रंगभूमी – निनादचा सुवर्णमहोत्सव

>> संजय कुळकर्णी

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या रंगकर्मींनी स्थापन केलेली निनाद ही हौशी रंगकर्मींची नाटय़संस्था. या संस्थेला नुकतीच 50 वर्षे पूर्ण झाली. प्रायोगिक नाटय़ चळवळ बहरावी म्हणून आकारास आलेल्या संस्थेने अनेक रंगकर्मी घडवले.

50 वर्षांपूर्वी नाटकाच्या हौसेपोटी संस्थेचा जन्म होतो. बारसे होऊन नाव ‘निनाद’ ठेवलं जातं. त्यानंतर ते नाव हौशी रंगभूमीवर नावाप्रमाणे निनादतं. 50 वर्षे ते हौशी रंगकर्मीत घुमतं राहतं. यश पचविण्याची ताकद ही असावी लागते. ती ‘निनाद’च्या प्रत्येक रंगकर्मीत होती, आहे आणि यापुढं असणारं आहे. आंब्याचं कलम लावलं की, लगेच त्याला आंबे येत नाहीत. तसेच ‘निनाद’चं आहे. 50 वर्षांपूर्वी त्याचं बी पेरलं गेलं आणि 50 वर्षांत त्याचा वटवृक्ष झाला. त्याची मुळं तिसऱया पिढीपर्यंत रुजली गेली आणि आज त्याचा अभिमान त्यांना वाटत नक्कीच असेल. म्हणूनच एखाद्या हौशी संस्थेला 50 वर्षे पूर्ण होतात त्या वेळी संस्थेतून नाटय़ चळवळ केलेल्या, व्यावसायिक रंगभूमीवर त्या संस्थेचा पांगूळगाडा वापरून यश संपादन केलेल्या रंगकर्मींना आपल्या संस्थेबद्दल जेव्हा अभिमान वाटतो आणि म्हणूनच ते रंगकर्मी त्याचे ऋण म्हणून पन्नासावा वर्धापनदिन साजरा करतात तेव्हा ते कौतुकास पात्र ठरतात. ‘निनाद’ या संस्थेने 50 वर्षे पूर्ण केली आणि त्याचा सोहळा शनिवार 12 नोव्हेंबरला रवींद्र नाटय़ मंदिरात कुठलाही गाजावाजा न करता साधेपणाने नाही, तर कर्तव्यापोटी साजरा झाला. आपल्या पितृवात्सल्याची जाण ठेवून आपल्या गुरुजनांना व्यासपीठावर बोलावून त्यांच्यामार्फत मान्यवरांच्या सत्काराचे औचित्य साधून त्या सोहळ्यास आठवणींचा शिडकाव व्हावा तसा तो सोहळा झाला नसेल कशावरून? जे रंगकर्मी – मग ते ‘निनाद’चे असोत की त्यांचे हितचिंतक असोत – सर्वांना त्या दिवशी भेटल्यावर जुन्या स्मृती आठवल्या असतील. संस्थेतून जी नाटकं केली, ज्या एकांकिका केल्या गेल्या, ज्यांना ज्यांना पारितोषिकं मिळाली, पण ज्यांना नाही मिळाली त्या सर्वांना एकच अभिमान वाटला असेल की, आपण ‘निनाद’ संस्थेबरोबर एकनिष्ठ होतो. ‘निनाद’चे त्या काळी एक कुटुंब होतं, आजही आहे आणि यापुढेदेखील असणार आहे.

‘निनाद’ या संस्थेची निर्मिती मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी करणाऱया रंगकर्मींनी केली. उद्दिष्ट एकच की, मुंबईत होणाऱया नाटय़ स्पर्धेत भाग घेण्यासाठी रंगकर्मींना एक व्यासपीठ मिळावं. बीपीटीमध्ये राहून राज्य नाटय़ स्पर्धेत त्यांना भाग घेता येत होता, पण त्या काळी सुरू झालेली प्रायोगिक चळवळ बहरावी म्हणूनदेखील ‘निनाद’ची स्थापना झाली असेल. विजय मोंडकर, प्रकाश गद्रे आणि जयवंत देसाई यांनी पुढाकार घेतला आणि कालांतराने ‘निनाद’चा वटवृक्ष झाला. तो बहरत गेला तो केवळ त्यांच्या असलेल्या सभासदांमुळेच. विजय मोंडकर, जयंत पवार, सुधाकर कानडे, तुलसी बेहेरे आणि प्रेमानंद गज्वी हे एकांकिका लिहिणारे लेखक नाटककार झाले. व्यावसायिक रंगभूमीला त्यानिमित्ताने नाटककार मिळाले. मंगेश कदम, रघुनाथ मिरगळ, जयवंत देसाई, हेमंत भालेकर, अनिल गवस, प्रदीप पाटील, श्याम अधटराव, वसंत आंजर्लेकर, विलास सावंत, सुनील रानडे, हृदयनाथ राणे, गौतम कोळी, पूजा सावंत, नंदू सावंत, मेधा मटकर, सुप्रिया पाठारे इत्यादी रंगकर्मी आज या घडीला नाटकाच्या सादरीकरणाच्या प्रत्येक घटकात आपली मुशाफिरी दादागिरीने करताना दिसले आणि करताहेत. ती मंडळी ‘निनाद’ संस्थेस त्याचं क्रेडिट देतात. तरीही विजय मोंडकर या लेखकावर व्यावसायिक रंगभूमीवरील निर्मात्यांनी जो अन्याय केला, त्याबद्दल दुःख निश्चितच आहे. ‘कलावैभव’च्या मोहन तोंडवळकर या ज्येष्ठ निर्मात्याने त्यांचे वंश हे नाटक ‘पाऊलखुणा’ या नावानं व्यावसायिक रंगभूमीवर आणलं, परंतु आमच्या काही मित्रांनी त्यावर नाना प्रक्रारे टीका केल्याने त्या लेखकाला व्यावसायिक रंगभूमीवरून रिटायर्ड व्हावं लागलं. विजय मोंडकर या लेखकात स्पार्क होता, परंतु त्या काळी एक लॉबी होती आणि त्या लॉबीत टिकणं फारच कठीण होतं. तरीही त्यानंतर मेंडकर राज्य स्पर्धेसाठी नाटकं करीत राहिले हे विशेष. आज ‘निनाद’चे रंगकर्मी अजूनही आमच्यातील कलागुणांना ‘निनाद’मुळेच वाव मिळाला आणि तो बहरला असं सांगतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू मी स्वतः न्याहाळलेत. जी संस्था 50 वर्षांत प्रसिद्धीविना एवढं कार्य करते त्या संस्थेस सॅल्यूट!

हे सर्व लिहिण्यामागचं कारण एकच की, त्या संस्थेची प्रदीर्घ वाटचाल मी अनुभवली आहे. कारण माझी ‘आराधना’ आणि नंतरची ‘शब्दरंग’ संस्था ‘निनाद’च्या प्रत्येक एकांकिकेबरोबर स्पर्धा करायची. आमची ‘काळ्या बंबाळ अंधारी’ आणि त्यांची ‘घोटभर पाणी’ या एकांकिकेत तुल्यबळ स्पर्धा असायची. कधी आम्हाला प्रथम तर कधी त्यांना प्रथम पारितोषिक मिळत असे. त्या वेळी त्यांच्याकडून जो आम्हाला टाळ्यांचा प्रतिसाद मिळतं असे तो अजूनही आठवतोय. त्या काळी राज्य स्पर्धा ऐन बहरात होती. आविष्कार. बहुरूपी, अभिव्यक्ती, सूत्रधार, उदय कला केंद्र इत्यादी संस्थांबरोबर नाटकांची स्पर्धा असायची. त्या स्पर्धेतसुद्धा त्यांची नाटकं इतरांबरोबर स्पर्धा करायची. त्यांच्या रंगकर्मींनी पारितोषिकं संपादन केली. 50 व्या वर्धापनदिन सोहळ्याबाबत हेमंत भालेकर बरोबर म्हणाले, ‘निनाद’चा 50 वा वर्धापनदिन साजरा करू या हे सर्वांना मनापासून वाटतं होते. कारण ‘निनाद’ने प्रत्येक सदस्याला भरभरून दिलं. आमचे सदस्य आज प्रत्येक कलाक्षेत्रात भक्कम उभे आहेत. त्यामुळे मंडळींनी अथक मेहनत घेऊन या कार्यक्रमाची आखणी केली. त्यास मूर्त स्वरूप मिळालं ते शनिवार 12 नोव्हेंबर या दिवशी. हा सोहळा अनौपचारिक करायचा हे ठरल्यानंतर ‘निनाद’च्या कला प्रवासात भेटलेल्या, ‘निनाद’साठी उभे राहिलेल्या सर्व व्यक्तींना सामावून घेणं आणि त्यांचा सत्कार करण्याचं ठरलं. तो त्या दिवशी केला गेला. ‘निनाद’चे काही सदस्य आज हयात नाहीत, त्यांच्या परिवाराचा सत्कार केला गेला. सन्मानपत्र व शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ‘निनाद’चे संस्थापक विजय मोंडकर, जयवंत देसाई, प्रकाश गद्रे, दत्ताजी तायडे आणि 99 व्या नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष, ‘निनाद’चे सदस्य प्रेमानंद गज्वी यांचा सत्कार करण्यात आला. असा हा आगळावेगळा पन्नासावा वर्धापनदिन गतकाळातील आठवणींना उजाळा देत ‘निनाद’प्रेमींच्या सहकार्यानं खेळीमेळीच्या वातावरणात पु. ल. देशपांडे अकादमी नाटय़गृहात साजरा झाला. हा सोहळा अनेक संस्थांना स्फूर्ती देऊन जाणार यात शंकाच नाही.

 [email protected]