरणात सहज सामावून जातो. मजबूत शरीरयष्टी असते. साधारण नर 100-150 पौंडाचा, तर मादी 80-100 पौंडाची असते. पिवळट सोनेरी अंगावर पोकळ काळे ठिपके, सडपातळ, देखणं शरीर अन् मोठमोठे हिरवे डोळे, लांबलचक वळणदार शेपूट ही याची वैशिष्टय़े. जंगलात आपली टेरिटरी युरिन स्प्रे करून मार्क करतो. आपल्या साम्राज्यात इतर नर बिबळ्या येणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतो. अतिशय तरबेज शिकारी असा हा प्राणी. शरीरावरचे ठिपके वातावरणानुसार गडद फिके असतात. उदा. जास्त पाऊस व घनदाट झाडी. कबिनी, श्रीलंका येथे जास्त गडद रंगाचे तर राजस्थानातील वाळवंटात ठिपके थोडे फिके आढळतात.
आफ्रिकन बिबळ्या हिंदुस्थानी बिबळ्यापेक्षा आकाराने थोडा मोठा असतो, पण रंगाने हिंदुस्थानी बिबळ्या जास्त गडद असतो, अधिक देखणा दिसतो. मादी एका वेळेला 2-4 पिलांना जन्म देते. पिले जन्मतःच आंधळी असतात. दहा दिवसांनंतर हळूहळू डोळे उघडून पाहू लागतात. दीड वर्षापर्यंत आईजवळ राहतात.
बेराच्या डोंगरावर गुहेच्या बाहेर आई आणि पिले पाहायला मिळाली. सकाळी दिवस उजाडायच्या आधी व सायंकाळी उजेड कमी झाल्यावरच हा गुहेतून बाहेर येतो. एका सायंकाळी पूर्ण कुटुंब म्हणजे नर ‘6 बी’, मादी ‘जिवादा’ व दोन पिल्ले सगळेच एकापाठोपाठ बाहेर आले. नर थोडा दूर जाऊन बसला, तर पिल्ले आईच्या आसपास खेळू लागली. डोंगराच्या पायथ्याशी आम्ही कॅमेरे घेऊन उभे होतो. हळूहळू सूर्य पूर्ण अस्ताला गेला. मागे आकाश सोनेरी झालं होतं आणि त्यात एक बच्चा ऐटीत डोंगरावर चालत निघाला. मी अजिबात वेळ न दवडता सिलोऊट घेतलं. परतीची वेळ झाली होती, पण मनात मात्र जिवादा माता अन् तिचे बच्चे घर करून राहिले!




























































