‘पिशवी’सूत्र…

332

>> समीर गायकवाड

पिशवी… मध्यमवर्गीय दैनंदिन जीवनशैलीत आताशा पिशवीला महत्त्वाचं स्थान मिळत आहे. याचे कारण म्हणजे प्लास्टिक पिशवी हद्दपार करण्याबाबत नव्याने आखलेले नियम. मात्र हे नियम होण्याआधीही पिशवी तिचं स्थन टिकवून होतीच. कधी नाजूक भरतकाम मिरवणारी तर कधी पॅचवर्कचा डौल दर्शवणाऱया पिशवीचा हा शब्दप्रवास.

खरं तर पिशवीचा संबंध मानवी जीवनाशी जन्माआधी आणि जन्मानंतरही येतो. जन्म होण्याआधी गर्भाशयाच्या पिशवीत नऊ महिने काढावे लागतात तर मृत्यूनंतर मर्तिकाचे सामान एका पिशवीवजा गाठोडय़ातून आणले जाते. पिशवीचा प्रवास असा प्रारंभापासून अंतापर्यंत प्रत्येकाची सोबत करतो. पिशवीच्या जगात नुकताच एक प्रलय येऊन गेला तो म्हणजे प्लॅस्टिक पिशवीवरील बंदी. या प्लॅस्टिक पिशवीने अलीकडील काळात आपलं आयुष्य पुरतं व्यापून टाकलेलं होतं.

खरं तर मानवी जीवनात पिशवीचा उगम कधी झाला असावा ही माहितीदेखील रंजक असणार आहे. तो मानववंश शास्त्रज्ञांचा प्रांत आहे. उक्रांतीच्या पहिल्या टप्प्यातील मानवाच्या इतिहासापर्यंत मागे गेले की अनेक गोष्टींचा सुगावा लागतो. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा माणूस शिकारीच्या साधनांसह अन्नासाठी मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर करत होता. या मानवाकडे शिकारीसाठीची एक काठी होती जिला त्याने धाग्यासारखी एक तत्सम गोष्ट गुंडाळली होती. या मानवाने स्वतःभोवती प्राण्यांची फर गुंडाळली होती. या दोन गोष्टी आपल्याला पिशवीच्या इतिहासासाठी पुरेशा आहेत.

अश्मयुगातील मानव जेंव्हा ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळवण्यासाठी गुहेत राहू लागला तेंव्हा त्याला शिकार करून आणलेल्या प्राण्याचे कातडे ऊब देते हे कळले असणार आणि त्या कातडय़ात त्याने काही वस्तू गोळा करून ठेवल्या असणार ते मानवी इतिहासातल्या थैलीचे प्राथमिक स्वरूप असणार. प्राण्यांच्या आतडीचा त्याने दोरीसारखा वापर केला. दगडी दाभण तयार केले आणि प्राण्यांच्या चामडीची रीतसर थैली बनवली. या थैलीची पुढे अनेक स्थित्यंतरे होत गेली. चुंगडं, पोतं, पिशवी आणि आताची कॅरी बॅग हे ढोबळ मासले. एकेकाळी थैलीतून सोन्याच्या मोहरा वाहिल्या जात तीच थैली इतकी आकसत गेली की तिची पानाची चंची झाली. तिला दोन दोरखंड लागले आणि तिची पिशवी झाली. खरं तर मनुष्याच्या देहातच पित्ताशयाची आणि मूत्राशयाची अशा दोन पिशव्याच असतात. स्त्रियांत एक जास्त ती म्हणजे गर्भाशयाची. ग्रामीण भागातील स्त्राrच्या संभाषणात गर्भाशयाचा थेट उल्लेख न करता पिशवी असाच केला जातो. तर ही पिशवी अशी आपल्या परिचयाची वस्तू आहे. एकेकाळी पिशव्यांचे फार नखरे असत, नाना आकाराच्या आणि नाना तऱहेच्या पिशव्या असत.

सर्वांच्या परिचयाची पिशवी म्हणजे नायलॉनच्या जाड हूक्सने बनवलेली बास्केट. ही बास्केट जाळीदार असे. त्यामुळे आतल्या वस्तू बाहेरून दिसत. आम्ही आज काय आणलंय बघा असं म्हणत समोरच्याला टुकटुक माकड करायची खोड असणाऱया शोबाज लोकांना ही बास्केट घेऊन खरेदीला जाणे म्हणजे पर्वणी असे. एक पिशवी असायची मांजरपाटाची. आता या कापडाचे नाव मांजरपाट असे होते, पण प्रत्यक्षात मार्जार योनीशी त्याचा दुरान्वयानेही संबंध नव्हता. काहींच्या मते लोकमान्य टिळकांच्या काळात परदेशी कापडांच्या होळय़ा पेटवल्या जात तेंव्हा अशा प्रकारचे कापड मँचेस्टरहून येत असावे. ‘मँचेस्टर क्लॉथ’ या शब्दाचा ‘मांजरपाट’ असा अपभ्रंश झाला आणि नंतरच्या काळात ते कापड मुंबईतल्या गिरण्यांमध्ये विणले जाऊ लागले. या कापडाचे आधी शर्ट नंतर चड्डय़ा शिवल्या जात आणि ते वापरून त्याचा पार लगदा झाल्यावर त्याच्या पिशव्या बनत. काहींच्या मते मांजरपाट म्हणजे दक्षिणेकडील एक शहर मद्रीपोलम येथील जाडय़ाभरडय़ा कापडाची एक जात होय. याला तिकडे मांदरपाट असे म्हणतात. मांजरपाटाच्या या पिशव्या घेऊन बाजारात फिरायला कमालीची लाज वाटे. याहून वाईट अवस्था गोणपाटाच्या पिशवीची असे.

ताग हा शब्द कसा दाढी वाढलेल्या माणसासारखा वाटतो नाही का आणि ज्यूट म्हटलं की कसं सफाचट तुकतुकीत चेहरा असल्यासारखं वाटतं. तर या ज्यूटपासून गोणपाट बनवले जाई. मराठीत याला अंबाडी, तागी अशी रुक्ष नावे आहेत. याचेच पुढे बारदान बनवले जाऊ लागले. म्हणजे खत, बियाणे, धान्य इत्यादींच्या पिशव्या. मागच्या दशकात या गोणपाटाची जागा प्लॅस्टिकमिश्रित पॉलिइथेनॉलच्या पोत्यांनी घेतली आणि त्याच्या रिकाम्या पोत्यांच्याही पिशव्या बनू लागल्या. या पिशव्यांना एक विशिष्ट वास असे जो काही केल्या जात नसे. या सर्व पिशव्यांचे पुढे तरट बनत असे. सरते शेवटी ते दाराबाहेर येत असे. देशी डोअरमॅट म्हणून त्याचा वापर होई. या सर्व प्रकारातील पिशव्या अत्यंत बेढब, वजनदार वस्तूंनी मान पाठ वाकवणाऱया आणि फाटता फाटत नसलेल्या असत. तर काही पिशव्या अत्यंत देखण्या आकर्षक असत, जणू एखाद्या कमनीय शोडषेचा आकार त्यांना लाभलेला असे. मखमली पिशव्या, हिऱयाच्या पुरचुंडय़ा ठेवण्यासाठीच्या वेल्वेटच्या मऊसूत पिशव्या, सुती कापडी पिशव्या यांना सोडून घरात लग्नाला आलेल्या मुलीने भरतकाम केलेल्या पिशव्या हा एक प्रकार असे.

आणखी एक पिशवी आठवडा बाजारात आवर्जून दिसे ती म्हणजे त्रिकोणी-चौकोनी रेषांचे वीणकाम केलेल्या पांढऱया लाल जाड कापडी पिशव्या. बाळाच्या टकुज्याला याच कापडाचा वापर होई. जोडीला त्याच्या आई वा आज्जीच्या इरकली चोळीचे तुकडे जोडलेले असत. या पिशवीत काहीही कितीही कोंबले तरी ती द्रौपदीच्या थाळीसारखी थोडी जागा शिल्लकच राखे. या पिशव्यांच्या जगात ब्रीफकेस, सुटकेस, होल्डॉल, हॅवरसॅक, बॅकपॅक यांची घुसखोरी होत गेली आणि अनेक पिशव्यांचे रंगरूप बदलत गेले. पोतडी, बटवा, ऍटॅची ही रूपे तर इतिहासजमा झाली. माहेरहून येणारी शिदोरीही मोठाल्या पिशवीत येई. पिशवीतून बाजार आणल्याशिवाय खरेदी केल्याचे फीलिंग येत नाही. आजकालच्या ऑनलाइन शॉपिंगमध्ये पिशवीतल्या खरेदीची ती मजा मिळत नाही. दाढीचे खुंट वाढवून फिरणाऱया लेखकांच्या खांद्यावर रुळणारी शबनम बॅग ही तर त्यांची ओळख झाली होती. महिला मंडळीच्या खांद्यावर लटकणाऱया विविध रंगांच्या आणि आकारांच्या पर्सेस हादेखील असाच एक जिव्हाळय़ाचा विषय. काही पिशव्या मात्र कष्टदायी असत, घरातील कामवाल्या माणसाच्या हातात दिलेल्या वा एखाद्या ओझे वाहण्याच्या कामावरील मजुराच्या हातातील भारी भक्कम वजनाच्या पिशव्या वाहणाऱया लोकांचे घामट, मळकट हात त्या पिशव्यांना लागलेले असत आणि त्या श्रमजिवी देहाचे त्या पिशवीशी नातं तयार झालेलं असे.

आता सरकारने प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आणली आहे ती थोडीशी त्रासदायक आहे, पण दीर्घकालीन परिणाम पाहू जाता समाजाच्या हिताचीच आहे. 12 जुलै हा दिवस ‘जागतिक पेपर बॅग दिवस’ म्हणून साजरा होतो. 12 जुलै 1852 मध्ये फ्रान्सिस ओलेने पहिली कागदी पिशवी बनवली होती आणि त्यात सुधारणा करत 1870 मध्ये मार्गारेट किंग यांनी किराणा नेता येईल अशी कागदी पिशवी बनवली होती म्हणजे दीडशे वर्षे झाली. पाश्चात्य जग आजही कागदी पिशव्या वापरते आहे आणि आपण अजूनही त्यांना मनापासून स्वीकारलं नाही. याने आपण आपलं आणि पर्यावरणाचे अपरिमित नुकसान केलं आहे. आता हा हट्ट आपण सोडून द्यायला पाहिजे आणि कापडी वा कागदी पिशवीचा वापर केला पाहिजे.

व. पु. काळे यांच्या ‘सांगे वडिलांची कीर्ती’ या पुस्तकात एक उतारा आहे. तो इथे उद्धृत करतो.

‘यावरून एक गंमत आठवली. अण्णांचा संसार म्हणजे एक पिशवी. त्या पिशवीत कॅश सर्टिफिकेटच्या स्वरूपात थोडीशी भविष्यकाळची तरतूद, स्वतःच्या 1908 सालापासून लिहिलेल्या डायऱया. गेल्या पंचावन्न वर्षांतला त्यांच्या जीवनाचा इतिहास पानापानात अक्षररूप झाला आहे. पंचावन्न वर्षे ते दैनंदिनी लिहीत आहेत, अजून लिहितात.

कधी विषय निघाला तर ते म्हणतात, ‘काही कमीजास्त घडलं तर एवढी पिशवी मी उचलणार आणि पळणार… तुम्ही सगळीकडे धावत म्हणाल मी हे घेऊ का ते घेऊ?’ अण्णांना लाभलेल्या या पिशवीसारखी एक पिशवी जगातल्या प्रत्येक माणसास लाभो आणि त्याला तिचा आणि जीवनाचा खरा अर्थ कळो हेच ‘पिशवीसूत्र’ होय!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या