हात दाखवून अवलक्षण

>> शिरीष कणेकर

पर्वताएवढय़ा भासणाऱया अडचणी समोर उभ्या ठाकल्या की हमखास दोघांची आठवण येते- देव व ज्योतिषी. पैकी देवाचे ‘रिझल्टस्’ मिळायला वेळ लागतो. मिळतील की नाही हेही सांगता येत नाही. काय झालं, हे सांगायला तो समोरही येत नसतो.

राहता राहिला ज्योतिषी. हा पृथ्वीवरचा देवच म्हणायचा. तो देवाप्रमाणे तुमचं भविष्य घडवत नाही, सुधारून देत नाही, पाठीशी उभा राहत नाही. तरीही वारीला जाणाऱया वारकऱयांप्रमाणे त्रस्त माणसं झुंडीनं ज्योतिषाचा मार्ग धरतात. ज्योतिषी नुसतंच भविष्य वर्तवीत नाहीत, तर मार्ग सुकर करण्यासाठी उपाय सुचवितात, तोडगे सांगतात. (त्यात अंगठय़ा, ताईत, कडी हे बाह्योपचार आलेच.) म्हणून माणसं ज्योतिषाकडे जातात, केवळ भविष्य जाणून घेण्यासाठी नाही. भविष्याविषयी माणसांना अपार कुतूहल तर असतेच, परंतु ज्योतिषाचे भाकीत चुकीचं असण्याची शक्यता त्यांना पळवाटदेखील शोधून देते. भविष्य उज्ज्वल असेल तर ते चांगलं आणि वाईट असेल तर ज्योतिषाला काय फतरे कळतंय, हे म्हणायला मोकळे. तुम्ही चार डॉक्टर गाठू शकता तसे तुम्ही एक सोडून दहा ज्योतिषी गाठू शकता. चार पैसे जातील, बाकी काय? डॉक्टर हा स्वतंत्र विषय आहे. सततच्या मानदुखीवर (शेक्सपियर, कालिदास यांचीही लिहून लिहून मान दुखायची म्हणे. ज्ञानेश्वर बचावले. ते म्हणे टाइप करीत.) इलाज करण्यासाठी मी ‘हिंदुजा’मधल्या डॉ. भाभा नावाच्या निष्णात ‘न्यूरॉलॉजिस्ट’कडे गेलो होतो. त्यानं सांगितलं की, डोकं मानेच्या खोबणीत बसवलेलं असतं. तुमच्या बाबतीत ते चुकीचं बसवलं गेलंय. माझ्या डोक्यात बिघाड असू शकेल अशी मला शंका होती, पण मान व डोकं यांची ‘अलाइनमेंट’ चुकीची हे मला सर्वस्वी नवीन होतं. एखाद्या जनरल सर्जनकडे जाऊन डोकं उपटून पुन्हा नीट बसवून घ्यावं का? की हेच काम नापिताकडून करून घ्यावं?

शास्त्र म्हणून अजूनही अधिकृत मान्यता नसलेल्या ज्योतिषशास्त्राच्या होराभूषण, हस्तसामुद्रिक, फेस रीडिंग अशा विविध उपशाखा आहेत. कुंडली दाखवणे हा सर्वात कॉमन ब्रॅण्ड, पण हात दाखवणे (व अवलक्षण करून घेणे) अधिक लोकप्रिय असावे. कुंडली आधी बनवलेली असावी लागते. असली तरी हवी तेव्हा सापडावी लागते. त्यापेक्षा हात दाखवणं (त्या अर्थी नव्हे हो!) श्रेयस्कर. ज्योतिषी अपघातानं रस्त्यात भेटला तरी त्याच्यासमोर हात पसरता येतो. (त्या अर्थी नव्हे हो!) रेषांच्या रूपानं ‘कोड लँग्वेज’मध्ये तुमचं संपूर्ण आयुष्य चितारलेलं असतं, पण ते वाचता फक्त ज्योतिषाला येतं. (डॉक्टरचं हस्ताक्षर तरी त्याला स्वतःला कुठं वाचता येतं?)

एका दबदबा असलेल्या हौशी ज्योतिषाला मी नात्यातल्या खूप आजारी असलेल्या माणसाची कुंडली दाखवायला घेऊन गेलो. कुंडलीचा नीट अभ्यास करून तो म्हणाला, ‘काही काळजी करण्याचं कारण नाही. आपण एवढे घाबरलो होतो हे त्याच्या कुटुंबाला काही वर्षांनी सांगून खरं वाटणार नाही. ‘नथिंग टू वरी अबाऊट.’ मी हे भाकीत त्याच्या बायका-मुलांना सांगितले. ते हुलारले. त्यानंतर आठवडाभरात त्या आजारी नातलगाचं निधन झालं. वास्तविक त्यानंतर मी त्या ज्योतिषाची पायरी चढायला नको होती, पण चढलो. (आठवत्येय ना, मान आणि डोकं यांची चुकलेली ‘अलाइनमेंट’?) माझी व बायकोची कुंडली शेजारी शेजारी मांडून आमचे कुठल्याशा स्थानात कुठलेसे ग्रह पडलेत असे सांगून ज्योतिषाचार्य म्हणाले, ‘हे असे ग्रह पडलेत म्हणून तुमचं एवढं पटतं, एवढं जमतं. तुम्ही एवढे एकसुरी जोडपे आहात.’

‘अच्छा, अच्छा’ मी म्हणालो. आमचं एवढं पटतं, एवढं जमतं, आम्ही एवढे एकसुरी जोडपे आहोत हे मला माहीतच नव्हतं. प्रत्येक भांडणानंतर म्हणजे रोजच मी हे कुंडलीतले ग्रह काढून बघत बसायचो. आता मात्र मी त्या ज्योतिषाच्या नावानं आंघोळ करून मोकळा झालो. ‘मोती’ साबणानं.

वॉचमनपासून धोब्यापर्यंत, पोलिसांपासून भाजीवाल्यापर्यंत, डॉक्टरपासून इंजिनीयर्सपर्यंत, राजकारण्यांपासून नोकरदारांपर्यंत व पत्रकारांपासून ज्योतिषींपर्यंत माझा मित्रवर्ग पसरला आहे. (म्हणूनच बहुधा ते घरी आले की सरळ कोचावर पसरतात. जाड चष्मेवाला मित्र दुष्काळातून आल्यासारखा खातो.) नरेश कोळेकर हा पत्रकार कम ज्योतिषी होता. पुढे त्याने पत्रकारिता सोडली व तो फुलटाइम ज्योतिषी झाला. (मी पत्रकारिता सोडली आणि फुलटाइम लोफर झालो.) तो कुंडली बघायचा, हात बघायचा व चेहरे वाचायचा. (पढे-लिखों को भी चेहरे पढने नहीं आते!) त्याला काही दाखवायची बुद्धी मला कधीच कशी झाली नाही? लहान मुलांच्या हातावरच्या रेषा अस्पष्ट असतात. म्हणून नरेशनं माझ्या मुलाचा हात पाहण्यासाठी त्यावर पावडर शिंपडली. त्यासरशी माझा मुलगा किंचाळला, ‘अहो, किती पावडर फुकट घालवताय? किती महाग असते माहित्येय?’ त्यानंतर नरेशनं आमच्या कुटुंबाचाच धसका घेतला असावा.
एकदा नरेश कोळेकर आणि मी बसमधून चाललो होतो. (भर टॅफिकमध्ये माझी गाडी बंद पडली, असं काही लिहिण्याचा योग कधी आला नाही.) आमच्यासमोर एक वृद्ध, हडकुळा, टक्कल पडलेला माणूस टाय लावून बसलेला होता. तो प्यायलेला वाटत होता. मी नरेशला म्हणालो, याच्या चेहऱयावरून काय वाटतं सांग. नरेशनं त्याच्याकडे रोखून पाहिलं व तो जवळजवळ ओरडलाच, ‘माय गॉड! याचे किती स्त्रियांशी संबंध आले असतील तू कल्पनाही करू शकणार नाहीस. कोण आहे हा, ओळखतोस?’

‘हो.’ मी म्हणालो. ‘त्याचं नाव पी. एन. अरोरा. चित्रपट निर्माता-दिग्दर्शक.

बसमधून खाली उतरेपर्यंत नरेश अरोराकडे अविश्वासच्या नजरेनं बघत होता.

जब ज्योतिष की बात चली तो एक शेर याद आया –

हाथों के लकीरो पे यकीन मत करना

तकदीर तो उनकी भी होती है जिनके हाथही नहीं होते!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या