शंभर वर्षांपूर्वीच्या ठाण्यात

18

>>संदीप विचारे

ठाणे’ झपाटय़ाने विकसित होणारे महानगर. उंच उंच इमारती, भव्य मॉल, मोठे रस्ते, पूल, सॅटिस यांनी ठाण्याच्या विकासात भर टाकली आहे, पण एकेकाळी शिलाहारांची राजधानी असलेले श्रीस्थानक म्हणजे आताचे ठाणे आपली वैभवशाली ऐतिहासिक ओळख विसरत चालले आहे. शिलाहार, बिंब, मुस्लिम नायटे राजे, पोर्तुगीज, मराठे व इंग्रज अशा राजवटी ठाण्यात नांदल्या. या राजवटींच्या पाऊलखुणा आजही ठाण्यात आढळतात, पण खासकरून पोर्तुगीज, मराठे व इंग्रज राजवटीतील इमारती, वाडे, किल्ले, कोट ठाण्यात कालपरवापर्यंत होते, पण सर्वभक्षी काळाच्या पुढे जाऊन मानवांनीच ते विकासाच्या नावाखाली नष्ट केले हे आपले दुर्दैव.

ठाण्यातील आताच्या अशोक टॉकीज – स्टेशन रोड ते सेंट जेम्स चर्च – सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात फेरफटका मारला तर शंभर वर्षांपूर्वीचे ठाणे आपल्या नजरेस पडते. एस.टी. स्टॅण्ड आणि ठाणे रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या अशोक टॉकीजमध्ये शंभर वर्षांपूर्वी तमाशे आणि लोकनाटय़े होत. तेव्हा ते पत्र्याचे होते. रंगीत ‘मुघल-ए-आझम’ हा सिनेमा अशोक टॉकीजमध्ये लोकांना फुकट दाखवला होता असे जुनेजाणते सांगतात. अशोक टॉकीजच्या शेजारील गल्लीत असलेले दत्तमंदिर असेच जुने असून समर्थ स्वामी शिष्य श्री आनंद भारती महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आले आहे. इतर देवळांपेक्षा इमारतवजा दिसणारे दत्तमंदिर बघून स्टेशन रोडने मामलेदार किंवा तहसीलदार कार्यालयाकडे निघालो की, उजवीकडे कन्या शाळेची इमारत आहे. टेंभी नाक्यावर वाडिया हॉस्पिटलशेजारी 1821 साली ठाण्यातील पहिली मुलींची शाळा सुरू झाली. स्टेशन रोडवर प्रभात टॉकीजसमोर असलेली बी. जे. हायस्कूल तिचीच एक शाखा. ती 1941 साली सुरू करण्यात आली. आता ती जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहे. या शाळेला लागूनच एकशे पंचवीस वर्षांची सांस्कृतिक परंपरा असलेली मराठी ग्रंथसंग्रहालयाची इमारत आहे. 1893 ला खारकर आळीत वि. ल. भावे यांच्या अरुणोदय प्रेसमध्ये सुरू झालेले हे संग्रहालय महाराष्ट्रातील पहिले मराठी वाचनालय. नंतर स्टेशन रोडवर 1939 साली वाचनालयाची नूतन वास्तू उभारण्यात आली. लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, वि. का. राजवाडे अशा बऱयाच मान्यवरांनी या इमारतीला भेटी दिल्या आहेत. टेंभी नाक्यावरील नगर वाचन मंदिर हे म्युलक या इंग्रज अधिकाऱयाने सुरू केले. या दोन वाचनालयांनी ठाण्याची वाचनाची सांस्कृतिक भूक भागवली.

या वाचनालयाच्या पुढे स्टेशन रोडवर जिथे आता तहसीलदार कार्यालय आहे, तिथे पेशव्यांचे सरदार रामजी महादेव बिवलकर यांनी बांधलेला हिराकोट म्हणजे किल्ला होता. शेजारी जिथे ठाणे नगरपालिकेची 1862 मधील इमारत होती. तिथे घोडय़ाचा पागा होता. इंग्रजांनी पुढे हिराकोटाचे डायमंड फोर्ट असे नामांतर केले. त्यात कैदी ठेवले जात. हिराकोटाच्या बाहेर ज्या आंब्याला इंग्रज लोक स्वातंत्र्य सैनिकांना जाहीररीत्या फाशी देत त्यास फाशीचा आंबा म्हणत. स्वा. सैनिक राघूजी भांगरे यांना इंग्रजांनी इथे फासावर लटकवले होते. पुढे उजव्या हाताला 1826 मधील पंडित यांचे विठ्ठल मंदिर आहे. त्याच्यासमोर हजार वर्षांपूर्वीचे शिलाहारकालीन कोपिनेश्वर मंदिर आहे. यातील भव्य नंदी व पिंडी आवर्जून पाहण्याजोगी. मंदिराच्या आवारात बुधाजी नाईक यांच्या पत्नीचे सती वृंदावन आहे. त्या बुधाजी नाईकांच्या मृत्यूनंतर 1846 साली सती गेल्या. पुढे जांभळी नाक्यावर पेढय़ा मारुती व मांदार गणेशाची मंदिरे आहेत.

आता जिथे जिल्हाधिकारी कार्यालय आहे तिथे बुधाजी नाईक यांचा वाडा होता. त्याच्या समोर जिथे कोर्ट आहे तिथे सुभेदार बिवलकरांचा वाडा होता. शेजारी पोर्तुगीजकालीन इमारत होती. आता त्या पाडून कोर्ट व जिल्हाधिकारी कार्यालय उभारलंय. सिव्हिल हॉस्पिटलजवळील पोस्ट ऑफिस, अग्यारी, टाऊन हॉल, 1825 मधील इंग्रजांनी बांधलेले सेंट जेम्स चर्च आणि सेंट अंतोनी याने ठाण्यातील देवळे पाडून उभारलेले 1540 मधील सेंट जॉन बॅप्टिस्ट चर्च असा तीन तासांचा हेरिटेज वॉक आपण करू शकतो. ‘स्वत्व’ वॉकर्स आणि सदाशिव टेटविलकरांमुळे आम्ही हा वॉक केला. तुम्हीही हा वॉक करून शंभर वर्षांपूर्वीचे ठाणे अनभवू शकता.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या