दीर्घायु भव – नखे आरोग्याचा आरसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैद्य सत्यव्रत नानल

आपली नखे आपल्या शरीराचा आरसा आहेत. स्त्रीयांसाठी शृंगार करताना जितके महत्त्व नखांचे आहे, तितकेच महत्त्व सर्व स्त्री-पुरुषांसाठी आरोग्यासंदर्भातही आहे. त्वचा, डोळे, नाक, कान, केस, घसा यासह नखेही आपल्याला आपल्या शरीरात घडणाऱ्या अनेक चांगल्या वाईट गोष्टींबाबत वेळोवेळी सूचना देत असतात.

आपली नखे आपल्या शरीराचा आरसा आहेत. स्त्र्ायांसाठी शृंगार करताना जितके महत्त्व नखांचे आहे, तितकेच महत्त्व सर्व स्त्री-पुरुषांसाठी आरोग्यासंदर्भातही आहे. आपले शरीर आणि त्याची यंत्रणा म्हणजे एक शिस्तबद्ध अखंडित प्रक्रियांचा समूह आहे. कुठे काहीही बिघडले तर शरीर आपल्याला वेळोवेळी त्याबद्दल सूचना देते.  त्वचा, डोळे, नाक, कान, केस, घसा यासह नखेही आपल्याला आपल्या शरीरात घडणाऱया अनेक चांगल्या, वाईट गोष्टींबाबत वेळोवेळी सूचना देतात. आपण त्या सूचना योग्यवेळी बघून, समजून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करावी म्हणजे आपण आपले आरोग्य उत्तम ठेवू शकतो. आयुर्वेदानुसार शरीरात हाडे बनतानाच्या प्रक्रियेतच दात, नखे आणि केसांची निर्मिती होते. म्हणजेच हाडे बनण्याची प्रक्रिया शरीरात नीट होत नसेल तर त्याचा परिणाम दात, केस आणि नखांवर होतो. नखांवर दिसणारे परिणाम आणि त्यावरील उपाय पाहूयात.

हाडे बनताना पोषण हाडांपर्यंत व्यवस्थित जात नसेल तर दात लवकर खराब होतात. नखे आणि केस पटापट वाढणे सुरू होते. प्रक्रिया अधिक जास्त बिघडली तर मात्र नखे आणि केसांचे सुद्धा पोषण बिघडत जाते. केसगळती किंवा केस पांढरे होणे सुरू होते. तसेच नखांवरही पांढरे डाग दिसू शकतात.

1) नखांवर पांढरे डाग दिसणे – आयुर्वेदानुसार हे लक्षण हाडांची प्रक्रिया आणि त्यातील अपचन दर्शवते. बिघडलेल्या प्रक्रिया सुधारणे म्हणजे आरोग्य स्थापित करणे. हीच आयुर्वेदाची विचार पद्धती आहे. हाडे बनण्याची प्रक्रिया कशामुळे बिघडते त्याचे एक प्रमुख कारण आयुर्वेदाप्रमाणे आहे ते म्हणजे पोटात जंत असणे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत पोटात जंत होणे सहज शक्य असते. त्याचा परिणाम पचन आणि शरीर पोषणावर होतो आणि मुख्यतः चेहऱयाची त्वचा आणि नखे यांवर पुसट ते गडद पांढरे डाग दिसतात. यावर उपाय म्हणून आपल्या वैद्याच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. जंत कमी होण्यासाठी आहारात शेवगा शेंग आणि पाला, डाळिंब, गाजर, काळी मिरी, दालचिनी, लसूण, कढीपत्ता यांचा वापर वाढवावा. मोठय़ा माणसांनी जेवणासोबत लसूण चटणी (फक्त कच्चा लसूण आणि सुके खोबरे यापासून बनलेली) रोज किंवा दिवसाआड खावी. पित्ताचे त्रास होणाऱयांनी मात्र आपल्या वैद्याच्या सल्ल्ल्यानेच हा प्रकार करावा.

2) नखांवर उभ्या रेषा दिसणे. नखे रुक्ष आणि खडबडीत होणे – हाडे बनण्याच्या प्रक्रियेत मुख्यतः वाताचा जोर असतो. पचनामध्ये मोठय़ा आतडय़ात वाताचे उत्पत्ती स्थान आहे. वाताचा जोर गरजेपेक्षा जास्त वाढत असेल तर आतडी सुद्धा कोरडी पडू लागतात. त्याने बद्धकोष्ठाचा त्रास सुरू होतो. हाच त्रास सुरू राहिला तर काही वर्षांनंतर नखांवर उभ्या रेषा दिसतात. पुढे तीच नखे रुक्ष आणि खडबडीत होतात. यावर उपाय म्हणजे बद्धकोष्ठावर त्वरित उपाय करावेत. जुनी बद्धकोष्ठता फक्त आहारीय उपाय करून बरी होणे अशक्य असते. त्यासाठी औषधे आणि पंचकर्मातील काही उपाय वेळोवेळी करावे लागतात.

3) नखांची वाढ जास्त लवकर होणे, नखांच्या आजूबाजूची त्वचा फाटणे, तुटणे, जाड होणे – मधुमेहासारख्या रोगांमध्ये शरीर झिजण्याचा वेग वाढलेला असतो. अशावेळी शरीरातील मलस्वरूप निर्माण होणारे घटक जास्त प्रमाणात किंवा विकृतपणे वाढू लागतात. नखांची नीट वाढ न होणे, नखांच्या आजूबाजूची त्वचा जाड होणे, फाटणे वगैरे प्रकार वाढतात. हे लक्षण मधुमेह इत्यादी रोगांच्या पूर्वरूपांमधे दिसते. वैद्यांना भेटून आपला रोजचा आहार, व्यायाम, दिनक्रम इत्यादीमधील होणाऱया चुका समजून घ्याव्यात.

4) नखांवरील बुरशी वाढणे – कपडे-भांडी धुण्यासाठी साबण किंवा लॅबोरेटरीमध्ये केमिकल्सच्या अधिक संपका&त असणाऱया लोकांना नखांवर वाईट परिणाम होतात. नखे आणि त्याच्या आजूबाजूची त्वचा यामध्ये ओलसरपणा राहिल्यामुळे तिथे बुरशी वाढू लागते. यासाठी काही सोपे उपाय किमान वर्षभर तरी न पंटाळता करावेत.

उपाय – दर आठवडय़ाला नखे घासून त्यावरील बुरशी काढावी. रोज रात्री नखे पाण्याने धुऊन पुसून कोरडी करावीत. त्यानंतर स्पिरीटने नखे स्वच्छ करावीत, म्हणजे त्यातील ओलावा लगेच कमी होतो. नखे कोरडी झाल्यावर प्रत्येक नखाच्या शिवणीवर एक एक थेंब खोबरेल तेल चोळावे. घाणीवरील खोबरेल सर्वोत्तम. तेल हळुवार जिरवावे. हे सलग तीन ते चार महिने केल्यावर टिकाऊ परिणाम दिसू लागतो. साधारणतः आठ दहा महिन्यांत बुरशी पूर्ण जाऊन स्वच्छ, नितळ आणि सुंदर नखे दिसू लागतात.

5) नखे खाण्याची सवय – अति मानसिक ताण असेल तर माणूस नखे खाऊ लागतो. हे पोटात जंत असतील तरीही होते. अशा वेळी त्या व्यक्तीस वैद्यकीय सल्ल्याने मनाची ताकत वाढवण्यासाठी त्वरित उपाय करावेत. सोबत आहारात दूध, तूप, लोणी यांचे प्रमाण वाढवावे. दीर्घ श्वसनाचे व्यायाम करावेत.

इतरही अनेक रोगांमध्येही नखांवर अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. त्या सर्वांचा विचार करणे सामान्य नागरिकांसाठी अशक्य आहे. त्याऐवजी वेळोवेळी आपल्या वैद्यांकडून नखांची तपासणी करून घ्यावी आणि आवश्यक उपाययोजना करावी हे सर्वात उत्तम.