हिरवा निसर्ग हा भवतीने….

319

>> संदीप विचारे

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातला बेभान करणारा वारा, मुक्त कोसळणारे धबधबे आणि हिरव्यागार चिंब डोंगररांगांचं आगळं सौंदर्य टिपण्यासाठी या पावसाळ्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये भटकंती करायलाच हवी.

मुंबई, पुणे आणि नाशिक येथील भटके तसे भाग्यवानच! कारण या शहरांना स्पर्श करून जाते सहय़ाद्रीची अभेद्य रांग. धो-धो कोसळणारा पाऊस सतत सहय़ाद्रीवर कोसळत असतो आणि कित्येक जलप्रपात त्याच्या अंगाखांद्यावर उडय़ा घेत अरबी समुद्राला मिळत असतात. या वेळी मुंबई-पुण्याजवळील बोरघाटाचा नजारा काही औरच असतो. खंडाळा-लोणावळा ही बोरघाटातील मुख्य गावे या वेळी पाऊस अनुभवण्यासाठी आलेल्या भटक्यांनी गजबजून जातात. पुराण पुरुष ‘लोहगड’ ठाण मांडून बसलाय! आज आपण त्याच्या सोबतीने हिरव्या निसर्गाची भटकंती करणार आहोत.

मुंबईतून पहाटे लवकर निघून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील कामशेत गाठायचे. वाटेत लोणावळय़ातील ‘मनशक्ती’मध्ये पोटभर नाश्ता करायचा. कामशेतच्या उजवीकडील फाटा काळे कॉलनी/पवनानगरकडे जातो. या रस्त्याला लागायचे. ऊन-पावसाचा खेळ सुरू असतो आणि उजवीकडील बेडसा लेण्यांच्या डोंगरावरून एक भला मोठा जलप्रपात कोसळताना पाहून आपला प्रवास नक्की हिरव्या निसर्गाच्या साथीने होणार याची ग्वाही देत असतो. पुढे उजवीकडील फाटा दुधीवरे खिंडीकडे जातो. एक छोटा घाट चढून आपण थोडय़ा उंचीवर येतो आणि दृष्टीस पडतो पवना जलाशय! या पवना जलाशयात तुंग आणि तिकोना हे किल्ले आपले पाय सोडून शांतपणे आजूबाजूचा हिरवा निसर्ग पाहताना दिसतात! आज जरी तुंग, तिकोना, पवन मावळ शांत दिसत असले तरी साडेतीनशे वर्षांपूर्वी याच बारा मावळातील गरीब पण शूर मावळय़ांनी शिवछत्रपतींना मोलाची साथ दिली. याच पवनगंगेनी मावळय़ांना आणि भीमथडीच्या तट्टांना स्वातंत्र्याचे अमृत पाजले आणि हीच भीमथडी तट्ट नर्मदा, यमुना ओलांडून अटकेपार गेली!

मावळच्या ग दरीत झुलतो शिवबाचा पाळणा
खुणावतो बाळास तुंग, तिकोना, कोंडाणा, खेळणा!

‘जाणता राजा’ या महानाटय़ातील पाळणा गुणगुणत दुधीवरे खिंड ओलांडून आपण लोहगडाच्या माचीवर पोहोचतो. दुधीवरे गावात ह.प.भ. बाबामहाराज सातारकर यांनी उभारलेले श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. लोहगडाच्या माचीपर्यंत पक्का डांबरी रस्ता आहे. इथे नाश्ता/जेवणाची सोय होऊ शकते.

पक्क्या दगडी पायऱयांनी लोहगड चढण्यास सुरुवात करावी. वरून कोसळणारा पाऊस, धुकं आणि धुक्याचा पडदा दूर होताच खाली दिसणारी लोहगडवाडी (माची), हिरवी शेत पाहात गड चढावा. नारायण, गणेश, हनुमान असे दरवाजे ओलांडून आपण गडावर पोहोचतो. वरही धुक्याचं साम्राज्य असते. सदर ओलांडून अष्टकोनी तळय़ाजवळ असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेवाच्या छोटेखानी मंदिरापाशी येऊन आपण विसावतो. धुक्याच्या धुसर प्रकाशात दोन-सवा दोन वर्षांचा हा पुराणपुरुष आपणास इतिहासात घेऊन जातो. बोरघाटाचा संरक्षक लोहगड. सुरतेहून श्री शिवछत्रपतींनी लुटून आणलेली धनलक्ष्मी पाहणारा लोहगड. लोयश ऋषींची तपोभूमी लोहगड आणि इंग्रज-मराठे युद्धात इंग्रजांना सहज मिळालेला लोहगड!

पावसात लोहगडाचा हिरवा निसर्ग ऐन बहारात असतो. विंचूकाटा व इतर ठिकाण फिरताना जपून फिरावं. आपल्या पूर्वजांचे घाम आणि रक्त या लोहगडाच्या मातीत मिसळलेय याचं भान ठेवूनच गड फिरावा. सोबतच्या पर्यटकांना/भटक्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

हिरवा निसर्ग, आपला इतिहास मनात साठवत लोहगड उतरावा. दुधीवरे खिंडीमार्गे कामशेत अथवा लोणावळय़ास जावे. लोहगडवाडीतून एक रस्ता लोहगड-विसापूरच्या खिंडीतून भाजे-मळवली मार्गे मुंबई-पुण्या रस्त्याला मिळतो. इथं भाजे गावात थांबून आपण भाजेलेणी व दोन छोटय़ा जलप्रपातात भिजण्याचा आनंद घेऊ शकतो! इतिहास-भूगोलाला कवेत घेणारी ही भटकंती आपण मुंबई-पुण्याहून सहज करू शकता!

हिरवा निसर्ग हा भवतीने
इतिहासाचे गीत गा रे
सफर करा मस्तीने!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या