
>> संताजीराव जेधे
देशाच्या स्वातंत्र्य लढय़ातील अग्रणी, सत्यशोधक चळवळीचे खंदे पाठीराखे, बहुजन समाजाची सर्वांगीण उन्नती आणि शेतकरी-कामकरी यांचे हित या एकाच ध्येयपूर्तीसाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, त्याच उद्देशाने ज्यांनी आपले राजकारण, समाजकारण केले, अशा ‘देशभक्त’ केशवराव जेधे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाची सुरुवात 21 एप्रिल 2021 पासून झाली. त्यानिमित्त केशवरावांच्या कार्यकर्तृत्वाचे हे स्मरण….
केशवराव जेधे ही एक व्यक्ती नव्हती, तर तत्कालीन महाराष्ट्रातील ती एक मोठी संस्थाच होती. 17-18 वर्षे वयाचे तरुण केशवराव घरच्याच उद्योगात मग्न झाले असते तर त्यांना कोणी नावे ठेवली नसती, पण त्यांनी व त्यांच्या मोठय़ा तिन्ही बंधूंनी तसे केले नाही. घरचा उद्योग सांभाळत हे चारही जेधे बंधू समाजकारण, शिक्षणकारण करत राहिले. त्यातही केशवराव अधिक. कारण ते राजकारणात शिरले. तिथे राहूनही त्यांनी तरुणपणी धरलेली बहुजन समाजाच्या उद्धाराची कास कधी सोडली नाही. महाराष्ट्र काँग्रेसचे ते दोनवेळा अध्यक्ष झाले, खासदार झाले. त्याशिवाय अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली, पण वैयक्तिक स्वार्थ त्यांना कधीही शिवला नाही. बहुजन समाजाची शैक्षणिक, वैचारिक, आर्थिक उन्नती, शेतकऱयांचे हित यातच त्यांचे सगळे राजकारण, समाजकारण सामावले होते. आयुष्याचा सर्व काळ त्यांनी त्यासाठीच व्यतीत केला. ‘देशभक्त’ ही पदवी त्यांना लोकांनी त्यातूनच स्वयंस्फूर्तीने दिली.
केशवरावांचे सामाजिक योगदान लक्षात घेताना त्यांचा कार्यकाळ विचारात घेणे आवश्यक आहे. सन 1915 म्हणजे लोकमान्य टिळकांचे नेतृत्व प्रस्थापित झाले होते. बहुजन समाजही त्यांच्या कामगिरीने भारावला होता. टिळकांनाही ‘तेल्यातांबोळय़ांचे’ म्हणजेच बहुजन समाजाचेच पुढारी समजले जायचे. अशा काळात त्यांच्या विरोधात जाणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती, पण तरुण केशवरावांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आत्मसात केले होते. शेतकरी, कामगार यांची दुःस्थिती ते जवळून पाहत होते. ती कशामुळे झाली आहे व त्यात बदल का होत नाही हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळेच तत्कालीन सनातनी वर्चस्वाच्या विरोधात त्यांनी बंडाचा झेंडा उभारला. दिनकरराव जवळकर यांच्या साथीने महाराष्ट्र पिंजून काढला. मेळे, गाणी, भाषणे यातून बहुजन समाजाच्या वैचारिक उन्नतीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्या काळात त्यांनी एकदोन नव्हे, तर कितीतरी सुशिक्षितांना वर्तमानपत्र काढण्यासाठी प्रोत्साहन दिले. सत्यशोधक चळवळीचा विचार तळापर्यंत पोहोचावा यासाठी काहीएक करायचे त्यांनी बाकी ठेवले नाही. नगरपालिकेची निवडणूक लढवली, तिथे महात्मा फुले यांचा पुतळा उभारला जावा यासाठी लढा दिला. पुस्तिका काढल्या, मेळे तयार केले. भाषणे देत महाराष्ट्रभ्रमंती केली.
अल्पावधीतच बहुजन समाजाचे कैवारी म्हणून केशवरावांचे नाव सगळीकडे दुमदुमू लागले. दरम्यानच्या काळात लोकमान्यांचे निधन झाले होते. त्यांच्या अनुयायांचे आणि टिळकांच्या काळातच पुढे आलेल्या महात्मा गांधी यांचे सूत काही जमत नव्हते. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी तयार झाली होती. अशा वेळी काकासाहेब गाडगीळ यांनी केशवरावांचे महत्त्व ओळखले. त्यांचे विचार काँग्रेसमध्ये येऊन ते जास्त प्रभावीपणे समाजात रुजवू शकतात हे त्यांच्या गळी उतरवले. केशवरावांनीही सारासार विचार करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला व महाराष्ट्रातील समस्त बहुजन समाज केशवरावांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये एकवटला. साल होते 1930. त्यानंतर केशवरावांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांचे निःस्वार्थी नेतृत्व विविध अंगांनी फुलत गेले. कायदेभंगाची चळवळ असो अथवा सत्याग्रह, सर्व ठिकाणी केशवराव अग्रभागी असत.
काँग्रेसबरोबर पटेनासे झाल्यावर वैयक्तिक फायदा लक्षात घेऊन कोणीही तिथेच थांबले असते, विविध पदे पदरात पाडून घेतली असती, पण स्वभावतःच बंडखोर असलेल्या केशवरावांना ते मानवणे शक्य नव्हते. त्यांनी नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. शंकरराव मोरे यांच्याबरोबर त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. या पक्षाची घटना म्हणजे केशवरावांचीच विचारधारा.
वय झालेले असतानाही या पक्षासाठी त्यांनी जिवाचे रान केले. त्यांना मानणारा बहुजन समाज या पक्षाच्या झेंडय़ाखाली आला. त्या काळात शेतकरी कामगार पक्षाला चांगले राजकीय यश मिळाले यामागे केशवरावांची तळमळ व धडपड होती. नंतर तिथेही मतभेद झाल्यावर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यानच्या काळात सततच्या दगदगीने प्रकृती क्षीण झाली होती, पण मन आणि विचार जागृत होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्यांना साद घालत होती. त्यासाठी स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते पहिले अध्यक्ष होते. आचार्य अत्रे प्रभृतींबरोबर होणाऱया बैठकांमध्ये केशवराव सहभागी होऊ लागले. महाराष्ट्राचे वेगळे राज्य झालेच पाहिजे ही भूमिका त्यांना मनोमन मान्य होती. मनाला पटेल त्या विचारासाठी सर्वस्व झोकून देऊन काम करणे हा त्यांचा स्वभावच होता. त्यामुळेच प्रकृती साथ देत नसतानाही आचार्य अत्रे यांच्या शनिवारवाडा येथील सभेचे अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारले. तिथेच भाषण करताना त्यांना पक्षाघाताचा झटका आला. तरुणपणापासून ज्या फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची कास धरली, त्यासाठी झटणारा हा भीष्म शरपंजरी पडला. त्यातच त्यांचे देहावसान झाले.
आजच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर केशवरावांचे स्मरण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. वैयक्तिक स्वार्थ विसरून राजकारण, समाजकारण कसे करायचे याचा केशवरावांनी आदर्श घालून दिला.
महाराष्ट्रात त्या काळात सार्वजनिक जीवनातील एकही सार्वजनिक गोष्ट अशी नव्हती की, ज्यात केशवरावांचा विचार, सक्रिय सहभाग नव्हता. शुक्रवार पेठेतील त्यांची जेधे मॅन्शन ही राज्यातील समस्त चळवळींचे केंद्रबिंदू झाली होती. महात्मा गांधींसारख्या राष्ट्रीय नेत्यापासून ते गावखेडय़ातल्या अनेक पददलित माणसांनी या जेधे मॅन्शनचा पाहुणचार घेतला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या दुसऱया लोकसभेत केशवराव खासदार म्हणून निवडून आले. या पदाचा उपयोगही त्यांनी बहुजन समाजाच्या कल्याणासाठीच केला.
(लेखक केशवराव जेधे यांचे नातू आहेत.)





























































