दखल – खुसखुशीत आणि प्रवाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> एस. के. पवार

सिनेपत्रकार म्हणून 35 वर्षांपेक्षा अधिक काळ कारकीर्द केलेल्या पूजा सामंत यांची एकाच वेळी दोन पुस्तके ‘सकाळ प्रकाशन’ने प्रकाशित केली आहेत. यातील एक पुस्तक म्हणजे ‘शेफ्स डायरी.’ हिंदुस्थानातील प्रख्यात बल्लवाचार्य, ज्यांचे मॉडर्न नाव म्हणजे शेफ! इथे पंचतारांकित हॉटेलमध्ये खाद्य संस्कृती नावारूपाला आणणारे नामवंत शेफ या पुस्तकरूपी डायरीत आपला शेफ होण्याचा प्रवास उलगडून दाखवत आहेत. मास्टर शेफ संजीव कपूर यांच्यापासून सुरू झालेली ही ‘शेफ डायरी’ मग आढावा घेते. शेफ झेबा कोहली, नीलेश लिमये, पंकज भदोरिया, प्रशांत साबणे, रणवीर ब्रार, रिशीम सचदेव, विराज शेणॉय, शंतनू गुप्ते, शाझिया खान, शिप्रा खन्ना, संदीप कड, हरपालसिंग सोढी, हिमांशू तनेजा, पराग जोगळेकर, वरुण इनामदार आणि विकास खन्ना असे नामवंत शेफ आपल्या व्यक्तिगत आठवणी आणि करीअरचा प्रवास सांगतात. शेफचा पर्याय करीअर म्हणून हल्ली नावारूपाला येत असला तरी त्याचा म्हणावा तितका प्रचार प्रसार झालेला नाही आणि म्हणूनच पूजा सामंत यांनी सहज, खुसखुशीत शैलीत साधलेला शेफशी संवाद वेगळा ठरतो. पुस्तकाला प्रस्तावना लोकप्रिय रंगभूमी स्टार प्रशांत दामले यांनी लिहिली आहे आणि हेदेखील या पुस्तकाचे एक आकर्षण ठरावे!

ज्येष्ठ सिनेपत्रकार पूजा सामंत यांचे ‘दिलखुलास’ हे पुस्तक म्हणजे नव्या आणि जुन्या-जाणत्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटल्याचा एक सुखद अनुभव! तीन दशकांपेक्षा बॉलीवूडच्या विश्वाचा प्रत्यक्ष सैरसपाटा आणि चंदेरी कलाकारांना भेटून त्यांच्याशी गप्पागोष्टी करत त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न हे पुस्तक म्हणजे एक आल्हादायक सफर आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी केलेल्या गप्पागोष्टी अमिताभला भेटण्याचा आनंद देतात, तर शाहरुख खानच्या लोकप्रियतेचं गमक काय, वरिष्ठ रोमँटिक नायक विश्वजित, परीक्षित साहनी, शबाना आझमी, कंवलजित सिंग, गुलशन ग्रोव्हर, अनिता राज, कल्पना अय्यर, पद्मिनी कोल्हापुरे, अनु अगरवाल, परमित सेठी, विद्या बालन आणि तापसी पन्नू आणि विद्या बालन अशा सिताऱयांच्या मांदियाळीत त्यांचं मेकअपविरहित हे रूप, त्यांच्या गप्पा अचंबित करतं. अलीकडे स्टार्सना त्यांच्या प्रमोशनल इंटरह्यूजच्या निमित्ताने टीव्हीवर पाहण्याची सवय जडली असताना त्यांच्या या ऑफबीट गप्पा वेगळ्या वाटतात.

प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी ‘दिलखुलास’(संवाद बॉलीवूडमधल्या जुन्या-नव्या कलाकारांशी!) याला प्रस्तावना दिली आहे हीदेखील पुस्तकाची एक जमेची बाजू. मुलाखती रटाळ न वाटता त्या प्रवाही कशा असाव्यात यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचावे असेच आहे.