फलाहार

>> शमिका कुलकर्णी, (आहारतज्ञ)

उपवासात आपण आतापर्यंत धान्य, भाज्या, कंद कसे उपयुक्त आहेत आणि त्यांचा समावेश आहारात कसा करावा हे पाहिले, पण उपवासात सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे फळं. फळांशिवाय कोणताही उपवास पूर्ण होत नाही. आज आपण पाहूया फळं किती आणि केव्हा खावी आणि त्यांचा कसा आरोग्यदायी फायदा शरीराला होतो.

फळांचा समावेश आहारात केल्याने शरीरात उत्साह टिकून राहतो. त्याच बरोबर कर्बोदके, तंतुमय पदार्थ, जीवन सत्वे आणि खनिजांचा योग्य पुरवठा शरीराला होतो. उपवासात फळांचा समावेश सकाळी उठल्यावर किंवा मधल्या वेळेत करावा.

रोजच्या उपवासात विविध फळांचा समावेश आहारात करावा. यामुळे शरीराला सर्व उपयुक्त जीवनसत्वं उपलब्ध होतात. फळांसोबत सुकामेवा खाल्ल्याने शरीराला पूर्ण पोषण मिळते.
फळांचा समावेश आहारात कोणत्या प्रकारे करावा आणि केव्हा करू नये :

– सकाळी उठल्यावर एखादे छोटे फळ आणि त्याबरोबर 2 बदाम, 2 अक्रोड आणि काही मनुका खाव्या.
– विविध फळं एकत्र करून फ्रुट प्लेट करावी आणि मधल्या वेळेत त्याचा आनंद घ्यावा.
– फ्रुटशेक करूनही घेऊ शकतो. ऊर्जादायी आणि पौष्टिक ठरतो. त्यात काजू बदाम पूड घालावी. हा आहार सकाळी न्याहारीऐवजी किंवा संध्याकाळी घ्यावा.
– फळांचा समावेश कोणत्याही इतर फराळाच्या पदार्थांसोबत करू नये.
– केवळ फळे खाऊन उपवास करू नये. यामुळे शरीरात इतर उपयुक्त घटकांची कमी झाल्यामुळे अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या